सभ्य मार्गाने परीक्षा देऊन ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यास असभ्य मानणे, हीदेखील आपलीच परंपरा आहे. अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉपीबाबतची सर्जनशीलता कुणाही वैज्ञानिकास लाजवील अशी असते, ती याच परंपरेमुळे. यंदा दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मातृभाषा मराठीच्या पेपरला महाराष्ट्रात १०८ कॉपी प्रकरणे सापडली. हे प्रमाण गणित आणि इंग्रजी यांसारख्या भयावह प्रश्नपत्रिकांच्या वेळी किती वाढेल, हे वेगळे सांगायला नको. भारतीय सेनादलातील भरतीच्या वेळी विद्यार्थ्यांना खिसे नसलेल्या चड्डीवर परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आल्याने समाजमाध्यमांमध्ये टीकेचा भडिमार झाला. परीक्षा देणाऱ्यांनी अभ्यासच केला पाहिजे आणि परीक्षेच्या वेळी कॉपी करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न होता कामा नये, अशी संयोजकांची साधीसुधी अपेक्षा. पण त्यासाठी चड्डीवर बसवणे म्हणजे जाहीर अपमानच की. अशा अपमानाने लांच्छित होणारे विद्यार्थी खरे तर कॉपीच्या वाटय़ाला जातच नाहीत. तरीही ती करणाऱ्यांना जरब मात्र बसत नाही ती नाहीच. हात पुसायच्या ‘टिश्यू पेपर’वर पुसट पेन्सिलने लिहिलेल्या मजकुराला जरासे ओले केले की ती अक्षरे ठळक होतात, हा शोध तर वैज्ञानिकांनाही लावता आला नाही. तंत्रज्ञानाच्या नव्या युगात अवतरलेल्या ‘गिअर वॉच’मुळे बसल्या जागी ‘मेसेजिंग’ करणे सहज शक्य झाले. अशी आयुधे कॉपीसाठी किती उपयोगी आहेत, याचे भान त्या क्षेत्रात तरबेज असलेल्यांनाच असते. कित्येक वर्गामधील भिंती गणिताच्या अवघड प्रश्नांच्या उत्तरांनी आधीच रंगवून ठेवलेल्या असतात. मुलींच्या ओढणीचा आणि मुलांच्या पॅण्टमध्ये असलेल्या चोरखिशांचा अवघड प्रश्न सोडवण्यासाठी किती महान उपयोग असतो, ते चोरवाटा माहीत असलेल्यांनाच ठाऊक असते. अभ्यासक्रमातील बरेचसे विषय ‘ऑप्शन’ला टाकण्याच्या परंपरागत सवयीमुळे ऐन वेळी पंचाईत होऊ नये, यासाठी ही कॉपी केवढी मदत करते, ते सर्वसामान्यांना कळूच शकणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने एकाच बाकावर दोन विद्यार्थी बसवले जातात. अशा वेळी शेजारच्या उत्तरपत्रिकेत डोकावण्याचा मोह विद्यार्थ्यांना कसा बरे आवरणार? परीक्षेच्या काळात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला त्यांचे मित्र फार उपयोगी ठरतात. वर्गाच्या खिडकीत बसलेल्या आपल्या मित्राला खालून चिठ्ठय़ा फेकण्याची जिगर असणारे खरे जिवाभावाचे मित्र ते हेच. परीक्षेत शेजाऱ्याचे पाहून किंवा खिशातल्या चिठ्ठय़ाचपाटय़ांच्या मदतीने कसेबसे काठावर उत्तीर्ण होता येईलही, पण आयुष्याच्या परीक्षेत कॉपी करता येणार नसल्याने अपमानित जगणेच वाटय़ाला येणार, याचा विचार करण्याची क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये कधी बरे येणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा