निवडणुका जाहीर झाल्या, जिभेला धार काढण्याची आणि तेल लावण्याची वेळ झाली. दादांच्या जिभेला नेहमीच धार असते हे एव्हाना सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. त्यांच्यामुळे तर कराडजवळच्या प्रीतिसंगमावर ‘पश्चात्ताप केंद्र’ सुरू झाले. कोरडय़ा पडलेल्या धरणांच्या मुद्दय़ावरून दादांनीच या केंद्राचे उद्घाटन केले, ते अजूनही उभ्या महाराष्ट्राच्या आठवणीत आहे. पुढे त्याचा फारसा वापर झालाच नाही. तेल लावलेल्या जिभा तोंडातल्या तोंडात घसरल्या, की लगेचच या केंद्रावर जावे आणि पश्चात्ताप व्यक्त करून मोकळे व्हावे, अशी या केंद्राच्या स्थापनेमागची कल्पना! त्याचा वापर करण्याचे सर्वाधिकार केवळ आपले एकटय़ाचे असावेत असे दादांनाही वाटले नसणार. तरीही पुन्हा एकदा या केंद्राची वारी दादांनाच करावी लागणार की काय, अशी कुजबुज सध्या सुरू आहे. ‘जीभ घसरणे’ या क्रियेला राजकारणात फारच महत्त्व असते. एकदाही जीभ घसरली नाही असा माणूस राजकारणात शोधावाच लागतो. उलट, जीभ घसरली नाही तर आपण राजकारणी नव्हेच, असे हल्ली अनेकांना वाटू लागले आहे. एकदा तरी जीभ घसरावी, त्याची चर्चा व्हावी असे प्रत्येकाचेच बहुधा स्वप्न असते. पण केवळ घसरणे महत्त्वाचे नसते. त्या घसरण्याची अशी जोरकस चर्चा व्हायला हवी, की पुढचे सारे राजकरण त्याभोवतीच घसरत राहिले पाहिजे. दादांना ते पुन्हा साधले. जीभ घसरण्याच्या प्रयोगात आता त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही, हे सिद्ध झाले आहे. घसरणाऱ्या जिभांची माणसे प्रत्येक पक्षात असतात. त्यांच्या जिभांना घसरण्याचा सराव असला, तरी काही जिभांच्या घसरण्यावर सगळ्यांचे लक्ष असते. पूर्वी रावसाहेबांची जीभ अशी काही लीलया घसरायची, की पुढे काही दिवस त्यांची जीभ हाच चर्चेचा विषय असायचा. तरीही, ते कधीच कराडच्या प्रीतिसंगमावरील पश्चात्ताप केंद्राकडे फिरकले नाहीत. दादांचे तसे नाही. जीभ फारच घसरली, की पश्चात्ताप व्यक्त करावा एवढी राजकीय सभ्यता दादांनी जपली आहे आणि तसे करूनही दाखविले आहे. आता निवडणुकांचा हंगाम आल्याने राजकारणात ‘भाषे’ला ‘बहर’ येणार हे ठरलेलेच असते. तो बहर आनंदाने उपभोगण्यासाठी काही जण आपल्या जिभांना धार लावून घेतात, तर काही जण तेल लावतात. धार लावलेल्यांच्या जिभा सहसा घसरत नाहीत. पण आपली जीभ घसरली पाहिजे असे ज्यांना वाटते, ते जिभांना तेल लावतात. दादांच्या जिभेला धार आहे, पण अधूनमधून ते जिभेला तेलही लावून घेत असावेत. यंदाच्या बहराच्या हंगामात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या जिभांवर सगळ्यांचेच लक्ष लागणार हे स्पष्ट असल्याने, साऱ्या नजरा दादांच्या जिभेवर खिळल्या असताना त्यांनी जिभेचा पट्टा चालविण्याचा या हंगामातील पहिला प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. प्रयोगाचे सार्वत्रिकीकरण करण्याआधी रंगीत तालीम करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रयोग पुढे किती चालू शकतो, याचा अंदाजही घेता येतो. दादांचे पुढचे सारे प्रयोग हाऊसफुल्ल होणार हे रंगीत तालमीलाच सिद्ध झाले. तेल लावलेल्या जिभांचा पट्टा फिरविण्यात दादांचा हात धरण्याचे धाडस कुणी करणार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. अकोल्यात बोलताना दादांनी गायकरांचे धोतर फेडण्याचा इशारा दिला, तर पिंपरी नावाच्या आपल्या कर्मभूमीत एका भावनाविवश क्षणी दादांना बाळासाहेबांची आठवण अनावर झाली. ‘बाळासाहेब कमळाबाईला वाकवायचे, सरळही करायचे.. आता उलटं चाललंय’ असे उदाहरण दादांनी दिले, आणि मंचावरच्या सहकाऱ्यांना कराडच्या प्रीतिसंगमावरील ‘पश्चात्ताप केंद्रा’ची आठवण झाली. तिथले कुलूप काढायची वेळ आली, असा विचारही काहींच्या मनात आला, अशी चर्चा आहे..
जिभेची धार..
दादांच्या जिभेला नेहमीच धार असते हे एव्हाना सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-09-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar balasaheb thackerays bjp and shiv sena abn