जाणते राष्ट्रीय नेते शरदराव पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीनंतरही, पक्षाचा आशावाद उतरणीस लागलेला नाही. उलट त्या ‘प्रचंड आशावादा’स नवे धुमारे फुटू लागले आहेत. ‘पवारांचा पक्ष’ म्हणून ज्याच्याकडे महाराष्ट्राने सुमारे २० वर्षांपूर्वी आशेने पाहिले होते, तो पक्ष आपली ‘आशावादी’ भूमिका कदापिही सोडणार नाही, अशी आशा महाराष्ट्राने तेव्हापासूनच उराशी बाळगली होती; पण पाच वर्षांपूर्वी जेव्हा, हे ‘भविष्य माझ्या हाती’ अशी गर्जना या पक्षाने केली, तेव्हा या पक्षाच्या भविष्याची नेमकी खूण तरी कोणती, असा संभ्रम अनेकांना पडला होता. ‘मी प्रचंड आशावादी’ असा उमदा विश्वासही या पक्षाने व्यक्त केला होता; पण ‘पर्याय’ म्हणून पुढे येऊ पाहणारा ‘पवारांचा पक्ष’ महाराष्ट्रात असतानाही, युतीच्या ‘भगव्या’स मतदारांनी सत्तेचा कौल दिला आणि एक एक करून अनेक राष्ट्रवाद्यांस ‘भगवा हेच भविष्य’ आहे, याची जाणीव होऊ लागली. पक्षाचे काय होईल ते होवो, आपले भविष्य तरी आपल्या हाती राहावे या आशावादाने अखेर भगवा हाती घेण्याची तयारी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या आशावादाचे धुमारे फुटण्यासाठी हेच निमित्त ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा-मेळाव्यांत आणि प्रचारयात्रांमध्ये आता पक्षाच्या झेंडय़ासोबत ‘भगवा’ दिसेल, तेव्हा आशावाद आणि भविष्य हातात हात घालून वाटचाल करत असल्याचा भास झाल्याखेरीज राहणार नाही. तसेही आजकाल राष्ट्रवादीचे अनेक बिनीचे मोहरे पक्षाचा झेंडा सोडून युतीचा भगवा हाती घेण्याच्या स्पर्धेत उतरल्याने, पक्षाच्या आशावादाला ओहोटी लागली होती आणि आपल्या हाती असलेल्या भविष्याचे काय होणार, ही चिंताही पक्षास सतावू लागलीच होती. आता एका हाती पक्षाचा झेंडा आणि दुसऱ्या हाती भगवा झेंडा अशा रूपातील राष्ट्रवादी कार्यकर्ता भविष्याच्या नव्या आशावादाने राजकारणाच्या रणांगणात उतरण्याची तयारी करू लागला आहे. पक्षाबाहेर पडून युतीचा भगवा हाती घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती पक्षाचाच भगवा देत त्यांच्या मनात भविष्याचा नवा आशावाद रुजविण्याच्या नवधोरणामुळे राजकारणात रंगत येणार हे नक्की! पण अगोदरच, ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा संभ्रमात सापडलेल्यांना दोन हातांत दोन झेंडे देऊ केले, तर नेमक्या कोणत्या हातातील झेंडय़ात आपले भविष्य दडले आहे हे ओळखणे काहीसे कठीणच होणार आहे. तसेही, पक्षाबाहेर गेलेले आणि भगवा हाती घेतलेले नेते उद्या निवडणुकीच्या राजकारणातून सत्तेवर आले तर अप्रत्यक्षपणे ती सत्ता राष्ट्रवादीचीच असेल, हादेखील एक आशावादच आहे. तरीही राष्ट्रवादीतून बाहेर पडून भविष्य हाती घेऊ पाहणाऱ्या आणि आपल्या आपल्या भविष्याचा वेध घेत प्रचंड आशावादाने भगव्याला आपलेसे करणाऱ्यांना पक्षांतर्गत भगव्याचा पर्याय देऊन त्यांचे भविष्य आपल्या हाती ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण युतीच्या भगव्याकडे डोळे लावून आणि युतीचा भगवा हाती घेऊन नवा आशावाद घडवू पाहणाऱ्यांना तो भावणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर येईल. कोणाचेही सरकार आले तरी ते आमचेच असेल, हा सुप्रियाताईंचा आशावाद खरा, की पक्षाहाती भगवा देऊन भविष्य घडविण्याचा अजितदादांचा राष्ट्रवाद खरा, हे लवकरच स्पष्ट होईल.

Story img Loader