आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार म्हणजे राजकारण, असे म्हणणाऱ्यांचा राजकारणाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोनच उघड होतो. अर्थात, उत्तर प्रदेशातील नेते अमरसिंह यांचे कर्तृत्व राजकारणाच्या पलीकडचे आहे. याच कर्तृत्वामुळे २०१४-१५ सालच्या निवडणुकीत, आपल्याकडे ७९ कोटींहून अधिक रुपयांची जंगम मालमत्ता अधिक ५१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रांजळ प्रतिज्ञापत्र अमरसिंह देऊ शकले होते. अमरसिंह यांनी यापुढे निवडणूक लढवल्यास, त्यांची स्थावर मालमत्ता कदाचित कमी झालेली दिसेल. किमान २.९१ कोटी रुपयांची घट अमरसिंहांकडील जमीनजुमल्याच्या एकंदर मूल्यमोजणीत येऊ शकते. याचे कारण एव्हाना सर्वज्ञात झालेले आहेच. तरीही ते पुन्हा सांगायचे तर, उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्य़ातील लालगंज तालुक्यात तरवा – सुल्तानपूर या गावांतील जमीन त्यांनी आता दान दिली आहे. कुणाला दान दिली, हेही सारे जण जाणतातच. तरीही पुन्हा सांगायचे तर, सेवा भारती या संस्थेला त्यांनी ही जमीन दान दिली आहे आणि दानपत्राची रीतसर नोंदणीदेखील नुकतीच पार पडली असली, तरी कानपूर येथे २३ फेब्रुवारीच्या शनिवारी भाजपचे उत्तर प्रदेशातील काही नेते, रा. स्व. संघाचे काही पदाधिकारी आणि सेवा भारतीचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरसिंह यांच्या हस्ते या जमीन-दानाचा जाहीर समारंभ होणार आहे. आता सेवा भारती नामक संस्थेशी रा. स्व. संघाचा काय संबंध आणि भाजपचा तरी काय संबंध, हे अज्ञजनच विचारू शकतात. सुज्ञांना रा. स्व. संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे वगैरे सारेच माहीत असते. सकारात्मक सामाजिक कार्य जिथे जिथे होते, तिथे तिथे भाजपचे नेते आवर्जून कौतुक करण्यास जातात, हेही सर्वानाच माहीत असते.
अमरसिंह यांचा राजकीय पूर्वेतिहास कसाही असो, त्यांनी एका सेवाभावी संस्थेला शाळेसाठी जमीन दान करणे हे सकारात्मक सामाजिक कार्यच नव्हे काय? अमरसिंह समाजवादी पक्षातच परत जाणार, अशा बातम्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत पसरविल्या जात असल्या तरीसुद्धा अमरसिंहांचे मतपरिवर्तन झालेले नाही, हेदेखील सकारात्मकच नव्हे काय? परंतु दृष्टिकोनच नकारात्मक असेल, तर काही चांगले दिसतच नाही. मग या जमिनीची किंमत २०१४-१५ मधील प्रतिज्ञापत्रात एक कोटी रुपये होती, ती तीनच वर्षांत २.९१ कोटी रुपये कशी, अशी खुसपटे काढली जातात. त्याहीउप्पर, रा. स्व. संघाशी जवळीक ठेवून अमरसिंहांना कोणते राजकीय पद हवे आहे याचीही कुजबुज केली जाते. अमरसिंहांचे आजवरचे कर्तृत्व पाहता ही जमीन आवळय़ाएवढीच ठरेल आणि ती देऊन किती मोठा कोहळा अमरसिंह काढणार आहेत, असे रंग या कुजबुजीत भरले जातात. हे सारे, राजकारणाविषयीच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर मग, आवळय़ाभोपळय़ाची मोटसुद्धा यथास्थित चालवू शकते तेच खरे राजकारण, हे स्वच्छ दिसू लागते!