लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोडल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले हे खरेच असले, तरी या आव्हानाचा सामना कसा करावयाचा याची त्यांना भेडसावणारी चिंता आता मिटणार,  असे दिसू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात काही समस्या एवढय़ा अचानकपणे समोर उभ्या ठाकतात, की त्यांच्या केवळ जाणिवेनेच, त्या सोडवायच्या कशा हा प्रश्न भेडसावू लागतो. पण त्याच समस्येवर एखादे अनपेक्षित उत्तर इतक्या सहजपणे सामोरे येते, की आधी क्लिष्ट वाटणारी तीच समस्या चुटकीसरशी सुटेल असे वाटू लागते. कालपरवापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपच्या अध्यक्षांचा ४५ जागांवर विजयाचा संकल्प समस्येच्या रूपाने छळत होता. आता यातून बाहेर कसे पडावयाचे या विचाराने त्यांना कदाचित झोपही लागली नसेल. पण अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला आणि मुख्यमंत्र्यांना भेडसावणाऱ्या त्या समस्येने सपशेल नांगी टाकली. या मोठय़ा वाटणाऱ्या आव्हानाचे उत्तर एवढे सोपे असेल, असे कदाचित कुणालाच वाटलेदेखील नसेल. पण ते उत्तर सोपेच होते! ‘मोठा भाऊ म्हणायचे एवढेच ना? म्हणू आम्ही मोठा भाऊ’.. एवढय़ा एका वाक्याभोवती युतीचे अवघे राजकारण गिरक्या घेत होते, याची त्यांना- म्हणजे, ठाकरेंना, शहा यांना, किंवा मुख्यमंत्र्यांनाच नव्हे, तर कुणालाच कदाचित कल्पनादेखील नसावी.

म्हणूनच, ‘मोठा भाऊ कोण’ या ‘लघुतम’ प्रश्नाच्या उत्तरात युतीचा ‘लसावि’ सामावलेला आहे, हे आता उघड झाले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक फोन केला काय, अगोदरची भाजपच्या नावाने उधळलेली सारी मुक्ताफळे ‘खड्डय़ात’ घालून ‘युती हवी असेल तर आम्हाला मोठा भाऊ म्हणा’ एवढय़ा एकाच अटीवर ठाकरे यांनी युतीची तयारी दाखवावी, हा सारा प्रकार, जादूची कांडी फिरविण्यासारखाच अनपेक्षित झाला. युती ही भाजपची गरज आहे हे एव्हाना स्पष्ट झालेले असल्याने ताणून धरण्याची हीच वेळ आहे, हे शिवसेनेने ओळखले आहे. तसे त्यांनी करावयासच हवे. तसे न केले, तर तो राजकीय अपरिपक्वपणा ठरला असता, आणि शिवसेनेकडे तेवढा परिपक्वपणा आहे हे आता सिद्ध झाले आहे. युतीसाठी भाजपने केलेले सारे खेळ शिवसेना अगोदरच कोळून प्यायलेली असल्याचेही ठाकरे यांनी दाखवून दिले. आता आपल्या पारडय़ात भाजपपेक्षा जड दान पाडून घेण्याची पाळी शिवसेनेची आहे, आणि त्यासाठी हीच वेळ योग्य आहे, हेही सेनेने ओळखले आहे. मोठा भाऊ म्हणा, एवढी अट म्हणजे चुटकीसरशी सापडलेले उत्तर असले, तरी त्यामागील मेख भाजपला उमगली नसेल असे नाही. आजवर रालोआमधील लहानलहान घटक पक्षांना हातावर खेळविणाऱ्या भाजपला तेच पक्ष बोटावर नाचवू लागले आहेत. राजकीय नाइलाज म्हणून सेनेचा हा हट्ट पुरवून भाजपने युतीचे दान पदरात पाडून घेतले तरी मुळातच छोटा असलेला हा मोठा भाऊ उद्या त्याच जोरावर मुख्यमंत्रिपदावर दावा सांगेल, हे भाजपच्या चाणक्यांना माहीत नसेल असे नाही. तरीही, मोठा भाऊ मानण्याची अट सेनेने घालावी, आणि भाजपने युतीसाठी पुढे केलेला हात तसाच ठेवावा, असे झालेच!..

आता युती झाली, की प्रसिद्धीसाठी द्यावयाच्या संयुक्त निवेदनाचा मसुदा टाइप करणे एवढेच काम बाकी राहिले आहे!.. तसाही, संयुक्त निवेदनाचा एक जुना मसुदा दोघांकडेही तयारच आहे!