लोकशाहीत सारे जण समान असले, तरी काही जण अधिक समान असतात, हे जॉर्ज ऑर्वेलने ‘अ‍ॅनिमल फार्म’मधून सांगितलेले सत्य सध्या प्रकर्षांने वास्तवात दिसू लागले आहे. हवा, पाणी, ऊन, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर सर्वाचा समान हक्क असला, तरी काही जणांचा हक्क अधिक असतो, हे न सांगता समजून जाण्यात व तो दाखविण्यात अधिक शहाणपणा असल्याने, सामान्य माणसांनी आता तरी तसे शहाणे व्हावयास हवे. म्हणजे, अशा गोष्टींवर आपला हक्क असला, तरी आपण काही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीएवढे अतिमहत्त्वाचे नागरिक नसतो. त्यामुळे वाहतुकीने गजबजलेल्या आणि धुराच्या प्रदूषणाने काळवंडलेल्या एखाद्या रस्त्याकडेला बगिचा म्हणून निर्माण केला गेलेला हिरवळीचा तुकडादेखील जी काही शुद्ध हवा देतो, तेवढीही आपल्यासारख्या सामान्यांना पुरेशी असते. एखाद्या सुट्टीच्या दिवशी त्या बगिच्यामध्ये शुद्ध हवा मिळविण्यासाठी आपल्यासारख्यांची एवढी गर्दी होते, की त्यामध्ये घुसमट होऊन ती शुद्ध हवा सर्वाना मिळणेदेखील दुरापास्त होते. गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृताताई फडणवीस या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून किती तरी खोलवर, मोकळ्या समुद्रातील शुद्ध हवा असूनही अधिक शुद्ध हवा मिळविण्यासाठी एका ऐषारामी जहाजाच्या किनाऱ्यावर जीव धोक्यात घालून बसल्या होत्या. आपण शुद्ध हवा घेण्यासाठी जहाजाच्या काठावर बसलो आहोत हे जनसमुदायास कळावे यासाठी त्यांनी त्या जागेवरून सेल्फीदेखील काढला. अर्थात, काही जण कितीही अधिक समान असले, तरी त्यांनी घेतलेल्या छायाचित्रात शुद्ध हवा किंवा अधिक शुद्ध हवेची दृश्ये येत नसली, तरी त्या जहाजावरील अन्य जनांना खोल समुद्रातील जी काही शुद्ध हवा मिळत होती, त्याहून किती तरी अधिक शुद्ध हवा त्या दिवशी जहाजाच्या काठावर बसून सेल्फी काढल्यामुळे अमृताताईंना मिळाली असणार यात शंका नाही. तुम्हीआम्ही सामान्य माणसे, मुंबईच्या प्रदूषणग्रस्त जमिनीच्या तुकडय़ांवर काहीशी कृत्रिम भासावी अशी हिरवळ तयार करतो, त्याच्या अधेमधे चारदोन झाडे लावून हिरवाईचा आभास निर्माण करतो आणि एखाद्या सुट्टीच्या दिवशी त्या जागी जाऊन चारदोन मोकळे श्वास घेत शुद्ध हवा संपादन केल्याच्या समाधानात घरी परततो, त्यांना खोल समुद्रातील शुद्ध हवेचा आणि त्यातही, जहाजाच्या अगदी काठावरील अधिक शुद्ध हवेचा सुखद अनुभव काय असतो, हे कसे कळणार?.. असा काही आगळा अनुभव गाठीशी नसतानाही, अतिशुद्ध हवेच्या हव्यासापोटी अमृताताईंनी केलेल्या त्या धाडसाची सर्वसामान्य जनतेने खिल्ली उडवावी, हे काही योग्य नाही. अमृताताई या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याने, अनाठायी वेडेपणा करू नये एवढे समजण्याएवढे शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच असणार; पण एवढीदेखील समज नसलेल्या समाजाकडून त्यांच्या त्या कृत्याची थट्टा व्हावी हे दुर्दैवीच आहे. तरीही, आपल्या त्या कृतीचे स्पष्टीकरण करताना, अशा थट्टेखोरांनाही माफ करून अमृताताईंनी क्षमा मागितली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा!.. शिवाय, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका, असा बहुमोल संदेशही त्यांनी दिला आहे. आपल्यापेक्षा अधिक समान असलेल्यांच्या संदेशाचा मान राखण्याचे शहाणपण यानिमित्ताने तुम्हाआम्हा सामान्यांमध्ये आले, तरी त्या प्रसंगापासून आपण बोध घेतला असे म्हणता येईल.. सध्या याची गरजच आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा