‘द इंडिपेन्डन्ट’ या सुमारे साठेक हजार खपाच्या ब्रिटिश दैनिकाचे समस्त बॉम्बेवासीयांनी मन:पूर्वक आभार मानण्याची आवश्यकता आहे. खरे तर पालिकेने या दैनिकाचे संपादक अमोल राजन यांचा शिवाजी पार्कवर नागरी सत्कारच करावयास हवा. याचे कारण अमोल राजन हे मराठी माणूस आहेत म्हणून नव्हे. ते मराठी नसून मूळचे बंगाली आहेत. मग त्यांचा सत्कार वा आभारप्रदर्शन कशासाठी करायचे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. त्याचे साधे उत्तर हे आहे की, या बंगाली बाबूने थेट ब्रिटनमधून महानगरी बॉम्बेबद्दल अत्यंत महत्त्वाचे संशोधन मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बॉम्बेचे खरे नाव बॉम्बेच. शिवसेनेने त्याचे मुंबई असे नामांतर केले, ते हिंदू राष्ट्रवादी भावनेतून. त्यामुळेच अमोलबाबू राजन यांनी आपल्या उपसंपादकवर्गास सक्त सूचनाच दिली आहे, की यापुढे बॉम्बेचा उल्लेख बॉम्बे असाच करायचा. त्यास मुंबई असे अजिबात म्हणायचे नाही. शिवाय त्यांनी हे जाहीरही केले आहे. ब्रिटिशांचे राज्य भारतावर होते तेच बरे, अशी ट्विप्पणी करून फेसबुकचे संचालक मार्क अँड्रीसेन हे माफी मागून टाकण्याच्या बेतात होते, त्याच दिवशी हा ‘इंडिपेन्डन्ट’ निर्णय जाहीर करताना यांनी काही ऐतिहासिक गैरसमज दूर केले आहेत! त्यातील पहिला गैरसमज असा की, शिवसेनेने मुंबईचे नामांतर केले ते मराठीच्या प्रेमातून आणि प्रांतीयवादी भूमिकेतून. तर ते तसे नसून, ‘हिंदू राष्ट्रवादी भूमिकेतून’ शिवसेनेने ते पाऊल उचलले आहे. हे अर्थातच शिवसेनेला भूषणास्पद वाटेल. कदाचित त्यामुळेच शिवसेनेने अद्याप इंडिपेन्डन्टचा अंक वगैरे जाळल्याच्या बातम्या कानावर आल्या नाहीत. राजन यांनी दुसरा गैरसमज दूर केला आहे. तो म्हणजे आजवर अनेकांचा असा समज होता, की बॉम्बेचे खरे नाव मुंबई हेच आहे. परंतु ते तसे नाही. आता गोविंदराव माडगावकर यांनी १८५८च्या आसपास लिहिलेल्या शहरवर्णनपर पुस्तकाचे नाव मुंबईचे वर्णन असे आहे. त्यात त्यांनी ‘काय हो मुंबई बंदर उमदा कोटय़वधि फिरतात जहाजे। अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे।।’ असे गीत देऊन मुंबईच्या इंग्रजाळलेल्या रूपाची माहिती दिली आहे. हे सर्व खरे मानले तरी मुंबईचे खरे नाव बॉम्बेच मानावयास हवे, कारण त्या नावामुळे ही मायानगरी कशी एकदम खुली, कॉस्मोपॉलिटन होऊन जाते. शेक्सपियरसारखे काही अडाणी लोक उगाच म्हणतात, की नावात काय आहे? राजन यांनी हे दाखवून दिले आहे, की नावामुळे शहराचे रूपही बदलते. हे केवळ राजन यांचेच म्हणणे आहे अशातला भाग नाही. त्यांचे काही भाऊबंद येथे आहेत त्यांनाही तेच वाटते. एकंदर काय, तर बॉम्बेच्या खऱ्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. एकदा ते झाले, की मग बहुधा कॅलकटा, मद्रास अशी काही शहरे आणि बर्मासारखे देश यांचे जे अ-कॉस्मोपॉलिटनी नामांतर झाले आहे त्याबद्दलही निर्णय घेता येईल. त्यानिमित्ताने समोर येणाऱ्या सामाजिक इतिहासास आपले मूळ बंगाली बाबू अमोल राजन यांच्या सन्मानार्थ, इंडिपेन्डन्ट इतिहास असे म्हणता येईल.

Story img Loader