ते पुन्हा बोलले. याआधी जे बोलल्यानंतर त्यांनी उगीचच, खोटीखोटीच सारवासारव केली होती, तेच वाक्य ते पुन्हा एकदा बोलले. आता त्यांच्या वाक्याचे बाण ज्यांना ज्यांना टोचले, ते सारे जण भाऊंचे ते वक्तव्य तपासून घेण्यासाठी जाणकारांची मदत घेत असतील. ते नेमके कुणाला उद्देशून बोलले, याचा निकाल होईपर्यंत सारे जण अस्वस्थ राहतील. ते आपल्याला उद्देशून तर बोलले नसतील?.. त्यांनी आपल्यालाच तर टोला मारला नसेल?.. अशा शंकेने अनेक जण अस्वस्थही झाले असतील. पण नितीनभाऊंचे तसे लपूनछपून काहीच नसते. जे काही असेल, ते सरळ, स्वच्छ आणि थेट तोंडावर बोलायचे, असा त्यांचा रोखठोक बाणा असल्याने, ते कोणास बोलले ते त्यांच्या आसपास असलेल्यांपैकी कोणा तरी एखाद्याने तरी नक्कीच ओळखले असणार.. त्यामुळे जाणकारांनी आता आपल्या शोधाची मोहीम त्या दिवशी नितीनभाऊंसोबत असलेल्यांच्या दिशेने वळविली असल्याची चर्चा आहे. ‘यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश अनाथ असते’, असा एक मौलिक ‘राजकीय सुविचार’ मागे एकदा नितीनभाऊंच्या मुखातून लोकांनी ऐकला, आणि सारे कान टवकारले. नितीनभाऊंचा रोख ‘वरच्या’ दिशेनेच होता, यावर छातीठोक पैजा सुरू झाल्या, तेव्हा भाऊ मात्र, मिस्कीलपणे गालात हसत मजा बघत होते. इकडे ‘वर्षां’पासून ‘वांद्रय़ा’पर्यंत आणि जालन्यापासून दिल्लीपर्यंत प्रत्येकालाच या टोमण्यातील बोचरे शब्द अस्वस्थ करू लागले. भाऊ मात्र, बोलून गेल्यावर शांतपणे बदलत्या वाऱ्यांचा अंदाज घेत हसत होते. ‘एक वेळ हिजडय़ाला मुले होतील, पण आमचे सिंचन प्रकल्प काही पूर्ण होणार नाहीत’ असे नितीनभाऊ त्या दिवशी हसत हसत म्हणाले, तेव्हा दादांपासून गिरीशभाऊंपर्यंत सगळ्यांच्याच जिभेची चव काही काळ नाहीशी झाली होती म्हणतात.. त्यांच्या पोतडीत असे टोकदार बाण कुठून येतात, आणि एकाच बाणात अनेकांना घायाळ करण्याची ताकद कशी असते, याचाही जाणकारांनी शोध सुरू केला आहे, अशीही चर्चा आहे. नितीनभाऊंनी आपल्याच दिशेने बाण मारला, असे अनेकांना वाटते, तेव्हा त्यांचा बाण नेमका एकाच दिशेने जाऊन नेमक्या निशाण्यावर आदळलेलादेखील असतो, एवढाच निष्कर्ष सध्या तरी जाणकारांनी काढल्याचे समजते. ‘स्वप्ने पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची जनता धुलाई करते, त्यामुळे पूर्ण करता येतील अशीच स्वप्ने जनतेला दाखवावीत’ असे रविवारी मुंबईत नितीनभाऊ म्हणाले, आणि पुढच्याच क्षणाला त्यांचे हे शब्द वाऱ्यासोबत दिल्लीपर्यंत पोहोचले. पण हे वारे जाता जाता आसपासही घुटमळले, वांद्रय़ालाही रेंगाळले.. शिवसेनेवर नाराज होऊन भाजपवासी झालेल्या हाजी अराफत शेख यांना पक्षात घेत त्यांच्यावर वाहतूक विभागाची जबाबदारी भाऊंच्या हस्ते सोपविण्यात आली. शिवसेनेत अनेक वर्षे वावरलेल्या शेख यांना तेव्हा भाऊंचे हे शब्द ऐकताना कोणत्या नेत्याचे चित्र साकारले असेल, आणि या कार्यक्रमात हजर असलेल्या भाजपच्या नेत्यांना कोणता नेता नजरेसमोर आला असेल, हे ओळखणे फारसे अवघड नाही. नितीनभाऊ रोखठोक बोलतात, पण ते नेमके कोणाला बोलतात, हे गुलदस्त्यात असले तरी त्यांच्या बोलण्याच्या इकडेतिकडे झेपावणाऱ्या बाणांची आतषबाजी पाहताना जनतेला मात्र मस्त मजा वाटते हे खरे!

Story img Loader