आपत्ती कधीच अचानक अंगावर आदळत नसते. ती पूर्वसूचना देत असते. तिच्या केंद्रिबदूतील उलथापालथी जाणून घेण्यात आपण कमी पडतो, किंवा बऱ्याचदा आपण आपल्याच मस्तीत मश्गुल असल्यामुळे, पूर्वसूचनांकडेही दुर्लक्ष करतो. मग आपत्ती समोर उभी ठाकली, की, तिला अंगावर घ्यावे की पळ काढून लपून बसावे हेदेखील सुचेनासे होते. सध्या सुरू असलेल्या वादळांमुळे काहीशी अशीच अवस्था झाली आहे. सारे काही सुरळीत सुरू असतानाच निरभ्र आकाशात अचानक ढगांची दाटी झाली, विजांचा कडकडाट सुरू झाला, सोसाटय़ाचे वारे सुटले आणि पाठोपाठ आलेल्या वादळी पावसामुळे बघता बघता तरारलेली रोपे जमिनीवर आडवी झाली. हीच पिके काही वेळाआधी डौलाने डोलत होती. पोटरीवरल्या लोंब्यांमध्ये आत्ता कुठे दाणे भरायला सुरुवात झाल्याने वाऱ्यासह झोके घेताना, असे काही अचानक अंगावर आदळेल हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. हाच वारा अचानक वादळ होऊन आपल्यालाच आडवे करून टाकेल हे त्यांना वाटलेदेखील नव्हते. याच बेफिकीरपणामुळे अचानक या आपत्तीने त्यांना गाठले. बहुधा, बरेच दिवसांपासून पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आपत्ती जणू नेमक्या संधीची वाटच पाहात होती. सारे आलबेल आहे, आणि जे ठरलंय, तसंच होणार अशाच समजुतीत असताना त्या आपत्तीने संधी साधली.. हीच ती वेळ असे म्हणत अंगावर आदळली.. आपत्तीच्या अशा अनपेक्षित आगमनामुळे काही क्षण पिकांना काहीच सुचेना. धुवांधार वाऱ्यापावसापासून बचाव करणेच योग्य असे समजून पिके निमूटपणे जमिनीवर आडवी झाली, आणि आपत्ती आणखी कोणाचे काय करून जाते हे भेदरल्या नजरेने न्याहाळू लागली. वरून पाऊस कोसळतच होता.. त्याच पावसात, एखादा जुनापुराणा वृक्ष मात्र ताठपणे आपत्तीसमोर उभा ठाकतो आणि संकटात सापडलेल्या सर्वानाच त्याचे कोण कौतुकही वाटू लागते. आता हे वादळ आणि कोसळता पाऊस काहीतरी वेगळेच घडविणार, जे ठरलंय, ते पार पडणार की नाही या शंकेने पिके आणखीच गारद झाली आहेत.. वादळ अजूनही घोंघावत आहे.. सोसाटय़ाच्या वाऱ्याशी धसमुसळेपणा करणारा पाऊस राज्याला झोडपून काढतच आहे, आणि ठरल्याप्रमाणे सारे काही पार पडणार या विश्वासाने वावरणारी पिके गपगार पडली आहेत. हे वादळ कधी थांबेल त्याचा अंदाजच येत नसल्याने, जे होईल ते पाहावे, असे म्हणत शांत पडून राहिली आहेत.. एका बाजूला ही स्थिती असताना, कालपरवापर्यंत कोमेजलेली आणि सारा तजेला हरवून गेलेली काही पिके मात्र, अवकाळी पावसानेही तरारून उठली आहेत. हाही पाऊस आपल्या नव्या जगण्याची संजीवनी ठरेल, अशा जाणिवांनी त्यांना तजेला आला आहे.. पण उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. कारण चार वादळे झेलण्याची वेळ महाराष्ट्रावर याआधी कधी आलीच नव्हती. गेल्या ११७ वर्षांत म्हणे असे घडले नव्हते. त्यामुळे वादळ कधी शमते एवढी एकच प्रतीक्षा आहे.. एकाच पावसाने पार धुतली गेलेली पिके उद्याच्या उन्हाच्या आशेने तग धरून राहण्यासाठी धडपडत आहेत.. आपत्तीने दिलेल्या पूर्वसूचना लक्षात घेतल्या असत्या, तर त्यातून स्वतस सावरण्यासाठी वेळीच काहीतरी करता आले असते, या विचाराने ती आडवी पिके आता अस्वस्थ आहेत..
अशी वादळे येती..
वादळ अजूनही घोंघावत आहे.. सोसाटय़ाच्या वाऱ्याशी धसमुसळेपणा करणारा पाऊस राज्याला झोडपून काढतच आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 06-11-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arabian sea four hurricanes in one year abn