अहोरात्र ईश्वरभक्तीत रममाण झालेल्या त्या भक्तावर अखेर भगवंत प्रसन्न झाला, आणि एका सुप्रभाती तो भक्तासमोर अवतरला. त्या तेजाने भक्ताचे डोळे दिपले, पण लगेचच त्याने स्वत:स सावरले. आत्मोद्धारासाठी भगवंतास साकडे घालण्याची हीच वेळ आहे, हे भक्ताने ताडले. त्याच्या या भक्तीने भगवंतासही भावनावेगाचे भरते आले.. ‘ऊठ भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न आहे!’ ..भगवंताने भक्तास उठवून बाजूच्या आसनावर बसविले. आता भक्ताच्या मनात शंकांचे काहूर माजू लागले होते. भगवंतास विचारावयाच्या प्रश्नांची मनातल्या मनात उजळणी करत असतानाच भगवंताने त्याच्या मनातील शंका अंतज्र्ञानाने ताडल्या व त्याने बोलावयास सुरुवात केली..‘हे भक्ता, मी सर्वत्र आहे. चलाचलांमध्ये मी आहे!’ ..भक्त भारावून गेला होता. कुरुक्षेत्रावर भगवंतासमोर हात जोडून गुडघे टेकलेला अर्जुन आणि विश्वरूपदर्शन घडविणाऱ्या श्रीकृष्णाचे ते प्रसिद्ध कॅलेंडरचित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. तोही तसेच गुडघे टेकून भगवंतासमोर बसला. ‘हे भगवंता, तुम्ही आम्हाला वचन दिले होते.. संभवामि युगे युगे. त्याचे काय झाले?’ भक्ताने थेट प्रश्न विचारला. ‘ते निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनासारखे तर नव्हते ना?’ असे विचारावे असेही त्याच्या मनात आले होते, पण त्याने तो प्रश्न मनातच गिळून टाकला. तरीही भगवंताने तो अंतज्र्ञानाने ओळखलाच. भगवंतांनी स्मित केले, आपले उत्तरीय सावरले, नजर भक्ताच्या नजरेत मिसळली, आणि ते बोलू लागले. ‘हे भक्ता, सांप्रतकाळी ज्ञानप्राप्तीची, ज्ञानसंकलनाची असंख्य साधने उपलब्ध असली, तरी सर्वानाच सर्वकाळ ज्ञानप्राप्ती होतेच असे नसते. आमच्या अस्तित्वाची जाणीव सदैव सर्वास होत नसते. काही पुण्यात्म्यांनाच आमच्या अस्तित्वाची जाणीव होते. आमच्या अस्तित्वाचा वास ज्याला जेथे जाणवतो, तो त्या ठिकाणी आमची पूजा करतो. आम्ही कधी सजीवामध्ये असतो, कधी निर्जीवातही आमचे अस्तित्व दिसते.

आता हेच पाहा ना.. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका भक्त अवधूताने, आमचा अकरावा अवतार कोठे आहे, हे शोधूनही काढले होते. साहजिकच आम्ही त्याच्यावर प्रसन्न झालो, पण तुम्ही मर्त्य मानवांनी त्या वेळी त्याची खिल्ली उडविली. संभवामि युगे युगे या आमच्या आश्वासनाचा तुम्हास विसर पडला, पण त्या भक्ताला समयभान होते. कोण आपणांस तारणार, याची जाण होती. असे भक्त अन्यत्रही आम्हास आढळतात, तेव्हाही आम्हास समाधान होते, व आम्ही त्याच्यावर प्रसन्न होतो. शेवटी, ज्यायोगे भक्तास यशप्राप्ती, धनप्राप्ती व भरभराट प्राप्त होते, त्या वस्तूत, सजीवात किंवा समष्टीमध्ये त्याला आमचा नवनवा अवतार दिसतो, हेच सत्य आहे.

असाच एक भक्त काल आम्हास भेटला. छत्तीसगडच्या नवागढ मतदारसंघात. खुद्द छत्तीसगडातील सहकार व सांस्कृतिक कार्यमंत्री! त्याने आमचा बारावा अवतारही शोधून काढला. मतदानाआधी त्याने ईव्हीएमची पूजा केली, तेव्हाही तुम्ही त्याची नेहमीप्रमाणे खिल्ली उडविलीत.

पण उद्धारकर्त्यां भगवंताचे अवताररूप ईव्हीएममध्येच आहे, हे त्याने बरोबर ओळखले. त्याच्यासाठी आम्ही बारावा अवतार ठरलो.. तेव्हा हे भक्ता, तूदेखील तुझ्या उद्धाराचा मार्ग शोध, तेथे मी दिसेन. तो तुझ्यासाठी तेरावा अवतार असेल’.. भक्ताने हात जोडले. डोळे मिटून नमस्कार केला. क्षणभराने त्याने डोळे उघडले, तेव्हा भगवंत अदृश्य झाले होते..