कित्येक वर्षे केवळ चर्चेतच असलेल्या सामाजिक क्रांतीचा तो टप्पा अखेर दृष्टिपथात तरी आला आहे. अमेरिकेत शंभर वर्षांपूर्वी याच नावाच्या क्रांतीची पहिली बीजे रोवली गेली. गेल्या १०० वर्षांच्या खडतर वाटचालीनंतर त्यांचे स्वप्न वास्तवाच्या वाटेवर दाखल झाले. आपल्याकडे आता नुकती या स्वप्नाची बीजे आकारू लागली आहेत. राष्ट्रीय महिला पार्टी या नावाने स्थापन झालेल्या पक्षाच्या झेंडय़ाखाली समान हक्काच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या असंख्य महिला येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिसतील. गेल्या कित्येक वर्षांपासून महिला सबलीकरण हा देशात केवळ चर्चेपुरत्या परवलीचा शब्द बनला. कोणत्याही प्रश्नाचे, विकासाचा अनुशेष दूर करण्याचे, सामाजिक असमानतेच्या समस्येचे उत्तर केवळ महिला सबलीकरणातच आहे, हे समाजाच्या मनावर ठसविण्याचा काही नेत्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्नही समाजाने दूरचित्रवाणीवरील काही मुलाखतींमधून अनुभवला. महिलांना राजकारणात समान संधी मिळाल्याखेरीज सबलीकरण शक्य नाही, हे वास्तव अधोरेखित होऊनही, महिलांसाठी राजकारणात आरक्षण ठेवण्याचा मार्ग मात्र खडतरच राहिला. या हक्कासाठी लढा देण्याची गरज अधोरेखित झाली, आणि त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला, हे या होऊ घातलेल्या क्रांतीचे आगळेपण! देशात केवळ महिलांचा, महिलांनी स्थापन केलेला आणि महिलांच्या हक्कासाठी राजकारण करणारा ‘राष्ट्रीय महिला पार्टी’ नावाचा एक पक्ष जन्माला आला आहे, ही बातमी एव्हाना समाजापर्यंत पोहोचलीच असेल. खरे तर, गेल्या महिन्यातच दिल्लीत त्या पक्षाची औपचारिक स्थापना झाली, आणि सोमवारी मुंबईत त्याची घोषणा झाली. हा पक्ष महिलांचा आहे, मातांचा आहे, आणि महिला व मातांच्या राजकीय हक्कांसाठी हा पक्ष प्रस्थापित राजकारण्यांसमोर दंड थोपटून उभा राहणार आहे. महिलांना वैधानिक संस्थांमध्ये पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे यासाठी लोकसभेच्या ५४५ जागांपैकी ५० टक्के जागांवर हा पक्ष निवडणूक लढविणार आहे, आणि सत्तेच्या राजकारणात उतरणार आहे, हे या क्रांतीचे पहिले पाऊल!.. खरे म्हणजे, महिलांचे सबलीकरण हा महिलांपुरता मुद्दा नाही, तर समाजाने त्यासाठी सामूहिक काम करण्याची गरज आहे. काही राजकीय पक्षांत तर महिला नेतृत्वाची परंपराच एवढी गहिरी आहे, की असे नेतृत्व करणारी महिला ही केवळ राजकीय नेता नसते, तर त्या पक्षाच्या मातृस्थानी असते. या महिलांच्या असामान्य कामगिरीच्या गौरवासाठी ‘एक महिला, लाख महिला’ असे वर्णनही अपुरे पडावे! साध्या मंदिरप्रवेशासाठी जिथे संघर्ष करावा लागतो, तेथे राजकारणात आणि संसदेत समान जागांवर प्रतिनिधित्व मिळविण्याचा संघर्ष किती खडतर असेल, याची जाणीव असूनही राष्ट्रीय महिला पक्षाने राजकारणाच्या रिंगणात पहिले पाऊल टाकले आहे. खरे म्हणजे, राजकारण हेच एक टॉनिक असते. सबलीकरणाच्या संघर्षांवर हा एक चांगला पर्यायही असतो. राष्ट्रीय महिला पार्टीने राजकारणात उतरण्याचे ठरविले तर आहेच. त्यांना सत्तेचे टॉनिक मिळालेच तर सबलीकरणाचा संघर्ष संपेल का? या पक्षाच्या स्थापनेतून सबलीकरणाच्या, महिलांचे आत्मभान जागे करण्याच्या पर्यायाची पाऊलवाट तरी आखली गेली आहे. संसदेपासून सर्वत्र महिलांना पुरुषांच्या बरोबरीने, ५० टक्के आरक्षणाचा हक्क मिळवून देण्याकरिता सुरू झालेल्या या लढाईला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा