या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लष्करी पोषाखासारखा पोषाख हवाच.. फेरविचार कसला?’ दोंदावरचा पट्टा सावरत नाना गरजले. तुंदिलतनु नानांचा आवाज थोडा सानुनासिक असला, तरी बोलण्याची ढब अशी की, चारचौघे ऐकत राहातील! आताही तसेच झाले. एटीएम केंद्राच्या आत जाण्यापूर्वी नाना तात्यांशी बोलताना गरजले, पण शेजारच्या पदपथावर खरेदी करणारे चारचौघे नव्हे, चांगले आठदहा जण नानांकडे पाहू लागले. त्यापैकी एकदोघांचे चेहरे तर गोरेमोरे झाले होते. या आठदहाच काय, पदपथावरल्या कुणाचेही कपडे लष्करी पोषाखासारखे नव्हते.

पण नाना देशाचा- किंवा राष्ट्राचाच- विचार करणारे. त्यांचा रोख पदपथावरल्या जनतेवर नसून तो राज्यसभेतील मार्शल या पदनामानेच ओळखल्या जाणाऱ्या कर्मचारीवृंदावर होता. राज्यसभेच्या सभापतींचे  संसद भवनाच्या द्वार क्र.११ वर दररोज स्वागत करून सभागृहातील त्यांच्या आसनापर्यंत नेणे, सभागृहाचे कामकाज सुरू असताना त्यांच्याशेजारी- दोन बाजूंना दोन याप्रमाणे- उभे राहणे, राज्यसभेच्या सभागृहात शांतता आणि सुव्यवस्था राखणे आणि सभापतींचा आदेश असल्यास प्रसंगी एखाद्या चुकार सदस्याला सदनाचा दरवाजा दाखविणे हे या मार्शल मंडळींचे काम. संसदेचा अपमान करण्याची यत्किंचितही इच्छा नसूनसुद्धा, या कामाचे काही तपशील हे सुरक्षा-रक्षकाच्या कार्याशी संबंधित आहेत, असे कुणालाही वाटावे. परंतु नानांना तसे वाटत नसावे. राष्ट्राच्या संसदेची पायरीही लवून प्रणाम करण्याएवढी पवित्र, असेच ते मानतात. हल्ली राज्यघटनेलाही ते प्रात: स्मरणीय मानतात. परंतु लष्कराविषयीचे त्यांचे आकर्षण त्याहीपेक्षा जुने. याच एटीएम केंद्रानजीक २०१६ च्या नोव्हेंबरात, नानांनी अनेकांना लष्कराच्या त्यागाची आठवण करून दिली नव्हती काय? असो. नसेल स्मरत तर राहू दे. राज्यसभेतील मार्शल मंडळींना अगदी कालपरवाच नवा गणवेश मिळाला, तो लष्करी पोषाखासारखाच असल्याचे अनेकांना रुचलेले नाही आणि म्हणून या गणवेशाचा फेरविचार होणार आहे, हे नानांना अजिबात पटलेले नाही असे त्यांचा चेहराच सांगत होता. पोटावरील सदऱ्याची सुटलेली गुंडी जणू त्यांच्या संतापदग्धतेची साक्ष देत होती. ज्या पवित्र सभागृहाचा अभिमान नानांना आहे, त्याच सभागृहात काही अपवित्र महाभाग आजही आहेत, असा तो संताप असावा. पण नानांचा संताप तो. नेमका कुणावर असेल काही सांगता येत नाही. नाना एटीएम केंद्राच्या बाहेर आले, ते दोन हजाराची नोट हाती घेऊन. तात्यांकडे पाहात त्यांनी त्रासिक चेहरा केला आणि थेट समोरच्या फूलवाल्याकडे जात नाना गरजले.. ‘आहेत का रे सुट्टे?’ तात्यांना आठवले, अशाच फिकट गुलाबी रंगाचा सदरा आणि त्यावर पगडीसारखा तुरेदार ‘साफा’, असा मार्शलचा गणवेश असायचा यापूर्वी!  फेरविचार समजा, २०१६च्या नोव्हेंबरातच झाला असता तर?