राजकारण हा तर जिवंतपणाचा खळाळता प्रवाह.. ते कुणासाठी थांबत नसते. काळाबरोबर ते पुढे जाते, तेव्हा मागे कोण राहिले त्याचीही राजकारणास पर्वा नसते. थोडक्यात, राजकारणातील भूतकाळ हा केवळ इतिहास असतो, आणि वर्तमानाशी त्याचा संबंध असतोच असे नाही. जुनेजाणते, भूतकाळात कधी काळी राजकारणाचा वर्तमानकाळ गाजविलेले अनेक जण त्यांच्या काळाच्या आठवणींमध्ये बुडून उसासे टाकताना दिसतात, तेव्हा त्यांनाही  या वास्तवाची जाणीव असते. राजकीय परिभाषा बदलतात, वेष बदलतात आणि मुखवटेही बदलतात हे त्यांना पक्के माहीत असते.  म्हणूनच, कधीकाळी लाखोंच्या संख्येने गांधी टोप्या विकणारा खादी ग्रामोद्योग संघाचा एखादा पदाधिकारी, टोप्यांचा खप खालावल्याची खंत व्यक्त करतो. टोप्यांचा जमाना मागे पडला हे त्यालाही माहीत असते. त्या काळी, जेव्हा  खादी ग्रामोद्योगात लाखो गांधी टोप्यांची मागणी होत असे, तेव्हा त्या टोप्या स्वतच्या डोक्यावर घालून राजकारणात उतरणारे कार्यकर्ते असत. पुढे काळ बदलला, आणि जनतेला टोप्या घालण्याचे राजकारण सुरू झाले. शिवाय, याची टोपी उडव, एखाद्याची टोपी दुसऱ्या  कुणाला तरी घाल, असे खेळ सुरू झाले, आणि एकच टोपी अनेकांच्या डोक्यावर घालण्यात राजकारणी लोक मातब्बरही झाले. साहजिकच, राजकीय वर्तुळात वावरणाऱ्यांना स्वतच्या डोक्यावर घालण्यासाठी टोप्यांची गरज राहिली नाही. जेव्हा गरज नसते, तेव्हा मागणी घटते, आणि त्या वस्तूला किंमतही राहात नाही, हा एकूणच ‘अर्थ’शास्त्राचा सिद्धान्तच आहे. टोप्यांची गरज राहिली नाही, आणि गांधी टोप्या खुंटीवरही दिसेनाशा झाल्या. मध्यंतरी आपल्या डोक्यावरची टोपी सरसावून एका अण्णाने दिल्लीच्या राजकारणात जंतरमंतर करून वादळ माजविले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या टोपीखाली काय दडलंय, याची उत्सुकता देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली, आणि जनतेनेही डोक्यावर स्वतहून गांधी टोपी चढवून घेतली. प्रत्येकासच, आपणच अण्णा आहोत, असेही वाटू लागले. पण परिवर्तनाचा नियम तेथेही लागू झालाच. अण्णा टोपीचा काळ  संपला. पुढे काहींनी नवीनच टोपी आपल्या डोक्यावर चढवून, आपण आम आदमी आहोत असे जाहीर करीत सत्ता गाठली. पण परिवर्तन होतच असते. नेहमी डोक्यावर गांधी टोपी कशाला हवी, असे वाटणाऱ्या काही पुरोगामी आणि जाणत्या नेत्यांनी फुले पगडीचा आग्रह धरला, आणि फुले पगडी की टिळक पगडी अशा वादाची राळ मराठमोळ्या राजकारणात उडू लागली. फुले पगडी डोक्यावर चढविणाऱ्याच्या कपाळावर राजकीय गोटाचा शिक्का बसला, आणि पुणेरी टिळक पगडीवाल्यांच्या कपाळावरही एका गोटाचा शिक्का बसला. पण राजकारणाचा परिवर्तनाचा वेग अन्य परिवर्तनांपेक्षा कितीतरी अधिकच असतो. बघता बघता पुणेरी आणि  फुले पगडय़ांचे राजकारण मागेदेखील पडले, आणि टोप्यांची जागा ‘कॅप’ने घेतली. आता डोक्यावरच्या कॅपवरून राजकीय पक्षाचे  कार्यकर्ते ओळखले जातात. त्याचे लोण एवढे पसरले, की अजाणत्या बालकांनाही कॅपच्या राजकारणात गुरफटविले गेले. लहान मुलांची कॅपची आवड ही राजकारणाशी नव्हे, तर  त्यांच्या बालमनाशी जोडलेली असली, तरी कुणी बालकाने कोणती टोपी चढविली आणि कोणती टोपी नाकारली, हाही राजकीय चर्चेचा मुद्दा होतोच! थोडक्यात, कसेही असले तरी राजकारण टोपीभोवती फिरत असते  हे खोटे नाही..

Story img Loader