सामान्यांच्या भाषेत त्याला ‘वरचे सभागृह’ म्हणतात. या सभागृहात ज्येष्ठ, विचारवंत, कलावंत आदी आदरणीय व्यक्तींची सदस्य म्हणून निवड होत असल्याने, साहजिकच येथे व्यक्त होणाऱ्या मतास किंवा विचारास वेगळे महत्त्व असते. त्यावर गांभीर्याने चर्चाही होत असते. याच सभागृहात शिवसेनेचे संजय राऊत यांनी अलीकडेच एका वेगळ्याच मुद्दय़ास हात घातला. त्यावर सरकारला गांभीर्याने संशोधन करावे लागणार असले, तरी तो मुद्दा मराठी माणसासाठी वेगळ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरतो. कोंबडी किंवा अंडे हा शाकाहारी अन्न प्रकार आहे की नाही, याचा निर्णय सरकार घेईल तेव्हा घेईल, पण तोवर महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील तमाम मराठीजनांनी मात्र, सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. संजय राऊत यांच्या दिव्यदृष्टीचा नवा आविष्कार या मुद्दय़ामुळे देशासमोर प्रकटला आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणे हे राऊत यांच्या शिवसेनेच्या स्थापनेचे आद्य उद्दिष्ट होते. राजकारणाच्या गदारोळात अनेकांना त्याचेच विस्मरण झाले ही बाब अलाहिदा असली, तरी मराठमोळ्या संजय राऊत यांना त्याचा विसर पडलेला नाही, हेच त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या या वेगळ्या वादातून स्पष्ट झाले आहे. आपणा सर्वास हेदेखील माहीत आहे की, आजकाल परप्रांतीयांचे बाहुल्य असलेल्या निवासी इमारतींमध्ये धार्मिक भावनांच्या आधारावर मांसाहार करणाऱ्या मराठी माणसास घरे खरेदी करण्यास छुपी मनाई करण्याचे प्रकार वाढल्यामुळे महानगरी मुंबईत माजलेल्या तीव्र असंतोषाला वाचा फोडणे हे भावनिक वा राजकीयदृष्टय़ा सोपे काम नाही. अर्थात, शिवरायांच्या गनिमी काव्यावर शिवसेनेचा भर असल्यामुळे, राजकारणासारख्या नाजूक मुद्दय़ाच्या जंजाळात न गुरफटता हा गुंता सोडविण्यासाठी असाच काही गनिमी कावा शोधावा लागेल, असा विचार राऊत यांच्या मनात पूर्वीपासूनच घोळत असावा. जिथे कांदालसणाच्या वासालादेखील अनुमती नाही, अशा जागी मांसाहारी मराठी माणसास घरे मिळवून देताना या गुंत्याचा अडसर दूर करण्याची युक्ती राऊत यांच्या या मुद्दय़ाआड दडली असावी असे मानावयास मोठाच वाव आहे. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी समाजास केवळ वनौषधींच्या अन्नावर कोंबडय़ा पोसण्याचे तंत्र अवगत झाले असून वनौषधींचे सेवन करणाऱ्या या कोंबडय़ांचे सेवनही शाकाहारच ठरतो व या कोंबडय़ांची अंडी हा मांसाहार नव्हे, तर शाकाहारच आहे, असे केंद्र सरकारच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न राऊत यांनी या विद्वज्जनांच्या सभागृहात केला आहे. केवळ शुद्ध शाकाहारी वनौषधींच्या अन्नावर पोसलेल्या कोंबडय़ा व त्यांच्या अंडय़ांमध्येही वनौषधींचे गुणधर्म असल्याने मानवी आरोग्याच्या दृष्टीने या कोंबडय़ा-अंडय़ांचे सेवन केवळ शुद्ध शाकाहारच नव्हे, तर पौष्टिकही असते, असे राऊत यांनी सांगितले तेव्हा सभागृहातील विद्वत्जन अवाक् होणे अनपेक्षित नव्हतेच. आता या कोंबडय़ांचे वा अंडय़ांचे सेवन हा मांसाहार नाहीच, असा निर्णय जर आयुष मंत्रालयाने घेतला, तर मुंबईसारख्या महानगरांतील कोंबडय़ा व अंडी खाणाऱ्या मराठी कुटुंबांसाठी त्या नियमावर बोटे ठेवणाऱ्या गृहनिर्माण सोसायटय़ांची दारे आपोआपच खुली होतील. कोणाच्याही भावना न दुखावता या पेचातून मध्यममार्ग काढण्याचा हा गनिमी कावा साधलाच, तर मांसाहारी असल्याच्या कारणावरून घरे नाकारली जाणाऱ्या मराठी माणसाचा दुवा त्यांना मिळेल, यात शंकाच नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा