ही नव्या युगातील एका बदलत्या राष्ट्रवादाची सत्यकथा आहे. या कहाणीची बीजे डिजिटल क्रांतीच्या सत्ययुगात रुजलेली असल्याने, साहजिकच जुन्या, बुरसटलेल्या कल्पनांना या कहाणीत थारा नाही. एक काळ असा होता, की ‘राष्ट्र प्रथम, व्यक्ती शेवटी’ असा नारा दिला गेला, की त्या काळातील तरुण पिढी भारावून तसा नारा देणाऱ्याच्या पाठीशी उभी राहात असे. काळ बदलत गेला आणि मोबाइल हे वैचारिक क्रांतीचे साधन ठरू लागले. असे झाले की, नव्या पिढीच्या पठडीबाज राष्ट्रभावनांना धक्का तर लागणार नाही याची चिंता राष्ट्रपुरुषांना सतावू लागते आणि हाती असलेल्या नव्या साधनांचा वापर करून जुनीच राष्ट्रभक्ती जागविण्याचे प्रयोग सुरू होतात. असे सर्वत्रच दिसते, पण डिजिटल क्रांतीमध्ये भरारी घेतलेल्या चीनने या प्रयोगांमध्ये आघाडी घेतली आहे. ‘राष्ट्र प्रथम’ असा नारा देता देता, पहिल्या क्रमांकाची ती जागा बेमालूम व्यापून टाकत, ‘व्यक्तीभक्ती हीच राष्ट्रभक्ती’ ही भावना रुजविण्याचा प्रयोग चीनमध्ये साकार झाला आहे. ‘माओनंतरचा सर्वात प्रभावी नेता’ अशी प्रतिमा असलेल्या क्षी जिनपिंग यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी ही डिजिटल क्रांती जन्माला आली आहे. युवकांच्या मनातील असंतोषाची बीजे पुसून टाकून, कम्युनिस्ट पक्ष हाच राष्ट्राचा भाग्यविधाता आहे आणि जिनपिंग यांचे विचार हाच राष्ट्रभक्तीचा एकमेव वारसा आहे हे ठसविण्याच्या या प्रयोगाने आतापर्यंत जालनिशीवर वावरणाऱ्या आठ कोटी तरुणांच्या मोबाइलमध्ये ‘अ‍ॅप’च्या रूपाने जागा मिळविली आहे. समाजमनातील नाराजी दूर करण्यासाठी मोबाइल या साधनाचा वापर करा, त्यावरील समाजमाध्यमांवर ताबा मिळवा, आभासी गप्पांचे मंच ताब्यात घ्या, डिजिटल वर्तमानपत्रे, वार्तापत्रांचा पाऊस पाडा, पण नाराजीच्या बीजांना मूळ धरू देऊ नका, असा आदेश क्षी जिनपिंग यांनी चार महिन्यांपूर्वी आपल्या ताफ्यातील डिजिटल क्षेत्रातील तज्ज्ञांना दिला आणि त्यासाठी संशोधकांची फळी कामाला लागली. आता ‘क्षी कल्ट’ नावाच्या मोबाइल अ‍ॅपच्या रूपाने त्याला फळ आले आहे. या अ‍ॅपवर जिनपिंग यांची भाषणे, प्रेरणादायी वक्तव्ये, व्हिडीओ आणि दौऱ्याचे तपशील आहेत. ते वाचून, शेअर करून आणि पॉइंट्स मिळवून आकर्षक बक्षिसांचे गाजरही तरुणांना दाखविण्यात आल्याने, काहींना हे अ‍ॅप म्हणजे आपत्ती वाटू लागली असली तरी लाखो तरुणांना या अ‍ॅपचे वेड लागले आहे आणि ‘जिनपिंग यांचे प्रखर विचारधन हाच राष्ट्रवाद’ अशी नव्या राष्ट्रवादाची व्याख्या जन्म घेऊ लागली आहे. चार दशकांपूर्वी, सांस्कृतिक क्रांतीच्या जमान्यात चीनमध्ये असे मानसिक भारावलेपण होते, असे म्हणतात. तेव्हाची पिढी सकाळी जाग आल्यानंतर माओचे रेड बुक छातीशी धरून व माओ वचनांचे पठण करूनच दिवसाची सुरुवात करत असे. त्या विचारांनी भारावलेल्यांची पिढी घडविण्याची एक क्रांती त्या रेड बुकने घडविली होती. नव्या पिढीचे विचारही बदलत गेले. व्यक्ती म्हणजेच राष्ट्र आणि व्यक्तीभक्ती हीच राष्ट्रभक्ती ही डिजिटल युगाच्या राष्ट्रभक्तीची नवी व्याख्या क्षी जिनपिंग यांच्या दूरदृष्टीमुळे दृढ होऊ लागली आहे आणि  जिनपिंग हाच एकमेव पर्याय आहे अशी श्रद्धा मूळ धरू लागली आहे. दिवसागणिक या अ‍ॅपवर वाढणारा वावर हाच याचा पुरेसा पुरावा आहे.