‘आकाशात ढगांची दाटी झालेली असेल, विजांचा कडकडाट सुरू असेल, तर रडार यंत्रणेला विमानांचा थांग लागणे कठीण असते,’ हे नरेंद्र मोदी यांनी लष्करी दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले, म्हणूनच बालाकोटची कारवाई यशस्वी झाली हे आता तरी मान्य करावयास हवे. कारण मोदी यांना पहिल्यापेक्षाही बळकट जनादेश मिळाला आहे. एवढय़ा प्रचंड संख्येने जनता एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभी राहते,  तेव्हा त्याचे वचन हे अंतिम मानले पाहिजे, ही   तर इथली परंपराच आहे. याला कुणी अंधश्रद्धा म्हणोत, पण यामुळेच गुरुजनांचा सन्मान राखण्याची शिस्त पिढय़ान्पिढय़ांच्या अंगी बाणत गेली, आणि अस्सल भारतीय शिक्षण व्यवस्थेची पारंपरिक घडी कधीच विस्कटली नाही. आता  तर भारत महासत्ता होणार आहे, आणि देशाला विश्वगुरूची भूमिका निभावायची असल्याने, महासत्तेचा नायक म्हणेल तीच पूर्व हे मान्य करणे हा स्वयंशिस्तीचा आणि परंपरेच्या प्रामाणिक पालनाचाच भाग ठरतो. म्हणूनच, सत्ताधीशांच्या वचनास अंतिम सत्य मानून ते वचन हेच शास्त्र असल्याचे जनमानसात रूढ करणे हे या प्रक्रियेतील पहिले महत्त्वाचे पाऊल ठरते. एक वेळ सामान्यांच्या जगात एखाद्या गोष्टीवर वादविवाद होऊ शकतात. पण लष्करी शिस्तीत वादावादीस थारा नाही. वरिष्ठांच्या आदेशाचे आणि संकेतांचे निष्ठेने पालन करावयाचे एवढीच ज्या व्यवस्थेची संस्कृती असते, त्याच व्यवस्थेच्या प्रमुखाने पंतप्रधानांच्या वचनास दुजोरा द्यावा, हे तर त्या शिस्तीचे आगळे उदाहरण म्हणावे लागेल. खरे म्हणजे, वाऱ्यावादळाच्या आणि ढगाळ हवामानाच्या स्थितीत रडारला विमानांची चाहूल लागते किंवा नाही, हा मुद्दा निवडणुकीच्या हवामानात अधिक तापला आणि त्यावर घनघोर चर्चाही झाली. त्याचा योग्य तो परिणाम साधल्यानंतर निवडणुकीनंतर तो मुद्दा बाजूला पडला  असताना, पुन्हा हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पंतप्रधानांच्या त्या मतास दुजोरा देणारे वक्तव्य केले आणि पायदळाचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनीही त्याचीच री ओढली, हे योग्यच झाले. पण तरीही, या वादाचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच, आता एअर मार्शल रघुनाथ नंबियार आणि जनरल बिपीन रावत यांनी मोदींच्या ढग-रडार सिद्धान्तास दुजोरा दिल्यावर त्याची मीमांसा होणे गरजेचे आहे. असे काही सुरात सूर मिसळण्याचे प्रयोग सुरू झाले, की लोकांना प्रथेनुसार अशा अधिकाऱ्यांच्या निवृत्तीची तारीख दिसू लागते. मग मुदतवाढीचा वास येऊ लागतो. अगदीच तसे नसेल, तर निवृत्तीनंतरच्या पुनर्वसन प्रयोगांचीही शंका येऊ लागते. अशी चर्चा सुरू झाली, की मूळ सिद्धान्त बाजूला पडतो, आणि सुरात सूर का मिसळला याच चर्चेस जोर चढतो. एअर मार्शल नंबियार आणि सैन्यप्रमुख जनरल रावत निवृत्तीनंतर  काय करतील याचा वेध घेणाऱ्या रडार यंत्रणा कार्यक्षम झाल्या आहेत. आसपास कितीही ढग असले, तरी त्या यंत्रणा अशा मुद्दय़ांच्या भविष्याचा वेध घेऊनच स्वस्थ होतात. ढगाळ वातावरणात रडार यंत्रणांची विमानवेध घेण्याची क्षमता कमी होते किंवा नाही, हा आता कळीचा मुद्दा नाहीच. नंबियार-रावत यांच्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ नीतीचा भविष्यवेध मात्र या यंत्रणा नक्कीच घेतील. कारण, ही नीती कालातीत असते. ती केव्हा उफाळून येते, केव्हा थंड पडते, हे या रडार यंत्रणांना नेमके माहीत असते. त्यामुळे त्यांचा वेध सहसा चुकणार नसतोच. त्यांची भाकिते किती खरी ठरतात, ते पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. तेवढा संयम या यंत्रणांकडे नक्कीच असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा