आकाशात अचानक ढगांची दाटी व्हावी, अंधारून यावे आणि आता तो कोसळणार असे वाटत असतानाच अचानक सोसाटय़ाचे वारे सुरू होऊन पिंजलेल्या ढगांनी पळ काढून गायब व्हावे, तसे यंदाही पावसाबाबतचे हवामान खात्याचे अंदाजही वाऱ्यावरती विरून गेले. ‘येत्या ४८ तासांत पावसाचे आगमन होणार’ असे गेल्या अनेक दिवसांपासून छातीठोकपणे सांगणाऱ्या अंदाजांना अखेर मुहूर्त लागला, तरी महाराष्ट्राच्या ९२ टक्के आकाशास व्यापून राहिलेल्या ढगांनी मुंबईला हुलकावणीच दिली. अर्थात ‘मुसळधार पाऊस पडेल’ असा अंदाज खात्याने वर्तविला, की छत्री न घेताच घराबाहेर पडायचे आणि घामाच्या धारांनी चिंब होऊन संध्याकाळी घरी परतायचे, हेही मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहे. ‘आकाश निरभ्र राहील’ असा अंदाज असला की त्याच्या छातीत धस्स होते. पावसाच्या काळजीने त्याचे मन काळवंडते. अतिवृष्टीच्या जुन्या आठवणी त्याला छळू लागतात आणि छत्री-रेनकोट – शक्य तर दोन वेळच्या जेवणाचा डबादेखील- घेऊनच तो सकाळी घर सोडतो. अशा वेळी त्याचा अंदाज मात्र फारसा चुकलेलाही नसतो. कधी पावसात चिंब भिजणारा किंवा कडकडीत उन्हात हातातली रेनकोटची घडी सावरत फिरणारा कुणी दिसला, तर त्याने हवामान खात्याचा अंदाज कुठे तरी वाचला आहे आणि तो मुंबईत नवखादेखील आहे, हे जुन्याजाणत्या मुंबईकरास माहीत असते. मुंबईच्या हवामानाचा नेमका आणि तंतोतंत अंदाज वर्तविणारे खाते अजून अस्तित्वात यायचे आहे, हेही मुंबईकरास माहीत असते. मंगळवारीही, मोसमी वाऱ्यांसोबत आलेल्या ढगांनी महाराष्ट्रावर बरसण्यास सुरुवात केल्याची बातमी खात्याने माध्यमांद्वारे सर्वदूर पोहोचविली, तेव्हा मुंबईकर मात्र आकाशातल्या ढगांचा नेमका अंदाज घेत होता आणि नेहमीप्रमाणे छत्री-रेनकोट न घेताच घराबाहेरही पडला होता.. गावाकडचा शेतकरी अलीकडे हवामान खात्यावर फारच विसंबून राहू लागला आहे. अनेकदा या अंदाजांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवूनही शेतकऱ्याचे लक्ष खात्याच्या अंदाजावर खिळलेले असते. आकाशातला नैर्ऋत्येकडचा कोपरा न्याहाळून पावसाचे भाकीत वर्तविण्याची त्याची परंपरागत कला केव्हाच लोप पावली आहे. पक्ष्याची घरटी बांधण्याची लगबग आणि पावशा नावाच्या पक्ष्याचा दूरवरच्या रानात घुमणारा आवाज अलीकडे त्याला पावसाच्या पाऊलखुणांची चाहूल देत नाहीत. यंदा तर, ‘येत्या ४८ तासांत पाऊस येणार’ या हवामान खात्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला दिलाशाचा ओलावाही आता उन्हाळ्याने करपलेल्या धरणाखालच्या जमिनीसारखाच मनामनातून कोरडा होत चालला आहे. ‘९२ टक्के महाराष्ट्रावर बरसणाऱ्या’ त्या पावसाचा शोध घेण्यासाठी मुंबईकरांच्या नजरा भिरभिरू  लागल्या आहेत. वळणदार शिंगांचा, रंगीबेरंगी झूल मिरविणारा, काळ्याभोर डोळ्यांचा  आणि डौलदार वशिंडाचा एक नंदीबैल पूर्वी मुंबईकरांच्या दारोदारी यायचा आणि हलगीच्या तालावर मान डोलावून पावसाची वर्दी द्यायचा.. ‘पाऊस पडेल का’ या प्रश्नाला त्याने होकारार्थी मान हलवून दुजोरा दिला, की मुलांना रेनकोट चढवूनच शाळेत पाठविले जायचे आणि छत्री घेऊनच चाकरमानी घराबाहेर पडायचा..

आता हवामान खात्याने पावसाच्या अंदाजासाठी तसे नंदीबैलही पोसले तर?.. दुष्काळी छावण्यांच्या दावणीला बांधून घेऊन चारा-पाण्याची केविलवाणी प्रतीक्षा करणाऱ्या बैलांच्या रोजीरोटीचा प्रश्न तरी तात्पुरता सुटू शकेल! आणि अंदाज चुकला तरी कुणीच खिल्ली उडविणार नाही, हे वेगळेच!

Story img Loader