बदल ही जीवनातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे, असे कुणा ग्रीक तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे. कित्येक वर्षांपूर्वीचे त्याचे हे वचन आजही कालबाह्य़ ठरलेले नसल्याने, हे वचनदेखील बदलाएवढेच शाश्वत ठरले आहे. बदलाच्या या शाश्वत सत्याच्या नाकावर टिच्चून व काळाचे अंतर पचवून जशाच्या तशा अवस्थेत आजही शाश्वतपणे अस्तित्वात असलेल्या काही गोष्टींना मात्र बदलाच्या सिद्धान्ताचा स्वीकार करावा असे वाटू लागले आहे. अशा काही गोष्टींपैकीच एक म्हणजे, ज्योतिषशास्त्र आणि दुसरी म्हणजे, वास्तुशास्त्र! मुळात या दोन गोष्टींना शास्त्र म्हणावे का याबद्दलच वाद असला तरी सध्या ज्या वेगाने देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत ते पाहता या दोन बाबी शास्त्रच असल्याचे निर्विवादपणे- की निमूटपणे?- मान्य केले जाईल. कदाचित ही दोन शास्त्रे हीच अन्य अनेक शास्त्रांची जननी आहे असादेखील नवा शोध लागेल अशी शक्यता नाकारता येत नाही. मुळात बदलाचा वेध घेणे हीच प्रगतीची लक्षणे असल्याने व असा वेध घेणे हा संशोधनाचा पाया असल्याने, त्यासाठी भविष्यवेधी बुद्धी वा नजर आवश्यकच असते. ते पाहता, भविष्य हेच बदलाच्या जाणिवांचे शास्त्र असल्याचे स्पष्ट होते. हे जर का निमूटपणे मान्य केले, तर भविष्य हा ज्याचा पाया, ते ज्योतिष हे शास्त्रच ठरते हे नाकारताच येणार नाही. असे भविष्यवेधाचे अनोखे शास्त्र असलेल्या ज्योतिषविद्येची भूर्जपत्रे आपण वर्षांनुवर्षे उपेक्षित अवस्थेत पुराण्या पोथ्यांत बासनबंद ठेवून आपल्या भविष्याचा वेध घेण्याचा मार्ग बंद केल्याची जाणीव होणे ही खचितच कौतुकास्पद गोष्ट ठरते. या ज्योतिषशास्त्राचे अद्ययावत अध्ययन झाले पाहिजे असा निर्णय गोवा विद्यापीठाने घेतला आहे. आगामी काळात देशात जे काही बदलाचे वारे संभवतात ते पाहता, असा निर्णय घेणे व अशा शिक्षणक्रमांना प्राधान्य देणे ही खचितच एक भविष्यवेधी कृती ठरते. नव्या शैक्षणिक वर्षांच्या ‘सुमुहूर्ता’वर गोवा विद्यापीठात ज्योतिर्विद्य्ोचे शास्त्रीय शिक्षण देण्यास सुरुवात होईल. त्यासोबतच, वास्तुशास्त्रालाही या देशात उज्ज्वल ‘भविष्य’ आहे, हे वर्तमानातील या शास्त्राच्या व्यावसायिक लोकप्रियतेचा आलेखच सांगतो. या दोन शास्त्रांना विद्यापीठीय शिक्षणक्रमात स्थान मिळणे ही बाब पाहता, बदल ही जीवनातील एकमेव शाश्वत बाब असली, तरी बदल ही एक चक्राकृती प्रक्रिया असून ती सतत फिरत असते हेही सिद्ध होते. इतिहास ही भविष्याची ऊर्जा असते असे म्हणतात. गोवा विद्यापीठात हीच ऊर्जा पुनरुज्जीवित होणार आहे. काळाबरोबर ही शास्त्रेही प्रगत झालेलीच आहेत. आता कुंडली पाहण्यासाठी भृगुसंहिता पालथी घालावी लागत नाही. मोबाइल अॅपवरूनही ते काम होते. फक्त प्रशिक्षण केंद्रे ‘दक्षिणाभिमुख’ असणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. वास्तुशास्त्राचा तो नियम आहे!
भविष्याचा वेध!
काळाबरोबर ही शास्त्रेही प्रगत झालेलीच आहेत. आता कुंडली पाहण्यासाठी भृगुसंहिता पालथी घालावी लागत नाही.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 01-05-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on goa university to teach vaastu astrology