कोठे जायचे ते नक्की ठरवलेले असले, की ओळखीचा रस्ता धरून पावले टाकणे सोयीचे असते. त्यामुळे चुकण्याची भीती नसते, आणि जेथे जायचे तेथे नक्की पोहोचणार याची खात्रीही असते. ‘नाकासमोर चालणे हाच राजमार्ग’ मानणाऱ्या सरळमार्गी लोकांची हीच रीत असते. अनोळखी वाटांवर पाऊल टाकण्याची सरळमार्गीची हिंमतच नसली तरी, कदाचित तो आनंद अपघाताने मिळतो.

अपघाताने रस्ता चुकलेले अनेक जण बहुधा भरकटतच जातात, आणि जेथे जायचे ते ठिकाण सापडले नाही की, जेथे पोहोचलो तेच आपले ठिकाण असे समजून तेथेच रमण्याचा प्रयत्न करतात. काही जण मात्र, सुदैवीच म्हटले पाहिजेत. कुठे जायचे ते ठरविलेले नसले तरी ते एक रस्ता पकडतात, आणि चालायला सुरुवात करतात. पुढे गेल्यावर एखादी अनोळखी आडवाट खुणावू लागते. मग कोणताही विचार न करता ते त्या वाटेवरून चालू लागतात. पायपीट करण्याची तयारी आणि संपेल तेथे मुक्काम ठोकण्याची हिंमत हीच त्यांची शिदोरी असते. त्यामुळे, अनोळखी वाटेवरून चालत जेथे पोहोचतात, तेथे त्यांचे भविष्य त्यांच्याकरिता जणू वाट पाहातच थांबलेले असते. असा अनुभव सरळमार्गीना कधी येतच नाही. चुकीच्या वाटेनेदेखील ज्या ठिकाणी आपण पोहोचलो, ते ठिकाण आपल्याकरिताच आहे, याची खात्री पटते, आणि ती माणसे तेथे रमतात. अपघातानेच चुकीच्या रस्त्यावर जाण्याचे असे ‘भाग्य’ बहुधा राजकारणातील काही मोजक्यांना लाभते. नागपूरचे नितीन गडकरी अशाच एका रस्त्याने चालत असताना त्यांना एक वेगळी वाट खुणावू लागली, आणि ती कोठे जाते याचा फारसा विचार न करता त्यांनी ती वाट धरली. ती वाट राजकारण नावाच्या क्षेत्राशी येऊन थांबली, आणि आपण रस्ता चुकलो याची जाणीव त्यांना झाली. आपल्याला आवड नसतानाही चुकून आपण राजकारणाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत असे लक्षात आल्यावर क्षणभरासाठी तेव्हा कदाचित ते भांबावलेही असतील, आपण रस्ता चुकलो असेही त्यांना तेव्हा वाटले असेल.

पण हार मानणे किंवा घाबरून जाणे स्वभावातच नसल्याने त्यांनी राजकारण हेच आपले कार्यक्षेत्र मानले, आणि ते राजकारणात रमले. या वाटेवर सरळमार्ग नावाचा प्रकार नसतो. ‘संचलनाच्या शिस्ती’त पावले टाकता येतील एवढी ही वाट गुळगुळीत नाही. या वाटेवर खड्डे आहेत. चढउतार आहेत आणि अडथळेही आहेत.. ‘आदेश’ पाळण्याची सवय गुंडाळूनच या वाटेवर चालावे लागेल, हेही त्यांनी ओळखले. ही आडवाट असली, तरी हाच लोकांची कामे करण्याचा मार्ग आहे, हेही त्यांना जाणवले. ही वाट नेमकी कोठे जाऊन थांबते हेही त्यांना माहीत आहे. चुकून पावलाखाली आलेल्या या रस्त्यावर चालताना त्यांचे पाऊल विधिमंडळात पडले, पक्षाच्या प्रदेश मुख्यालयातही ते पोहोचले, पक्षाच्या दिल्लीच्या तख्तावरही बसले, आणि थेट केंद्रीय मंत्रिमंडळातही दाखल झाले.

अपघातानेच सापडलेला एखादा चुकीचा रस्ता कधी कधी योग्य ठिकाणी नेऊन सोडतो, असा अनुभव नितीनभाऊंसारख्या एखाद्यालाच येऊ शकतो. ‘गडकरी मार्ग’ हा आपला मार्ग नाही, असे मानणाऱ्यांची गर्दी रुळलेल्या वाटांवरच दिसते, ते त्यामुळेच!..

Story img Loader