‘याच्या गळ्यात सूर आहे’ असे बंडय़ाच्या जन्मानंतरच्या पहिल्याच रडण्यातून जाणवल्यावर लगेचच, बंडय़ावर संगीत संस्कार करण्याचा निर्णय बंडय़ाच्या बाबांनी घेतला होता. बंडय़ा हातवारे करून बोलू लागला, की त्याची बोटे तबल्यावर चालवावीत तशी चालतात असा भास होऊन बंडय़ाची आई भान हरपून त्याच्या बोटांचे लालित्य न्याहाळत बसायची, आणि ते पाहताना बंडय़ाच्या बाबांना धन्य धन्य वाटायचे. पुढे यथावकाश बंडय़ाची शाळा सुरू झाली, पण अभ्यासात त्याला फारशी गती नाही हे बाबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गल्लीच्या तोंडाशी असलेल्या हार्मोनियमच्या शिकवणीत बंडय़ाचे नाव दाखल केले. शाळा सुटल्यावर रियाज करण्यासाठी एक हार्मोनियमही विकत आणले. पुढे रात्री उशिरापर्यंत रियाज करताना पेटीच्या सुरांसोबत बंडय़ाच्या गळ्यातूनही सूर उमटू लागल्याने सोसायटीच्या एका वार्षिक बैठकीत गरमागरम चर्चा होऊन अखेर रात्रीच्या वेळी रियाज करण्यापासून बंडय़ाला रोखण्याचा दुष्ट डाव त्याच्या शेजारच्यांनी साधला. अशा तऱ्हेने, भारतीय शास्त्रीय संगीताचे क्षेत्र एका श्रेष्ठ गायकास मुकणार ही खंत बंडय़ाच्या वडिलांस छळू लागली. कसेही करून बंडय़ाच्या अंगीच्या संगीतगुणांचे संवर्धन करावयाचेच, असा त्यांनी पण केला, मग बंडय़ाला तबल्याचे शिक्षण देण्याची कल्पना पुढे आली. जेवणाच्या टेबलवर समोर ताट येईपर्यंत बंडय़ा टेबलावर छान ठेका धरतो, हे त्याच्या बाबांनी हेरले होते. बंडय़ाच्या गळ्यातला सूर आता बोटात उतरू लागल्याचे ओळखून बंडय़ाला तबलानवाज बनविण्याची स्वप्ने ते पाहू लागलेले असतानाच, अचानक ती बातमी बंडय़ाच्या बाबांनी वाचली. बंडय़ाच्या संगीताच्या साऱ्या क्षमता विस्तारण्याचा मार्ग आपल्यासमोर खुला झाला आहे, हे त्यांना जाणवले, आणि त्यांनी बातमीचे कात्रण काढून प्रेमाने आपल्या फाइलमध्ये अडकविले. बंडय़ाच्या भविष्याची दिशा आता स्पष्ट झाली होती. अभिजात संगीताची परिभाषा समजून घेण्याची, पूर्वजांनी जोपासलेल्या संगीतकलेचा देदीप्यमान वारसा जोपासण्याची व तालाचे उपयोजन करण्याची क्षमता बंडय़ाच्या अंगी यावी यासाठी आता प्रयत्न करावेत असेही त्यांनी ठरविले. मात्र, संगीताचे पारंपरिक क्षेत्र भविष्यात पैसा मिळवून देण्यास पुरेसे नाही असे बंडय़ाच्या आईस वाटू लागल्याने अधूनमधून बंडय़ाच्या घरात तबल्यासोबत भांडय़ांचेही आवाज सुरू झाले होते. ते खूपच वाढल्यावर बंडय़ाच्या वडिलांनी ती बातमी बंडय़ाच्या आईसमोर धरली. संगीतोपचाराच्या क्षेत्रातून रोजगाराच्या संधीही मिळणार असल्याने बंडय़ास संगीतोपचारतज्ज्ञ बनविण्यावर उभयतांचे आता एकमत झाले होते. मात्र, आजार बरे करण्यासाठी संगीताचा वापर करावा हे बंडय़ाच्या मनावर ठसविण्याचे मोठे आव्हान आपल्यास पेलावे लागणार या जाणिवेने बंडय़ाच्या वडिलांची उमेद काहीशी खालावली. बंडय़ाच्या रियाजातून डोकेदुखी वाढत असल्याच्या तक्रारी शेजाऱ्यांनी केल्याचे त्यांना आठवले. त्याच कलेत डोकेदुखी थांबविण्याची क्षमता असल्याचे शेजाऱ्यांना पटवावे लागेल, असा विचार करून, हा संगीत क्षमताविस्ताराचा शिक्षणक्रम सुरू होताच पहिल्यांदा बंडय़ाचा प्रवेश नक्की करावयाचे त्यांनी ठरविले. गाईम्हशींच्या गोठय़ात संगीताच्या कॅसेट वाजविल्याने त्यांची दुग्धोत्पादन क्षमता वाढते असेही बंडय़ाच्या बाबांनी पूर्वी कुठे तरी वाचले होते. आता बंडय़ाचा अभ्यासक्रम सुरू होईपर्यंत त्या कॅसेटचे पेनड्राइव्ह गोळा करण्याचे त्यांनी ठरविले. संगीतातून रोगमुक्ती होते याची अनुभूती घेणे हाही या अभ्यासक्रमातील क्षमतावृद्धीचा मार्ग असल्याचे वाचून बंडय़ाच्या बाबांना काहीशी काळजीही वाटू लागली. पण मनावर दगड ठेवून त्यांनी बंडय़ाला संगीतोपचारविशारद करण्याचा निर्णय घेतला. आता तो कायम राखण्याची क्षमता आपल्या अंगी यावी यासाठी बंडय़ाचे बाबा क्षमतावृद्धीचे उपाय करीत आहेत, असे कळते.

Story img Loader