होय, आकडय़ांचाच खेळ हा. या खेळात सहभागी होण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पैजा लावाव्या लागतात. पैज जिंकल्यास पैसेही मिळतात, पण हा जुगार नाही बरे! तशी त्याविषयी खात्री पटल्यामुळेच या क्षेत्रातल्या ‘ड्रीम इलेव्हन’ या बडय़ा कंपनीला सहप्रायोजक बनवून घेण्याची नितांत गरज भारतीय क्रिकेट मंडळाला आणि इंडियन प्रीमियर लीगला वाटली असावी. इतकेच नव्हे, तर सध्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत असलेला एक माजी कर्णधार क्रिकेटपटूही या कंपनीचा नाममुद्रा दूत आहे. बीसीसीआय किंवा आयपीएल काय, हा खेळ क्रिकेटचा तर आहेच, पण त्याहूनही अधिक तो आकडय़ांचा आहे. षटकार, चौकार, प्रेक्षक, बक्षिसे, फ्रँचायझी मानधन असल्या आकडय़ांची भारतीयांना – खरे तर मागास भारतीयांना सवयच नव्हती. ती सवय आयपीएलमुळे लागली, याबद्दल बीसीसीआयचे आभार मानायला हवेत. आकडे आल्यावर आकडेलावणीही आलीच. या आकडेलावणीला काही अभागी मंडळी सट्टेबाजी असे हिणवतात. वास्तविक केवढे कौशल्य लागते त्यास! शेअर बाजारातले वायदे चालतात, पण क्रिकेटमधले सट्टे चालत नाहीत, हा अन्याय नव्हे काय? त्यातून एका बडय़ा फ्रँचायझीच्या प्रमुख प्रवर्तकानेच थोडीफार आकडेलावणीची करमणूक करून पाहिली, तर त्याला थेट तुरुंगात टाकण्याचे अघोरी पातक या भूमीतच घडले आहे. त्या काळात त्याचे श्वशुर बीसीसीआयचे शीर्षपदस्थ होते त्याचाही काही उपयोग झाला नाही. तेव्हा आकडय़ांविषयी आयपीएलवाल्यांचे पुरातन आकर्षण जगजाहीर आहे. खेळाडूंवर आकडे मोजून पैजा लावायच्या नि त्यात पैसे जिंकायचे वा हरायचे. हा शुद्ध कौशल्याचा भाग आहे! यात संभाव्यतेवर भर नाही. सबब, सदर कृती ही जुगार किंवा सट्टेबाजी ठरत नाही. भारतात जे काही घडते किंवा घडत नाही त्याला निव्वळ कायद्यांमधली संदिग्धता कारणीभूत आहे. आता कायदे करणाऱ्यांनी रिकाम्या जागा भरल्या नाहीत हा काय आमचा दोष? खेळ आणि खेळाडूंचे जाणकार कित्येक आहेत. या दोहोंचं महत्त्व आकडय़ांमध्ये आकळणारे दुर्मीळच. या आकडय़ांतून उद्योग सुरू करू शकतील असे तर आणखी थोडे. शिवाय संबंधित कंपनीनेच आपल्या उद्योगाचे कल्पनाविलास (फँटसी) असे नामकरण केल्यानंतर कुणाची बिशाद आहे त्याला जुगार म्हणून हिणवण्याची? म्हणजे पैसे टाकून कल्पनाविलासाच्या बळावर खेळाडूंचे कौशल्य ओळखण्याचे कौशल्य अंगी बाणवून, आपली गुंतवणूक फळेल कशी आणि गळणार कशी नाही इतका सांगोपांग विचार करण्याची प्रगल्भता असलेल्यांनाच आकडय़ांच्या या खेळात प्रवेश मिळतो. त्यामुळे त्याच्याविषयी किंवा प्रवर्तकांच्या हेतूविषयी किंवा बीसीसीआयच्या खेळाप्रति असलेल्या प्रेमाविषयी किंवा आयपीएलच्या शुचितेविषयी संशय घेण्यास वाव कसा हो राहणार? ही बाब आयपीएलच्या केवळ एकाच फ्रँचायझी चालकाला किंवा बीसीसीआयच्याही एका पदाधिकाऱ्याला मान्य नाही ही गोष्ट निराळी! क्रिकेटप्रेमींनी आकडय़ांच्या या खेळात सहभागी झालेच पाहिजे!
हा खेळ आकडय़ांचा..
होय, आकडय़ांचाच खेळ हा. या खेळात सहभागी होण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पैजा लावाव्या लागतात.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on ipl betting