चो रामस्वामी हे एक ज्येष्ठ तमिळ पत्रकार, नाटककारही होते. तमिळनाडू हे शेजारचेच राज्य! त्यामुळे, रामस्वामींच्या साहित्यकृती आणि स्वप्नातील साऱ्या संकल्पनांचे सांस्कृतिक संस्कार आंध्र प्रदेशावर होणे साहजिकच. काही साहित्यकृती अजरामर असतात. त्यांचा समाजजीवनावर मोठा प्रभावही असतो. चो रामस्वामी यांच्या ‘मुहंमद बिन तुघलक’ या एका नाटय़कृतीला असेच भाग्य लाभले. तबब्ल पन्नास वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेल्या या नाटकाने आपली पडछाया अजूनही आंध्र, तमिळनाडूच्या समाजजीवनावरच नव्हे, तर राजकारणावरही उमटवून ठेवली आहे. ती अजूनही कुठेकुठे उमटलेली दिसते, तेव्हा लोकांना चो रामस्वामींचा तुघलकच आठवतो. म्हणून, मुहंमद बिन तुघलक ही नाटय़कृती अजरामर ठरली आहे. चो रामस्वामी यांची ही नाटय़कृती म्हणजे एक अव्वल विडंबननाटय़ होते. या नाटय़कृतीतील तुघलक हा या नाटकाचा नायक म्हणजे, एतद्देशीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा अस्सल विनोदी आणि तिरकस अर्क! पन्नास वर्षांपूर्वी, १९६८ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि आपल्या रोजच्या जगण्यातील राजकीय अनुभवांचाच एक विनोदी आविष्कार असल्याच्या भावनेने प्रेक्षकांनी या नाटकास अक्षरश: डोक्यावर घेतले. मग तीन वर्षांतच, याच नावाने ते रुपेरी पडद्यावर आले. तो चित्रपटही पुढे तब्बल तीन दशके तुफान चालला. पुढे या रामस्वामींनी स्वत:चे साप्ताहिक सुरू केले त्याचेही नाव तुघलकच, इतकी या नाटकाची प्रसिद्धी. नाटकात, इतिहासातील तुघलकाच्या शोधातून सापडलेल्या एका आधुनिक अवताराच्या कथानकाचा हा नायक त्याचा शोध घेणाऱ्या रंगाचारीच्या घरी मुक्काम ठोकतो आणि अल्पावधीतच तिरकस विनोदबुद्धीमुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळते. वर्तमानपत्रांचे रकाने त्याच्या मुलाखतींनी भरून जातात . मग हा नवा तुघलक निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतो. आपल्या निवडणूक प्रचारात संपूर्ण विडंबन नीतीचा वापर करून तुघलक तत्कालीन राजकीय स्थितीचे वाभाडे काढतो. आपल्या पक्षात सामील होऊन निवडणूक लढविणाऱ्या आणि विजयी होणाऱ्या प्रत्येकास उपमुख्यमंत्री करण्याचे तुघलक जाहीर करतो.. तो निवडणूक जिंकतो आणि त्याच्यासोबत असलेल्या साडेचारशे विजयी वीरांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडते. उपमुख्यमंत्र्यांचा हा पसारा घेऊन तुघलकाचा मनमानी कारभार सुरू होतो. पुढे तुघलकाचे बिंग फुटते आणि या नाटकातून पुढे आलेल्या वास्तव राजकारणाची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायमची उमटून राहते..
तुघलकाच्या या नाटक-सिनेमाचा पडद्यावरचा जमाना संपूनही आता दोन दशके उलटली आहेत. पण त्याचा प्रभाव कमी झालेला नाही. आंध्रचे नवे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री केले आणि आंध्रच्या जनतेला शेजारच्या राज्यातील त्या ‘तुघलक’चे गाजलेले प्रयोग आठवले.. ‘तुघलक’ या नाटकाचा शेवट अनेकांना माहीत होता. जगनमोहन रेड्डींच्या नव्या सत्तानाटय़ास आता कुठे सुरुवात झाली आहे.. पाच विविध सामाजिक स्तरांवरील नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन जगनमोहन यांनी आपल्या सत्तानाटय़ाला कलाटणी देऊ केली आहे. आणखी अडीच वर्षांनंतर, या मंत्र्यांचा खांदेपालट होईल.. पाच वर्षांत दहा जणांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल आणि चो रामस्वामी यांच्या लेखणीतील तुघलकाच्या सत्तानाटय़ाचा नवा अंक पाहावयास मिळेल. जगनमोहन मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची कल्पना अनेकांना नवी वाटत असेल; तर मग चो रामस्वामींचा ‘तुघलक’ त्यांना माहीतच नाही, एवढाच त्याचा अर्थ!