‘गार वाऱ्याची एक ओलीशार झुळूक नर्ऋत्येकडून आली आणि उन्हाच्या काहिलीने गपगार मलूल झालेल्या झाडांच्या फांद्या खडबडून जाग्या होत शहारून गेल्या. आकाशात काळ्या ढगांची दाटी सुरू झाली, फांद्यांनी वाऱ्यासोबत झोके घेत स्वत:भोवतीच फेर धरला. पक्ष्यांनीही किलबिलाट केला आणि सगळीकडे जणू चतन्याचे झरे वाहू लागले’ ..येत्या दीड-दोन महिन्यांत असे दृश्य दिसणार या केवळ कल्पनेनेच शेअर बाजारही तरारून वधारला. बळीराजाही सुखावला आणि ‘यंदा पाऊस सरासरी गाठणार’ या बातमीमुळे निवडणुकांच्या तापलेल्या रणावरही नव्या आशांचा शिडकावा सुरू झाला. काहीही कल्पना नसताना अचानक पावसाच्या उभ्याआडव्या सरींनी झोडपून काढत सर्वानाच अचंबित करून टाकावे, तशाच पद्धतीने हवामान खात्याने, ऐन निवडणुकांच्या तोंडावर कुणालाही कोणतीच कल्पनादेखील न देता ही आनंदवार्ता सर्वदूर पोहोचविली आणि ‘प्यारे देशवासीयोंको’ ही बातमी सांगण्याच्या स्वान्तसुखावरच विरजण पडावे या कल्पनेने खट्ट झालेल्यांनाही ही बातमी सुखावून गेली. देशात पाऊस समाधानकारक पडणार या वात्रेचे श्रेय कुणाचे यावर वाद घालण्यासाठी समाजमाध्यमे सरसावणार तोच, हवामान खात्याची स्थापनाच मुळी कुणाही नेत्याच्या जन्माआधी झाल्याचे सांगत विरजण घातले जाऊनही, समाधानकारक पावसाच्या बातमीचा आनंद मात्र उराउरी साठवून ठेवण्याची असोशी न लपविता सारे श्रेय त्या बातमीसच देऊन मनाचा मोठेपणाही दाखवावा यातच या बातमीसोबत येणाऱ्या समाधानाचे संचित साठलेले असते. ‘पावसाच्या चाहुलीचे परंपरागत संकेत दिसू लागल्याखेरीज पेरणीला हात घालायचा नाही’ हे पक्के माहीत असणाऱ्या बळीराजाचे मनही या बातमीने क्षणभर सुखावून गेले. दुष्काळचिन्हांच्या भयाने भविष्याच्या चिंतेत बुडालेल्या मनावर केवळ सुखद पावसाच्या कल्पनेनेही एक हलकासा शिडकावा झाला. पाऊस पडला नाही तर कोणत्या भीषण परिस्थितीस तोंड द्यावे लागते या अनुभवाने पोळल्यानंतर नेहमीच जे काही वार्षिक संकल्प सोडले जातात, त्याची तयारीही सुरू झाली आणि यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यजल साठवणुकीचे व्यवस्थापन केले नाही तर भविष्यात काही खरे नाही याची जाणीव करून देणाऱ्या समाजमाध्यमी संदेशांची देवाणघेवाणही सुरू झाली.
येत्या निवडणुकीनंतर जे कुणी सत्तेवर येतील, त्यांच्यासाठी अच्छे दिन असणार असे संकेत देणाऱ्या या बातमीवर आता दोन्ही बाजूंनी उलटसुलट वादही झडू लागतील. क्वचितच खऱ्या ठरणाऱ्या हवामान खात्याच्या अंदाजांपेक्षा, कधीकधी नंदीबलही योग्य अंदाज नोंदवितो असा अनेकांचा अनुभवसिद्ध समज! आकाश निरभ्र राहील असा अंदाज खात्याने नोंदविला की छत्री घेऊनच बाहेर पडावे आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविली की बिनघोर मोकळ्या हाताने घराबाहेर निघावे अशी सवय असूनही या बातमीचा आनंद अनेकांनी वाटूनही घेतला.. आता प्रतीक्षा त्या पावसाची आहे. खात्याच्या अंदाजानुसार तो बरोबर पडला, तर त्याचे श्रेय मोदींचे नसेल, नेहरूंचे नसेल आणि हवामान खात्याचेही नसेल. ते सारे श्रेय केवळ आकाशात दाटून येणाऱ्या आणि अपेक्षेप्रमाणे कोसळणाऱ्या काळ्याशार ढगांचेच असेल. पक्ष, मन आणि मतांचेही भेद विसरून त्या सरींखाली चिंब भिजण्यातला आनंद काही आगळाच असेल.