सत्ता हे साध्य नसून सेवेचे साधन आहे, असे चाणक्याने पूर्वीच लिहून ठेवले आहे असे म्हणतात. हा श्रेष्ठ विचार चाणक्याच्या तोंडी घातल्याने त्यावर सहसा दुमत होत नाही आणि त्याच्या खरेखोटेपणास आव्हानही दिले जात नाही असा अनुभव असल्याने, सत्तेच्या माध्यमातून सेवेची संधी सतत आपल्यासच मिळत राहावी, ती अन्य कोणीही हिरावून घेऊ नये, असे कोणास वाटत असेल आणि त्याच उद्देशाने कोणी सत्तेस चिकटून राहण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असेल तर त्यात गैरही काहीच नाही. असे करण्याच्या प्रयत्नांस अथवा असे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस काही जण स्वार्थ वगैरे मानत असले तरी ते तसे नसून प्रत्यक्षात तोच पराकोटीचा परमार्थ असतो. पण पारमार्थिकाचा ध्यास घेतलेल्या कोणासही आपल्या या गुणाचे प्रदर्शन करावयाचे नसल्याने, यामागचा शुद्ध हेतू कधीकधी पुसला जाऊन भलतेच प्रवाद त्या कृतीस चिकटतात. अलीकडच्या, परमार्थवृत्ती लोप पावू लागण्याच्या काळात हे असे होणे साहजिकच; तरी अशा परमार्थभावनेतूनच सत्तेवर राहण्यासाठी किंवा सत्ता अन्य कोणाच्या हाती जाऊ नये यासाठी धडपडणाऱ्या, किंवा सेवेची संधी आपल्याला प्राप्त व्हावी या बुद्धीने त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची प्रत्यक्षात प्रशंसाच केली पाहिजे. अर्थात तशी वृत्ती फारशी दिसत नसल्याचे आसपास घडणाऱ्या असंख्य उदाहरणांवरून दिसते. तसे नसते, तर पंजाबमध्ये सेवाकार्यात सक्रिय झालेल्या नवज्योतसिंग सिद्धूंच्या पक्षसेवेस स्वार्थाचा रंग लावण्याचे धाडस पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग करते ना!.. नवज्योतसिंग सिद्धू हे सेवेसाठी किती तहानलेले होते, हे एव्हाना पुरत्या भारतवर्षांस अवगत झालेले आहे. या सेवेची संधी आपल्यास मिळावी यासाठी त्यांनी अगोदर भाजपमध्ये पक्षकार्य करून पाहिले. तेव्हा त्यांना तत्कालीन काँग्रेस उपाध्यक्ष हे ‘पप्पू’ असल्याचा साक्षात्कारही झाला होता. तो आवेशाने जगासमोर मांडूनही त्यांच्या कामगिरीचे कौतुक झालेच नाही. अशा हरप्रयत्नांनंतरही सेवेची संधी देणारी सत्ता आपल्या हाती येत नाही याची प्रचीती येताच नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका क्षणात पक्षाचा त्याग केला. त्यांच्या त्यागबुद्धीच्या उदात्त दर्शनाने भारावलेल्या काँग्रेसने त्यांचे दोष पोटात घालून त्यांना पावनही करून घेतले. त्याच क्षणी सिद्धूंची परमार्थ बुद्धी जागी होऊन त्यांना एक साक्षात्कारही झाला व आपण ज्यांना पप्पू म्हणत होतो, ते प्रत्यक्षात ‘प.पू.’ (पक्षी- परमपूज्य) असल्याच्या जाणिवेने सिद्धू यांनी पक्षांतरापश्चात पापक्षालनाचे पाठ सुरू केले. सेवेसाठी तत्पर होणे हाच पापक्षालनाचा मार्ग आहे हे ओळखून त्यांनी झपाटल्यागत सेवाकार्यात स्वत:स झोकून दिल्याने, साहजिकच, पक्षस्तरीय परंपरेचा पगडा असल्याने अमरिंदर सिंह यांना यामागील सिद्धूंचा परमार्थ दिसलाच नाही. सत्तामाध्यमातून आपल्याला गवसलेली सेवेची संधी हिरावून घेण्यास सिद्धू पाजी सज्ज होऊ लागल्याच्या संशयाने त्यांना पछाडले. असे झाले, की सेवेसाठी आतुरलेला कोणीही अस्वस्थ होणारच.. अमरिंदर सिंग यांचे तसेच झाले. सेवेची संधी गेली तर परमार्थ कसा साधणार ही त्यांची चिंता व्यक्त झाली. आता सिद्धूच्या सेवाक्षुधेचे काय होणार, हा पुढचा प्रश्न पंजाबला पडला असेल. समाजसेवेचे साधन सिद्धूच्या हाती सहजी लागणार नसेल, तर त्यांच्या त्यागाला काही किंमत नाही असाच त्याचा अर्थ होईल. सिद्धूच्या त्यागाची कदर करून त्यांना सेवेची संधी देणारा नवा कोणी पुढे येईल का, याचीच आता सर्वाना उत्सुकता असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा