‘इतिहास’ आणि ‘विनोद’ या दोन अशा गोष्टी आहेत, की ज्यांची पुनरावृत्ती झाली तरी प्रत्येक वेळी त्या ताज्याच वाटतात. उलट पुनरावृत्तीच्या पुण्याईमुळेच इतिहास किंवा विनोदाच्या स्मृती जिवंत राहतात. राजकारणी नेत्यांच्या शैक्षणिक पदव्यांचा वाद याच प्रकारात मोडतो. पाच वर्षांपूर्वी याच काळात नेत्यांच्या पदव्यांचा वाद सुरू झाला आणि पुढे सतत त्याला नवी पालवीही फुटत राहिली. त्या काळात, जेव्हा कुणी येल विद्यापीठाचे, तर कुणी ज्ञानेश्वर विद्यापीठाचे ‘पदवीवंत’ असल्याचा दावा करून स्वत:चे हसे करून घेत होते, तेव्हाच, ‘पदवी श्रेष्ठ की परिश्रम श्रेष्ठ’ असाही एक नवा वैचारिक राजकीय वाद निर्माण झाला होता. आता वैचारिक आणि राजकीय ही दोनही विशेषणे काहीशी विरोधाभासी वाटत असली तरी तो दोष राजकारणाकडे पाहण्याचा सामान्यांच्या दृष्टीचा, असे म्हणावयास हवे. राजकारणातील काही मुद्दय़ांचा वाद पुढे आला, की आपण- म्हणजे सर्वसामान्य माणसे- मुद्दय़ाच्या खोलात जावयाचा प्रयत्न करू लागतो. नेत्यांच्या पदवीचा वाद हा असाच सर्वसामान्यांना उत्सुकता असलेला आणि चवीने चघळता यावा असा विषय झाला, तो त्यामुळेच!.. कारण, एवढा चघळल्यानंतर त्याचे पुरते चिपाड होऊनही त्यामध्ये पुन्हा नव्याने रसभरण होणे व पुन्हा तो लोकांच्या चघळण्याचा विषय होणे हे केवळ राजकारणातच घडू शकते. म्हणूनच, एकदा स्वत:स पदवीधर म्हणविणाऱ्या स्मृती इराणींनी नव्या प्रतिज्ञापत्रात आपली पदवी मागे का घेतली, याविषयीची उत्सुकता चाळविली गेली. अशा चर्चेत लोकांना अधिक रस आहे हे एकदा राजकारणाने हेरले, की त्या चर्चेस खतपाणी घालणे हे त्या क्षेत्रातील प्रत्येकाचेच कर्तव्य असते. त्यानुसार पुढे या चर्चेला वादाचे रूप यावे हे साहजिकच आहे. एकदा स्मृती इराणींच्या पदवीचा वाद पुढे आला म्हटल्यावर या बाजूने, राहुल गांधींच्या पदवीवर प्रश्नचिन्हे उमटविणे हे जणू समाजमनाच्या उत्सुकतेस खतपाणी घालण्याजोगे कर्तव्यच ठरते.. मग त्या बाजूच्या कुणी थेट पंतप्रधानांच्या पदवीचे पुरावे मागावेत आणि वादाला नवी फोडणी द्यावी हेही ओघानेच येते. पदव्यांचा वाद हा प्रचाराच्या काळात अन्य गंभीर मुद्दय़ांना बगल देण्यासाठी अत्यंत सोपा मार्ग आहे हे एकदा लक्षात आले, की या वादाला युद्धाचे स्वरूप येते. ते तसे आलेच आहे. पाच वर्षांपूर्वी भडकलेले हे वादयुद्ध मधल्या काळात शीतयुद्ध झाले होते. त्याच काळात अनेकांच्या पदव्यांसमोर शंकेची प्रश्नचिन्हे उमटली होती आणि खऱ्याखुऱ्या पदवीधारकांच्या पात्रतेवरही त्यानिमित्ताने शिंतोडे उडवून झाले होते. यालाच इतिहासाची आणि विनोदाची पुनरावृत्ती म्हणतात. ‘हार्वर्ड’पेक्षा ‘हार्डवर्क’ महत्त्वाचे, असे सांगून पंतप्रधानांनीच जेव्हा सामान्यांच्या उत्सुकतेला नवसंजीवनी दिली, तेव्हा ती पुनरावृत्ती अपरिहार्यच होती. अपेक्षेप्रमाणे ते झाले आहे. पदवीच्या भेंडोळ्याचा ‘असलीपणा’ हा गंभीर मुद्दा न राहता विनोदाचा विषय व्हावा हे अशा वेळी अपरिहार्य आणि साहजिकच असते. कदाचित, राजकारणात ते माफही असेल, पण या स्मृती जिवंत व्हाव्यात हा काही निव्वळ योगायोग नव्हे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा