संध्याकाळ झाली, टेबलावरल्या फायलींच्या नेमक्या पानांत खुणा घालून कर्मचाऱ्यांनी टेबले साफसूफ केली आणि एकएक कर्मचारी बाहेर पडू लागला.  सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात असलेला दशरथ शिंदे मोकळा झाला आणि दुपारच्या आंदोलनामुळे स्वतवरच खूश असलेल्या दशरथने मंत्रालयाबाहेर येऊन बस पकडली. पुढच्या प्रवासात त्याच्या डोळ्यासमोर जाळीवरच्या आंदोलनाचाच प्रसंग तरळत होता. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणावर सरकारने जाळी बसविली नसती, तर आझाद मैदानावरच्या एखाद्या कोपऱ्यात आपण एकटय़ानेच एकाकी आंदोलन केले असते आणि त्याची दखलही कुणी घेतली नसती, असाही विचार त्याच्या मनात आला. दुपारी मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरचा एक कोपरा पकडून खिडकीतून प्रांगणावरच्या जाळीवर उडी मारताना, आपल्या आंदोलनास एवढी प्रसिद्धी मिळेल असे त्याला वाटलेदेखील नव्हते. नंतरची जाळीवरची कसरत, पोलिसांसोबत रंगलेला जाळीवरचा पाठशिवणीचा खेळ, प्रांगणातून उत्सुकतेने आपले आंदोलन न्याहाळणारी गर्दी, सारे काही एखाद्या स्वप्नासारखे घडले होते. प्रत्यक्षात घडून गेलेले ते प्रसंग मनात घोळवतच दशरथने मुंबईतील मुक्काम गाठला, तोवर रात्र झाली होती. आंदोलनाचाच विचार करत दशरथ अंथरुणावर आडवा झाला, आणि त्याचा डोळा लागला.. पुढच्या मिनिटभरातच तो ‘सेवालया’त पोहोचला होता. ‘मुख्य सेवका’ची प्रतीक्षा करत जनताजनार्दनाची गर्दी त्रिमूर्ती प्रांगणातच ताटकळली होती. दशरथने जाळीकडे पाहिले. याच जाळीवरून केलेल्या आंदोलनामुळे मंत्रालयाचे ‘सेवालय’ असे नामांतर झाले होते, मुख्यमंत्र्यांनी त्याची मागणी मान्य करून स्वतस ‘मुख्यसेवक’ म्हणविण्यास सुरुवातही केली होती. ‘सेवालया’चे सारे कर्मचारी प्रांगणातच जनताजनार्दनाची गाऱ्हाणी नम्रपणे नोंदवून घेत आहेत आणि शिस्तीने भेटावयास येणाऱ्या जनतेस सुहास्यमुखाने सामोरे जात मुख्य सेवक जातीने त्यांची गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या समस्यांवर जागच्या जागी तोडगा काढत आहेत, असे दृश्य पाहून दशरथ हरखूनही गेला. सचिवालय ते मंत्रालय अशा प्रवासाच्या टप्प्यात मंत्रालयाचा तोरा काहीसा वाढलाच होता. मंत्रालयात शिरताना जनताजनार्दनाची छाती दडपून जायची. सेवालयात मात्र जनताजनार्दन हक्काने सर्वत्र वावरतो आहे, सारे मंत्रिगण जनताजनार्दनाच्या सेवेसाठी सज्ज होऊन बसले आहेत, सचिवांच्या फौजा समोरच्या टेबलावरील फायली झपाटय़ाने हातावेगळ्या करत आहेत, असे दृश्य  दशरथच्या नजरेसमोर तरळू लागले आणि तो भारावून गेला.  मंत्रालयाचा कायापालट झाल्याचे पाहून दशरथ कमालीचा सुखावला आणि तो बाहेर पडला, आणि हळूच त्याने वळून त्या वास्तूकडे पाहिले.  त्याची नजर सहाव्या मजल्याकडे वळली. मुख्य सेवक हात हलवून दशरथला आस्थेने निरोप देत होते आणि जाळी काढून टाकण्याची तयारी सुरू झाली होती.  तिकडे आझाद मैदानावर कित्येक महिने ताटकळलेले आंदोलकांचे थवेही खूश होऊन गाशा गुंडाळू लागले होते. जाळीवरचे आंदोलन यशस्वी झाल्याच्या आनंदात दशरथने हवेत हात उंचावला आणि तो जागा झाला.. दुसरा दिवस उजाडल्यावर पुन्हा दशरथने मंत्रालयाकडे चक्कर मारली. सारे काही कालच्यासारखेच होते.

Story img Loader