राजकारण वर्तुळासारखे असते. माणूस त्या वर्तुळात पळायला सुरुवात करतो, तेव्हा, कुठून सुरुवात केली हेच त्याला कळत नाही. म्हणून, वर्तुळ पूर्ण झाले तरी समजतच नाही, आणि तो पळतच राहतो. हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री, दूरसंचार क्षेत्रातील पहिल्या घोटाळ्याचे जनक मानले जाणारे आणि गेल्या २२ वर्षांतील वनवासात तीनचार वेळा पक्षबदल करणारे सुख-राम यांना या वयाच्या ९३ व्या वर्षी या वर्तुळाच्या शेवटाचा अखेर शोध लागला. राजकारण्याच्या आयुष्यातील या ऐतिहासिक लाभाचे सुख-राम हे बहुधा पहिले लाभार्थी ठरतील. या वर्तुळाच्या परिघावरून धावण्यास त्यांनी सुरुवात केली, तेव्हापासून ते पळतच राहिले. या पळण्यातील मौजेचा त्यांनी पुरेपूर उपभोगही घेतला. दूरसंचार क्षेत्रातील कंत्राटाच्या वाटपातून जमा केलेल्या कोटय़वधींच्या चलनी नोटांच्या गादीवर आरामात पहुडलेल्या सुख-राम यांच्या चित्रांकडे पाहताना, राजकारणातील ‘सुख’ काय असते त्याची प्रचीती ‘राजकारणात राम नाही’ असे वाटणाऱ्यांनाही आली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेसने त्यांना पक्षापासून दूर केले, त्याला आता जवळपास २२ वर्षे झाली. एका परीने, तेव्हाच्या सुख-रामांच्या भ्रष्टाचाराच्या कथा हा आता इतिहास झाला. तरीही, गेल्या २२ वर्षांत सुख-राम हे नाव राजकारणाच्या वर्तुळात पळणारा दमाचा गडी म्हणून चर्चेत राहिलेच. त्यांची पळण्याची क्षमता एवढी विलक्षण, की त्या वर्तुळात पळताना त्यांनी आपल्या पुत्रास आणि पुढे नातवासही काखोटीस घेतले. त्यासाठी गेल्या २२ वर्षांत स्वत:चा पक्ष काढला, कधी कुणाला पाठिंबा दिला, कधी कोणा पक्षात प्रवेश केला. तुरुंगात राहूनही हिमाचलातील दूरसंचार क्रांतीचा विकासपुरुष अशी प्रतिमाही उभी केली. सुख-राम यांच्यासारख्या नेत्यामुळे राजकारणातील भ्रष्टाचाराचे गांभीर्य संपुष्टात आणण्यास सगळ्यांनाच मदत झाली. त्यांचे हे राजकारणावर उपकारच म्हणावयास हवेत! तसे नसते, तर भ्रष्ट म्हणून हिणविल्या गेलेल्या या सुख-रामास आपल्या पक्षात घेऊन स्वत: पवित्र झाल्यासारखे भाजपला वाटलेच नसते. अशी समजूत करून घेण्याची पहिली वाट सुख-रामांनी राजकीय पक्षांना दाखविली. आपण ज्या वर्तुळात पळत आहोत, त्या वर्तुळाचा शेवट गाठून वर्तुळ पूर्ण करावयाचे आहेच, आणि आपल्या मुलास, नातवासही या वर्तुळाच्या अंतरंगाची ओळख करून द्यायची आहे, ही त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या कामी आली. २०१७ मध्ये, दोनच वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सुख-राम यांची व त्यांच्या पुत्रपौत्रांची ‘आयाराम-गयाराम’ अशी खिल्ली उडविली, तेव्हा ते भलतेच नाराज झाले होते. त्याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. कारण सुख-राम ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीतले कधीच नव्हते. ते तर ‘गयाराम-आयाराम’ संस्कृतीचे पाईक होते. २२ वर्षांपूर्वी ते ‘गयाराम’ होते. आता वर्तुळ पूर्ण केलेल्या सुख-रामांची घरवापसी झाली आहे. ते आता ‘आयाराम’ झाले आहेत. पक्षाच्या रिवाजानुसार वीरभद्र यांनी सुख-राम यांचे स्वागतच केले असले तरी, २२ वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा राज्यात दाखल झालेल्या या सहकाऱ्याबद्दल वीरभद्रांना आता नेमके काय वाटत असेल?

Story img Loader