‘दारूची नशा, करी जीवनाची दुर्दशा’.. ‘दारूचा पाश, करी संसाराचा सर्वनाश’, असे ‘दारूमुक्ती’चा संदेश देणारे फलक जागोजागी दिसायचे त्याला आता जमाना लोटला. प्रचाराचा तो अतिरेक पाहून, राज्यात खरोखरीच दारूमुक्ती होणार असे तेव्हा अनेकांना वाटू लागले होते. पुढे ते फलकच पुसले गेले आणि दारूच्या महापुराच्या बातम्या येऊ लागल्या. दारू ही व्यक्तीच्या आरोग्यास अपायकारक असेलही, पण सरकारच्या तिजोरीसाठी मात्र, दारू हेच ‘टॉनिक’ आहे. दारू हा दु:ख विसरण्याचा उपाय आहे असे म्हणतात. सरकारसारख्या यंत्रणेसाठी ते खरेच आहे. काही महिन्यांपूर्वी, न्यायालयाच्या आदेशामुळे हमरस्त्यांवरील दारूविक्री बंद झाली तेव्हा, दारूविक्री घटण्याच्या केवळ कल्पनेने सरकारी तिजोरीला जो अशक्तपणा आला, त्यातून ती अजूनही सावरलेली नाही. अशा अशक्तपणामुळे तिजोरी ताळ्यावर राहात नाही. ती झोकांडय़ा खाऊ लागते. त्यातून सावरण्यासाठी दारूचीच मात्रा लागू पडते, हे सरकारच्या लक्षात आले. ते एवढे पटले, की, घरपोच दारूच्या पर्यायावरही सरकारने गंभीर विचार सुरू केला. पण एवढय़ावरून, दारूच्या सामाजिक दुष्परिणामांची जाणीव सरकारला नाही असे नाही. एक प्रयोग सरकारने चंद्रपूर जिल्ह्य़ात केला. पण एकटय़ा चंद्रपूरची दारूमुक्ती आणि त्यात पेट्रोलवरील करकपातीचा झटका यांमुळे पुन्हा तिजोरी खंगत चालली. तिचे हे ढासळते आरोग्य सावरण्यासाठी दारूला पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले आहे. दारू स्वस्त झाली म्हणून ती पिणारे लोक मनसोक्त दारूपानास सुरुवात करतील असे कधी होत नसते, त्याप्रमाणे, दारू महाग झाली म्हणून ती पिणारे लोक तिचा त्याग करतील असेही फारसे होत नसते. गेल्या वर्षभरात दारूवरील करातून मिळणाऱ्या महसुलात दीड हजार कोटींची वाढ झाली आहे. दारू हे तिजोरीचे खरे टॉनिक आहे, हे सरकारला माहीत असल्याने, आता देशी बनावटीच्या विदेशी दारूवर २५ टक्के करवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एवढय़ा एका सुवार्तेने तिजोरीच्या अंगावर ५०० कोटींच्या महसूलवाढीचे मांस चढणार आहे. खंगत्या तिजोरीला दारूचा आधार मिळावा, हे एका परीने सुचिन्हच! दारूच्या करवाढीतून मिळणाऱ्या वाढीव महसुलाचा विनियोग राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी केला जाणार असेल, तर दारू महागल्यानंतरही तिची अधिकाधिक विक्री होणे गरजेचे आहे. दारूमुळे त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या मूठभरांच्या जीवनाची दुर्दशा होत असेलही, त्यांच्या संसाराचा सर्वनाश होत असेलही, ते वाईटच आहे, पण दारूविक्री वाढल्यामुळे मिळणाऱ्या महसुलातून साऱ्या समाजाचे भले करता येत असेल, तर सरकारने केलेल्या करवाढीचे स्वागत केलेच पाहिजे. दारूवरील करवाढीमुळे सरकारी तिजोरीला बळ मिळणार असेल, तर त्यासाठी आपल्या परीने हातभार लावणे हे जणू राष्ट्रकार्यच आहे. ते ‘दारुण वास्तव’ असले, तरी मद्यप्रेमी यातूनही निभावून नेतील. दारू महागल्याबद्दल निषेधाचे सूर काढणारा मद्यप्रेमी कधी कुणी पाहिला आहे का? ..महागाईच्या जमान्यातही चाहत्यांच्या मुखावर कधीच नाराजीची रेषा उमटू न देण्याचे दारूच्या अंगी असलेले सामर्थ्य अन्य कोणात आढळले आहे का?.. म्हणूनच, तिजोरीच्या या टॉनिकला सलाम केला पाहिजे.

Story img Loader