एका वेळी एका मैदानात फलंदाजी करणे व दुसरीकडे दुसऱ्या मैदानात गोलंदाजी करणे, नेहमी ज्याच्या बाजूने बोलायचे, त्याच्याच विरोधात प्रसंगी दंड थोपटणे, या साऱ्या कृती एकाच वेळी करणे एकाच व्यक्तीसाठी सोपे नसते. राजकारणात, दोन दगडांवर पाय ठेवणारे अनेक जण असतात. कोणत्याही क्षणी, वेळप्रसंग पाहून कोणत्याही बाजूला उडी मारणे सोपे व्हावे यासाठी कुंपणावर बसणारेही थोडे नसतात. पण एकाच वेळी तीन दगडांवर पाय ठेवणे आणि धड कुंपणावर नाही वा अलीकडे-पलीकडेही नाही आणि अशा अवस्थेतही टिकाव धरून राहणे हेही महाकठीणच! आजवर एका दगडात फार तर दोन पक्षी मारणारे काही जाणते राजकारणी नेते आपण पाहिलेही असतील, पण एकाच दगडात अनेक पक्षी मारूनही, त्या पक्ष्यांना शिकाऱ्याविषयीच प्रेम वाटावे असे याआधी कुणी कधी पाहिले नसेल. महाराष्ट्राची माती विविधांगी राजकारणाच्या मशागतीसाठी तशी सुपीकच; त्यामुळे याच मातीतील राजकारणात या गुणवैशिष्टय़ांचा समुच्चय झालेले एक नेतृत्व आता पूर्ण विकसित झाले आहे, असे समजायला हरकत नाही. अर्थात, असा विकास होण्यासाठी त्याला खतपाणी घालावे लागते, त्याची मशागतही करावी लागते. सुदैवाने या नेतृत्वाच्या अशा सर्वागीण विकासाची आणि मशागतीची काळजी घेणारे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. अलीकडेच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांपैकी तीन राज्यांच्या निकालांनंतर हे वातावरण अधिकच पोषक झाले. ज्या पंढरपुरात, चंद्रभागेच्या तीरावरून, ऐन वेळी काढता पाय घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांस घरच्या विठ्ठलाची पूजा करावी लागली, त्याच चंद्रभागेच्या तीरी, त्यांच्याच सत्तेतील सहकारी पक्षाच्या नेत्याने वाग्बाणांचा यथेच्छ भडिमार करून सत्ताधीशांना घायाळ केले. हे मोठे कौशल्याचे काम! ‘जागावाटप गेले खड्डय़ात’ असे एकीकडे म्हणावयाचे आणि ‘आधी शेतकऱ्यांचे बोला, मग युतीचे बघू’ असेही सुनवायचे.. एकाच वेळी गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणतात ती हीच! ‘राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत सहभागी असलो तरी हे सरकार आमचे नाही’ असे सुनावत प्रसंगी विरोधकांहूनही वरचढ व्हायचे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळून, व ‘चौकीदार चोर है’ या त्यांच्या आरोपास मराठमोळा मुलामा देऊन ‘पहारेकरी चोर आहेत’ या विरोधकांच्याच आरोपांचा पुरस्कार व पुनरुच्चार करावयाचा हे साधणेही सोपे नाही. ज्याच्या बाजूने उभे राहायचे त्याच्याच विरोधात प्रसंगी दंड थोपटायचे, यासाठीचे बळ या तीन निवडणुकांच्या निकालांनीच दिले.. शिवाय, कुंपणावर राहणे हा तर अनेकांच्या डाव्या हाताचा मळ असतो.. ‘आधी मंदिराचे मार्गी लावा, मग युतीचे बघू’ या इशाऱ्याचा सूर तरी दुसरे काय सांगतो?.. अशी सारी ‘सूरमिसळ’ एकाच वेळी काढणे सोपे नसतेच! भले, त्यामुळे लोकांच्या मनात विचारांची सरमिसळ झाली तरी बेहत्तर! पण महाराष्ट्राच्या मातीतील राजकारणात काहीही साधता येते. असे कितीही ‘बाण’ झेलावे लागले तरी चालेल, पण युतीचीच भाषा ‘बोलणे’ आणि युती व्हावी यासाठी, ‘मित्र’पक्ष जे काही बोलतील, त्यावर ‘डोलणे’ हेही ओघाने आलेच..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा