कार्ल मार्क्सचा तथाकथित ‘शास्त्रीय’ समाजवाद दोन दशकांपूर्वी बुडाला, परंतु एक मार्क्सवचन मात्र कायम खरे ठरते.. ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते : आधी शोकांतिका म्हणून, तर पुन्हा- प्रहसन म्हणून!’ हे ते वचन. या वचनाचा समाजवाद वगैरेंशी संबंध नसल्यानेच ते तरले असावे.. पण किती तरावे एखाद्या वचनाने? मार्क्सच्या जन्मानंतर फार तर नऊ-दहा वर्षांनी जन्मलेले भारतीय सामाजिक क्रांतिकारक महात्मा फुले यांना स्त्रीशिक्षणकार्यात साथ देऊन मुलींच्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होणाऱ्या सावित्री फुले यांनाही या वचनाची झळ बसावी? दगड, शेणगोळे यांचा मारा सोसतही स्त्रीशिक्षणाचे कार्य न सोडणाऱ्या त्या माऊलीला अशी झळ बसणार नाही. पण १८८५ पासूनच्या इतिहासाने या दाम्पत्याची आठवण पुसून काढली आणि त्याच वर्षीपासून एक शोकांतिका सुरू झाली- या दाम्पत्याची नव्हे, देशाचीही. कुणी म्हणतात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे त्या शोकांतिकेचे नाव. तिचे प्रयोग पूर्वी हाऊसफुल्ल होत.. आजही कुठे कुठे चालतात. पण आजच्या मल्टिस्क्रीन अर्थात बहुपडदी जमान्यात या शोकांतिकेकडे कुणाचे लक्षही जात नाही. समाजकारण आणि समाजसुधारणा यांच्याऐवजी राजकारणास महत्त्व देणे, त्यामुळे सुधारणांकडे आणि तळागाळात या सुधारणा राबविणाऱ्यांचा विचारही मागे पडणे, असे या शोकांतिकेचे मूळ कथानक होते.. हेही आता आठवून सांगावे लागते आणि सांगितले तरीही ते अनेकांना पटणार नाही, इतकी वळणे- अगदी कोणत्याही हिंदी/मराठी चित्रवाणी मालिकेच्या कथानकापेक्षाही अधिक वळणे या शोकांतिकेने गेल्या सव्वाशे वर्षांत घेतलेली आहेत. यापैकी ताजे वळण जे काही आहे, ते मात्र मूळ कथानकाची दूरवरून आठवण करून देणारेच नव्हे तर आता प्रहसन सुरू झालेले असल्याची द्वाही फिरविणारे आहे. हे वर्तमान वळण कोणते, याची माहिती दैनिके आणि वाहिन्यांनी दिलेली आहेच. परंतु ती नजरेतून सुटली असण्याचा संभव अधिक. ती माहिती अशी की, भाजपच्या तिकिटावर बहराइच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व (मावळत्या) लोकसभेत करणाऱ्या खासदार साध्वी सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने ‘खऱ्या’ सावित्रीबाईंना आणि महात्मा जोतिराव फुले यांना स्वीकारले असते, तर मुळात शोकांतिका सुरूच झाली नसती. त्या शोकांतिकेत आजवर आलेली अनेक ‘अपरिहार्य राजकीय वळणे’ आली नसती. घराणेशाही, व्यक्तिपूजा यांचे नेपथ्यही उभारलेच गेले नसते. या शोकांतिकेच्या इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झालेले असावे.. त्यामुळेच तर आता प्रहसन सुरू होते आहे. स्वत:ला कालपर्यंत ‘साध्वी’ सावित्रीबाई फुले म्हणविणाऱ्या, बहुजन समाज पक्षातून कधीकाळी निलंबित झाल्यामुळे स्वत:चा जम बसविण्यासाठी समाजसेवा वगैरे करून मग भाजपप्रवेश करणाऱ्या – पण समाजसेवेपेक्षा सत्तेच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या आणि मुळात अगदी लहानपणापासून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशा या साध्वींचे स्वागत आता काँग्रेसमध्ये होते आहे.शोकांतिकेची आठवणही कुणाला नसल्याची संधी साधून आता प्रहसन सुरू झाले आहे.. साध्वी आता जेव्हा केव्हा काँग्रेसमधूनही बाहेर पडतील, तेव्हा प्रहसनाचा एक अंक संपेल.
शोकांतिका आणि प्रहसन..
काँग्रेसने ‘खऱ्या’ सावित्रीबाईंना आणि महात्मा जोतिराव फुले यांना स्वीकारले असते, तर मुळात शोकांतिका सुरूच झाली नसती.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-03-2019 at 00:53 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on up bjp mp savitri bai phule joins congress