प्रकृतीकडे पाहताना विकृती नेमकी शोधण्याची संस्कृती अनेकांची असते. यात पहिले म्हणजे जुन्या वळणाचे पत्रकार. सामाजिक बहिष्कार वगैरे बातम्या त्यांना चटकन दिसतात. सकारात्मक गोष्टी पाहा, अशी विनंतीवजा सूचना पाच वर्षांपूर्वीच यांना करून झाली, मग हीच विनंती आदेशवजा सुरात स्वयंसेवक करू लागले. तरीही कुठली ना कुठली आकडेवारी शोधून काढून यांचा नकारात्मक सूर सुरूच. याच ओळीतले दुसरे किंवा तिसरे म्हणून आता वैद्यकीय पेशातील लोकांचा समावेश करावा लागेल. मान्यच, की हे सारे संकटकाळात काम करताहेत. त्यासाठीच तर दिवे लावून प्रार्थना झाल्या! तरीही यांची कुरकुर सुरूच.. डॉक्टर मंडळीच पत्र लिहू लागली की म्हणे आम्हाला पीपीई किट नाहीत. या खंडप्राय देशाने यापूर्वी नावही ऐकले नव्हते त्या पीपीई किटचे. तरीही कान किटेपर्यंत हीच मागणी. प्रसारमाध्यमांत तीच चर्चा. पीपीई किटपलीकडेही जग असते, ते पाहायला नको? पण नाही. संघटना करून पत्र लिहितात ही वैद्यकीय मंडळी. आम्ही काही त्यांच्या विरुद्ध नाही. पण आम्ही त्यांच्यासाठी टाळ्या पिटाव्या, थाळ्या वाजवाव्या, आमच्यापैकी काही उत्साहींनी फटाकेही त्यांच्या अभिनंदनासाठी लावावे आणि त्यांनी मात्र आमच्या या सकारात्मक कृतीला सामूहिक दाद देण्याऐवजी तक्रार करावी, हे बरे म्हणावे काय? असो. हा मजकूर आम्ही लिहीत आहोत तो काही त्यांच्या विरुद्ध अजिबात नाही. उलट तेही आमचेच. सरकारी रुग्णालयात काम करतात म्हणून काहींना दिल्लीत घरे नाकारली म्हणे. हे असले हीन प्रकार केजरीवालांच्या राज्यात होतही असतील. पण दिल्लीलगतच्या उत्तर प्रदेश आणि हरियाणात होत नाहीत असे प्रकार. हे चित्र सकारात्मकच नाही का?
म्हणे संरक्षक साधनांच्या अभावी मुंबईतील दोन बडी रुग्णालये बंद करावी लागली. पेडर रोड, वांद्रे-कुर्ला संकुल अशा धनिकवणिकांच्या परिसरातील ही रुग्णालये. या दोन्हीत मिळून, ६०हून अधिक डॉक्टर अथवा परिचारिका आदी कर्मचाऱ्यांना विषाणूबाधा झाली. ही रुग्णालये खासगी आहेत. म्हणजे ते केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे किंवा महापालिकेचे अपयश अजिबात नाही. त्याआधी याच मुंबईतील जी आणखी दोन रुग्णालये विषाणूबाधेमुळे चर्चेत होती, तीही ट्रस्टतर्फे चालविली जाणारी किंवा खासगीच होती. याचा साधासरळ अर्थ काय? सरकारची कोणतीही चूक नाही, असाच की नाही? पण हा इतका साधासरळ अर्थ आपली प्रसारमाध्यमे सांगतच नाहीत. कारण त्यांना सकारात्मक असे काही पाहण्याची सवयच राहिलेली नाही गेल्या सत्तर वर्षांत. ती मोडण्याचे प्रयत्न गेल्या सहा वर्षांत जरूर सुरू आहेत. परंतु खासगी रुग्णालये सरकारच्या कोणत्याही चुकीविना बंद करावी लागत असताना, सरकारी डॉक्टरही मध्येच पुन्हा मुखवटय़ांची वा त्या पीपीई किटची मागणी करतात आणि सकारात्मकतेला पुन्हा ग्रहण लागते. ७ एप्रिलचा जागतिक आरोग्य दिनही या तक्रारींतच गेला. तेव्हा यानंतर तरी, वैद्यकीय पेशातील साऱ्यांचीच दृष्टी सकारात्मक राहो आणि कोणत्याही विघ्नाविना हे सारे जण- ज्यांना वाचवायचे त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यात यशस्वी होवोत, यासाठी आरोग्य दिनाच्या नंतरही शुभेच्छा!