लाचारी आणि स्वाभिमान हे घडय़ाळाच्या लंबकासारखे झुलणारे प्रकार आहेत, असे कुणा प्रसिद्ध वगैरे तत्त्ववेत्त्याने म्हटले नसून, सध्या राजकारणात जे काही सुरू आहे, त्यावरून सद्य:स्थितीत कोणाच्याही मनात हेच विचार येत असतील. अर्थात, जे काही विचार सामान्यांच्या मनात येतात, तेच विचार पूर्वी कधीकाळी कोणा एखाद्याने मांडल्याची आवई उठविली तरी ती सहज त्याच्या नावावर खपून जाईल अशी किमया करण्यास समाजमाध्यम नावाचा मंच तर तत्परच असतो. या समाजमाध्यमांमुळेच लाचारीकडून स्वाभिमानाकडे आणि स्वाभिमानाकडून लाचारीकडे झुलणारा लंबक अलीकडे प्रत्येकास माहीत झाला आहे. हा लंबक कधी लाचारीच्या बाजूस झुकतो, तर कधी स्वाभिमानाकडे. घडय़ाळाच्या लंबकाचे झुलणे आणि झुकणे नियमित असले तरी, माणसांच्या बाबतीत या झुकण्याचा कालावधी नक्की सांगता येत नाही. म्हणूनच, कालपर्यंत ताठ मानेने वावरणाऱ्यांचा स्वाभिमान कधी गळून पडेल आणि चेहऱ्यावर लाचारीचे भाव कधी आणले जातील याचा काहीच भरवसा नसतो. राजकारणात तर, हा अंदाज कधीच बांधता येत नाही. महाराष्ट्रातील अलीकडचे राजकारण हे याचे ताजे उदाहरण. विधानसभा निवडणुकीआधी जेव्हा एकाच पक्षाला ‘समोर आहेच कोण’ असे वाटत होते, तेव्हा अचानक अन्य पक्षांतील अनेकांना आपली उपेक्षा, अन्याय होत असल्याची जाणीव झाली. त्यांनी स्वपक्षास सोडचिठ्ठय़ा देऊन गयारामांची भूमिका घेतली. स्वपक्षास स्वाभिमानाने सोडचिठ्ठी देताना स्वाभिमानाच्या भावनेकडे झुकणारा चेहऱ्याचा लंबक, अन्य पक्षाच्या उघडय़ा दरवाजातून उंबरठा ओलांडून आयारामाच्या भूमिकेत जाताना मात्र, लाचारीकडे कसा झुकतो, हे त्या काळात महाराष्ट्राने पाहिले.

परंतु राजकारणात कुणीही कायमस्वरूपी आयाराम नसतो आणि कुणी कायमचा गयाराम नसतो हेही आता अनेकांस ठाऊक झाले आहे. साहजिकच, निवडणुकांचा हंगाम पार पडल्यावर पुन्हा लंबकाचे झुलणे सुरू होणार आणि स्वाभिमान व लाचारीचे पीक फोफावणार हे ओघानेच येते. सध्या या पिकाचा हंगाम सुरू झाला आहे. एके काळी स्वाभिमानाने सोडचिठ्ठय़ा वगैरे देऊन सत्तेच्या सावलीत आसरा घेणाऱ्यांचा अपेक्षाभंग होताच पुन्हा एकदा अनेकांचा लंबक लाचारीच्या दिशेने झुकू पाहत आहे. १२ डिसेंबर हा यंदाच्या या हंगामातील सर्वात मोठा मुहूर्त ठरला, हे महाराष्ट्रास वेगळे सांगण्याची गरज नाही. याच दिवशी कुणाला वाघिणीच्या गर्जनांचा भास झाला, तर कुठे झेंडाबदलासाठी विचारमंथन बैठका झडू लागल्या. असे स्वाभिमान आणि लाचारीचेही पीक जेव्हा जोमात येते, तेव्हा बेगमीच्या दृष्टीने दोन्ही बाजूंना सारवासारवी करून ठेवावी लागते. सध्या नाराजी आणि स्वाभिमानाच्या पिकामुळे लंबकांचे झुलणे जोरात सुरू झाल्याने, सारवासारवीची तयारीही याच हंगामात सुरू झाली आहे. स्वाभिमान, लाचारी आणि सारवासारवी असा तिहेरी खेळ महाराष्ट्रास पाहावयास मिळावा हा महाराष्ट्राचा राजकीय भाग्ययोगच. अशा हंगामी पिकांचा बहर फोफावल्यावर, महाराष्ट्राची सामान्य जनता शिळोप्याच्या गप्पांसाठीदेखील राजकारण का चघळते, याचे उत्तर वेगळे शोधण्याची गरज नाही!

Story img Loader