‘ज्यांच्या जिभेला हाड नसते, अशा असंख्य वाचाळवीरांनी भाजपला ग्रासले आहे,’ अशी कबुली निवडणुकीआधी अरुण जेटली यांनी दिली. त्यानंतरही साध्वी, साधू, आचार्य अशा अनेक भाजपाई स्वयंघोषित भगवेधारींनी आपापल्या जिभांच्या तलवारी परजणे सुरूच ठेवले होते. तरीही, जेटली यांनी लगाम घातल्यामुळे असेल, किंवा विरोधकांनी सुरू केलेल्या आक्रमक प्रतिहल्ल्यामुळे असेल, निवडणुकीआधी चारदोन दिवसांसाठी भाजपच्या या भगव्या मुखंडांना गप्प बसावे लागले होते. आता निवडणुकांनी विजयाचा अमाप गुलाल अंगावर उधळल्यावर पुन्हा त्याच, जुन्या उन्मादाचे वारे जोरात वाहू लागल्याने व आपल्या भगव्या विचारांना राजकारणाहूनही थोर स्थान मिळेल अशा गैरसमजुतीमुळे त्या कुलूपबंद जिभा पुन्हा सैलावल्या आहेत. अगोदर उमेदवारीसाठी ताटकळावे लागलेल्या व नंतर भाजपच्या सुप्तसुनामीच्या पुण्याईवर विजयी झालेल्या गिरिराज सिंह यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर या गैरसमजाच्या गर्तेतून ते बाहेर पडतील व त्यांची जीभही ताळ्यावर येईल असा विचार बहुधा पक्षश्रेष्ठींनी केला असावा. पण शपथविधीनंतर काही दिवसांतच गिरिराज सिंह यांच्या जिभेने उचल खाल्लीच.. स्वपक्षाच्या बिहारमधील नेत्यांच्या इफ्तार पार्टीतील उपस्थितीस आपल्या कट्टर विचारांचे गालबोट लावून आपल्या निवडणूकपूर्व संस्कृतीचे फेरप्रदर्शन घडविणाऱ्या गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणलेच, पण सरकारचीही पंचाईत केली. असे काही झाले की पक्षाध्यक्ष आणि आता देशाचे गृहमंत्री अशी दुहेरी जबाबदारी असलेल्या अमित शाह यांची कशी कोंडी होत असेल याची कल्पना करणे सोपे नाही. गिरिराज सिंह यांना तंबी देतानाच, अशा वाचाळवीरांच्या जिभांना लगाम घालण्याचा अतिरिक्त कार्यभारही अमित शहा यांना पुढील पाच वर्षे इमाने इतबारे सांभाळावा लागणार आहे, एवढे मात्र आता नक्की झाले आहे. या नाठाळांच्या माथी शब्दांची काठी हाणून ते सुधारतील अशी बहुधा पक्षाची आणि सरकारची अपेक्षा असावी. याला आणखीही एक कारण आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने निवडून आल्यानंतर पश्चात्ताप झाल्याच्या थाटात, जिभेला लगाम घालण्याचे जाहीर केले आहे. त्याची चर्चा सुरू होण्याआधीच गिरिराज सिंह यांनी आपल्या जिभेचा स्वतंत्र बाणा जाहीर करून टाकला आहे.
तेव्हा जिभांच्या या लालित्याची सातत्यपूर्ण दखल घेत राहणे आणि त्यांच्या सैलावलेल्या जिभांमधून सुटलेल्या सुरांचा मागोवा घेऊन त्यानुसार कधी पक्षाच्या पातळीवर तर कधी सरकारच्या स्तरावर त्यांना लगाम घालत राहणे हे नवे आव्हान भाजपच्या अध्यक्षांना पेलावे लागणार आहे. अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासमोरील आव्हानांची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. माध्यमांचे रकानेही त्या चर्चेने भरून गेले होते. पण त्या वेळी, या अनपेक्षित आव्हानाचा गंधदेखील माध्यमांना जाणवला नव्हता. कदाचित, खुद्द पक्षाध्यक्ष किंवा सरकारलाही त्याची गंधवार्ता नसावी. गिरिराज सिंह यांनी या आव्हानाची जाणीव नव्याने करून दिल्याने, आता सरकार सावध झाले असेल. दुसऱ्या पर्वात गिरिराज सिंह यांच्या पहिल्याच पावलास अशी ठेच लागल्याने, पुढचे वाचाळवीर शहाणे झाले तरच सरकारला हायसे वाटेल!