कट्टप्पाने बाहुबलीस का मारले या प्रश्नाहून अत्यंत गहनगूढ असा एकच सवाल आज असंख्य भारतीयांसमोर आहे. तो म्हणजे बाहुबलीला उत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट म्हणून का गौरविले? हा चित्रपट प्रेक्षणीय आहे याबाबत अजिबात दुमत नाही. संगणकीय करामती वापरून पडद्यावर काही नेत्रदीपक भव्यदिव्य साकार करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडायचे यात हॉलीवूडची नेहमीच मातब्बरी राहिलेली आहे. बाहुबलीने त्यात आपणही कमी नाही हे दाखवून तमाम भारतीय प्रेक्षकांची मान ताठ केली आहे व त्याबद्दल त्याचा त्या तंत्रविभागातील पुरस्कार देऊन यथोचित गौरवही करण्यात आला आहे. याशिवाय ‘डोक्यास ताप नाही’ असा एखादा पुरस्कारांचा विभाग असता, तर त्यातही तो बाहुबलीच ठरला असता यातही काही संशय नाही. पण हे वगळता अन्य कोणत्या निकषांवर या चित्रपटास उत्कृष्ट ठरविण्यात आले हे मात्र अनेकांना समजलेलेच नाही. समाजात भरून राहिलेला हा अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. बाहुबली हा चित्रपट भारताच्या थोर चांदोबाछाप कहाणी परंपरेशी नाते जोडणारा आहे. याच परंपरेत चित्रपट निघतात, तेव्हा गाणी-बजावणी वगैरे असतात. पण त्यांचा खरा हेतू लोकांना चांगले संस्कार देणे हाच असतो. बाहुबलीमधून क्षणोक्षणी असे संदेश प्रेक्षकांना मिळत जातात. त्यात मातृभक्त पुत्र आहे, कर्तव्यापुढे नातीगोती तुच्छ लेखणारी न्यायप्रिय राणी आहे, राजावर प्रेम करणारी प्रजा आहे. त्यातील नायक तर असा थोर, की अप्सरेसम दिसणाऱ्या नायिकेला तो चक्कबळजबरीने प्रेमात पाडतो. आता त्या प्रसंगावर काही स्त्रीवाद्यांनी आक्षेप घेतले आहेत; परंतु चित्रपटांतील नायिकाच अशा असतात की त्यांना रस्त्यांत, महाविद्यालयांत छेडल्याशिवाय, त्यांचा पाठलाग केल्याशिवाय त्यांना नायकाच्या प्रेमाची किंमत कळतच नाही. त्याला दिग्दर्शक तरी काय करणार? तर अशा प्रेरणादायी हिंदी चित्रपटांच्या पठडीतील हा चित्रपट आहे. तोही मूळचा तेलुगूतील. पण अन्य दाक्षिणात्य भाषांबरोबर हिंदीतही आला आणि देशभरातून भरपूर पैसे कमावून गेला. असे असताना त्याला बाजूला सारून अन्य कोणत्याही चित्रपटाला पहिला पुरस्कार देणे हा अन्यायच ठरला असता. परीक्षकांच्या रत्नपारखी चमूने तो होऊ दिला नाही याबाबत त्यांचे आभारच मानावयास हवेत. असे रत्नपारखी आणि अशी रत्ने आज प्रत्येक क्षेत्रात दिसतात हे देशाचे भाग्यच म्हणावयास हवे. केवळ साहित्य-कला या क्षेत्राचा विचार करायचा झाला, तर आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीसांसारखे थोरच विचारवंत आहेत. चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय महाविद्यालयाची धुरा दिग्गज अभिनेते गजेंद्र चौहान सांभाळत आहेत. चित्रपटांवर नजर ठेवण्याचे काम पहलाज निहलानींसारखे मातब्बर करीत आहेत. ज्या दिवशी सरकारने चित्रपटांचे पुरस्कार जाहीर केले त्याच दिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या यादीत यंदाही महनीय सैफ अली खान यांच्या तोडीचे अनेक मान्यवर आहेत ही बाब नक्कीच सुखकारक आहे. समाजात सूर्यासारख्या तळपळणाऱ्यांचा गौरव काय कोणीही करतो, परंतु त्याच समाजात सुमार सुरसुऱ्याही असतात. त्या बाहुबलींचा जयकार कोण करणार? शासनाच्या वतीने तो होत आहे हे चांगले लक्षण म्हणावयास हवे. आता एकदा चांदोबातील कथा-कहाण्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळणे तेवढे बाकी आहे. ते झाले की संपूर्ण लक्षणपूर्ती झाली असे म्हणता येईल.

Story img Loader