केंद्रात वाजपेयी सरकार असतानापासूनच बंद असलेली ‘बरेली रबर फॅक्टरी’ आणि झुमका यांचा काय संबंध, असा उर्मट प्रश्न केवळ तथाकथित बुद्धिवादीच विचारू शकतात. या बुद्धिवादय़ांना आणखी बऱ्याच बाबतीत तथाकथित ठरवता येत असल्याने त्यांना अनुल्लेखानेच मारणे चांगले. पण या तथाकथितांनीच आता अनुल्लेखांचीही यादी करणे आरंभले आहे. उदाहरणार्थ बरेली या उत्तर प्रदेशातील शहरातील १९९९ पासून बंद असलेल्या रबर फॅक्टरीच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘किसान रॅली’ बरोब्बर आठवडय़ापूर्वीच्या सोमवारी (२८ फेब्रुवारी) झाली, तिथे फॅक्टरीच्या पुनरुज्जीवनाबद्दल मोदी काही बोलले नाहीत, अशी टीका तथाकथित लोक करणार. पण मोदी आलेच. बरेली म्हटले की मला ‘बरेली के बाजार में झुमका गिरा रे’ हे गाणे आठवते, अशी सुरुवात करून त्यांनी शेतकऱ्यांची मने जिंकलीच.बरेली म्हटले की मला ‘बरेली के बाजार में झुमका गिरा रे’ हे गाणे आठवते, अशी सुरुवात करून त्यांनी शेतकऱ्यांची मने जिंकलीच. राहता राहिला प्रश्न आठवडय़ापूर्वी बरेलीच्या त्या सभेस उपस्थित नसलेल्या बाकी देशभरच्या तथाकथितांचा. या हरतऱ्हेच्या तथाकथितांमध्ये काही स्वघोषित सिनेसंगीत-अभ्यासकही असतात. हे सिनेअभ्यासक लोक भाजपच्या कोणाही नेत्यावर थेट टीका करणार नाहीत, पण कुणाचा काय भरवसा द्यावा?- ‘१९६६ सालच्या ‘मेरा साया’ चित्रपटासाठी राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेले आणि मदनमोहन यांनी स्वरबद्ध केले असून(सुद्धा) आशा भोसले यांनी गायलेले ‘झुमका गिरा रे’ हे मूळचे रोहिलखंडातील लोकगीत.. ‘मेरा साया’च्या आधी १९४७ सालच्या ‘देखो जी’ नामक चित्रपटासाठी शमशाद बेगम यांनी ते गायले होते आणि १९६३ साली पाकिस्तानात बनलेल्या ‘माँ के आंसू’ या ऊर्दू चित्रपटात ‘कराची के बाजार में झुमका गिरा रे’ असा बदल करून ते गायले होते.. या प्रत्येक गीताची कडवी मात्र निरनिराळी आहेत..’ अशा अनावश्यक माहितीत पाकिस्तानचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? पण आता अशा सर्व छुप्या व उघड टीकाकारांना बरेली विकास प्राधिकरणाकडून परस्परच सज्जड उत्तर मिळणार आहे. ‘बरेली ही केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत आहे.. येथील देलापीर तिराहा या तिठय़ाच्या सुशोभीकरणासाठी आम्ही १४ मीटर मोकळय़ा जागेवर ‘बरेली का झुमका’ उभारणार आहोत.. यासाठी डिझाइनची खुली स्पर्धा व २५ हजार रु. बक्षीसही ठेवले आहे’ अशी माहिती या प्राधिकरणाचे उपाध्यक्ष शशांक विक्रमसिंह यांनी दिली आहे! ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ या लावणीतली बुगडी जशी साताऱ्यात बनलेली नसूही शकते, तसाच बरेलीच्या बाजारात कानांमधून पडलेला ‘झुमका’ बरेलीचा कशावरून?’ अशी शंका फक्त तथाकथितच लोक काढू शकतात. त्यांना हे काही लाख वा कोटींच्या खर्चाने बांधलेले झुमकाशिल्प उत्तर देत राहो.. असेच एक मोठ्ठे कुलूपशिल्प म्हणे उत्तर प्रदेशातच, अलीगढमध्ये होऊ शकेल.. किंबहुना सध्या मोदींनंतरच्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्या स्मृती इराणी या तेच काम करीत असल्याची तथाकथित माहिती आहे.
बरेलीचा ‘स्मार्ट’ झुमका
बरेलीच्या बाजारात कानांमधून पडलेला ‘झुमका’ बरेलीचा कशावरून?’
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-03-2016 at 04:47 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bareilly rubber factory