खासदार आणि चौकीदार ही दोन टोकेच. एक कायम प्रसिद्धीच्या वलयात झगमगणारा, तर  दुसरा अंधाऱ्या रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या सोबतीने वंचिताचे जिणे जगणारा. दोघांच्या थेट संबंधाचा योग म्हणजे पराकोटीची ‘दुर्मीळ’ गोष्ट. पण, पृथ्वीच्या जन्मापासून म्हणजे द्वापार, त्रेता आणि सध्याचे कलियुग अशा प्रत्येक युगात कुणी तरी एक असा ‘दिव्य माणूस’ जन्माला आलाच आहे, ज्याने केवळ त्याच्या असण्याने अनेक ‘अशक्य’ गोष्टी ‘शक्य’ करून दाखवल्या आहेत. वर्तमान कलियुगातही असाच एक दिव्य माणूस आहे, ज्याच्या ‘अशक्य’चे ‘शक्य’ करण्याच्या सामर्थ्यांची दूर अंतरिक्षातील अदृश्य परग्रहींच्या वस्तीतही जोरदार चर्चा आहे. त्याच्याच अफाट कल्पकतेच्या परिणामातून खासदार आणि चौकीदार ही दोन टोके अगदी समपातळीवर आली आहेत. त्याचीच बुधवारी अवघ्या देशाला प्रचीती आली. त्याला कारण ठरले अंशुल वर्मा. हे गृहस्थ देशाच्या संसदेत उत्तर प्रदेशातील हरदोई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. इतिहासात एम.ए. असल्याने त्यांना जगभरातील सत्ता कशा स्थापित झाल्या व उलथल्या याचा चांगला अभ्यास आहे. शिवाय ते पेशाने वकील असल्याने सत्ता स्थापण्या व टिकवण्यासाठी काय डावपेच खेळावे लागतात, याचेही कौशल्य त्यांच्या अंगी आहेच. आपल्या याच कौशल्याच्या बळावर पक्षनेतृत्व आपल्याला पुन्हा लोकसभेची उमेदवारी देईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. पण, त्यांच्या या विश्वासाला कुणाची तरी दृष्ट लागली अन् वर्तमान खासदार असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. ही गोष्ट अंशुल वर्माच्या अतिशय जिव्हारी लागली. प्रधान चौकीदाराच्या आदेशाबरहुकूम सलग पाच वर्षे डोळ्यात तेल घालून हरदोईची चौकीदारी केली आणि आता पुनर्नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असताना थेट अडवाणी पंथीयांच्या पंक्तीत बसवण्यात आले, तेही अद्याप वयाचा तो टप्पा गाठला नसताना! भाजप पक्ष नेतृत्वाच्या या अनपेक्षित निर्णयाने वर्मा संतापले. दूर साबरमतीच्या काठावरील कुणाला तरी ‘माँ गंगा’ बोलावते आणि आपण तिच्या कुशीत वाढलो तरी आपल्याशी सवतीसारखी वागते, हे काही वर्माना पटले नाही. त्यांनी याचा निषेध करण्याचे ठरवले व त्यासाठी प्रतीक निवडले अर्थातच सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चौकीदार. संकेतानुसार वर्मानी प्रधान चौकीदाराकडे  जायला हवे होते. पण, प्रधान चौकीदाराच्या चौकीदारीसाठीच इतके चौकीदार असतात की आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही,  हे कदाचित वर्माच्या ध्यानी आले असेल. म्हणूनच त्यांनी लखनौतले पक्ष कार्यालय गाठले आणि तेथे दाराबाहेर उन्हात पहारा देणाऱ्या चौकीदाराला आपला राजीनामा सोपवला. रोज आमदार-खासदार-मंत्र्यांची वर्दळ अनुभवणाऱ्या व त्यातल्या कुणीच कधी दखल न घेतलेल्या चौकीदाराला हा कागद कशाचा कळेचना. अखेर वर्मानीच त्याला सारा मामला समजवला आणि वर १०० रुपयेही दिले.चौकीदार सद्गदित झाला. त्याला कारणही तसेच होते. नोकरी सोडायची म्हणजे साहेबाला राजीनामा द्यावा लागतो हे त्याला माहीत होते. आज या खासदाराचे आपण साहेब झालो याचा त्याला कोण आनंद झाला होता आणि दुसरे म्हणजे महिन्याच्या मध्यात अभावानेच दिसणारी  शंभराची कोरी करकरीत नोट त्याच्या हातात होती. खरे तर हा त्याचा सन्मान असल्याचा समज तो चौकीदार करून घेणार इतक्यात वर्मा पुन्हा कडाडले.  माझे नाव अंशुल आहे. माझ्या नावापुढे मी चौकीदार लावणार नाही..ही वर्माची घोषणा ऐकून थोडा वेळ तो चौकीदारही विचलित झाला खरा, पण लगेच त्यांनी स्वत:ला सावरले. कारण,चौकीदार शब्दाच्या वलयापेक्षा हातातल्या नोटेचेच महत्त्व त्याला जास्त वाटत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा