एकाच गतीने फिरणाऱ्या चऱ्हाटाचा तोच तोच आवाज आता मनाला नकोसा झाला आहे. त्याच त्याच चर्चाची चघळून चिपाडे झाली आहेत. या वेळी सत्तास्थापनेचा मुद्दा बारा दिवस चघळता आला. तो आणखीही काही दिवस पुरेल, पण त्यामध्येही चाखण्यासारखी चव राहिलेली नाही. सर्वाना रस वाटेल असे विषय उपलब्ध असले पाहिजेत. नाही तर बुद्धीला गंज येतो, विचारशक्ती खुंटते. हे टाळावयाचे असेल, तर दररोज मेंदूला नित्य नवे खाद्य पुरविले गेले पाहिजे. म्हणजे मन आनंदी राहते. जनतेस आनंदी ठेवणे हे सरकारचे कर्तव्यच असते. काही राज्यांच्या सरकारांनी तर त्यासाठी खास आनंद मंत्रालये सुरू केली आहेत. आपल्या सरकारचाही तसा विचार होता, पण करमणूक हा मनास आनंद देणारा प्रकार असल्याने व इथे करमणुकीस कोणताच तोटा नाही हे स्पष्ट होऊ  लागल्याने सरकारने स्वतंत्र मंत्रालयाचा प्रस्ताव बासनात ठेवला. अर्थात, तसे मंत्रालय नसतानाही इथे करमणुकीस तोटा नाही, हे नाकारता येणार नाही. उलट, सध्या असे दिसते की, एका करमणुकीपासून कंटाळा येण्याच्या आत दुसरी करमणूक हजर ठेवण्याची जबाबदारी काहींनी स्वत:हून शिरावर घेतली आहे. महाराष्ट्रातील त्याच त्या घडामोडींमुळे मन आंबून निघालेले असताना, थेट पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नव्या मनोरंजनाचा विडा उचलला, आणि ‘गाईचे दूध पिवळे का’, या गहन विषयाचे गुपित फोडून समाजास ज्ञानाचा नवा प्रकाश दाखविला. अर्थात, हे गुपित केवळ वशिंड असलेल्या देशी गाईंपुरतेच आहे. बाकीच्या गाई म्हणजे केवळ जनावर! ..देशी गाईंच्या पुष्ट वशिंडाद्वारे त्यांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या सूर्यकिरणांचे सोने होते आणि त्याचा अंश दुधात मिसळतो, म्हणून देशी गाईचे दूध पिवळे असते, हे अगाध ज्ञानभांडार घोष यांनी अक्षरश: उधळले. आता देशी गाईंच्या आणि त्यांच्या दुधाच्या बाजारपेठा वधारणार यात शंका नाही. देशी गोमूत्रातही सोन्याचा अंश असल्याचा शोध याआधी एकदा कुणाला तरी लागला होता, आता सुवर्णकणांच्या झळाळीमुळे दुधास पिवळेपणा प्राप्त होत असल्याच्या स्वयं‘घोषि’त संशोधनामुळे देशी गाईंच्या वशिंडावर मूठभर मांस वाढले असेल. त्यांच्या दुधाचा भावही वधारेल आणि न जाणो, देशी गाईच्या दुधास दरवाढ देण्याची मागणीही सुरू होईल. दुधापासून सोने मिळविण्याच्या संशोधनकार्यात अनेक नवसंशोधक गर्क होऊन जातील.. आता सोन्यातील गुंतवणुकीऐवजी, देशी गाईंमधील गुंतवणूक अधिक लाभदायक होईल आणि सोने सांभाळण्यासाठी बँकांच्या लॉकरची गरज राहणार नाही. देशी गाईंचे जास्तीत जास्त दूध प्या, आणि स्वत:च्या शरीरातच सोने साठवा, असा नवा फंडा सुरू करावयास हरकत नाही. मात्र, दुधातील सोन्याच्या लोभापायी देशी गाईची गत सोन्याचे अंडे देणाऱ्या त्या कोंबडीसारखी होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. कदाचित त्यामुळेच, आधी गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाला असावा, आणि गाईंना कायदेशीर सुरक्षेचे कवच लाभल्याची खात्री करूनच घोष यांनी गाईच्या दुधातील सोन्याच्या गुपिताचा उद्‘घोष’ केला असावा.. गाईसारखाच उपयोग असलेल्या, गाईसारख्याच दिसणाऱ्या विदेशी जनावरांनाही सध्या हा कायदा लागू आहे, हे मात्र ध्यानात ठेवलेलेच बरे!

Story img Loader