महाराष्ट्रात भाजपमध्ये एक गंमत आहे. या पक्षात देवेंद्र आहेत आणि दानवेही आहेत. पण ही काही गंमत नव्हे. खरी गंमत अशी, की कुणी तरी एकाने काही तरी बोलून जाते आणि नंतर त्यावर गदारोळ माजला की सारवासारव करण्यासाठी सर्वाना सरसावून पुढे यावे लागते.  पण ज्यांनी सारवासारव करायची त्या दानवेंनीच आपली जीभ सैल सौडली तर देवेंद्र तरी काय करणार? पुराणातील काही कथांमध्ये देवेंद्राचे आणि दानवांचे वैर, हे सूत्र असायचे. देवेंद्राला सदैव दानवांशी लढावे लागत असे. दानवांबरोबरच्या युद्धात पराभवाची छाया दाटली की पळ काढून ब्रह्मदेवाच्या घरात लपण्याची वेळ देवेंद्रावर यायची. दानवांचा उच्छाद ही देवेंद्राची तेव्हाही डोकेदुखी होती. आत्ता हे संदर्भ उगीचच आठवले, एवढेच. इथे मुद्दा भाजपमधील सत्ता मिळाल्यानंतरच्या राजकारणाचा आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवेंच्या ताज्या वक्तव्याने, ‘दुबार मतदाना’च्या जुन्या मुद्दय़ाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. मागे एकदा, ‘भाजपचा छुपा मित्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुबार मतदानाचा मुद्दा जाहीरपणे मांडल्यावर साने गुरुजींच्या आठवणींनी अनेकांना उचंबळून आले होते. ‘आमची शाई’ नावाचे नवे साहित्यही काहींच्या लेखणीतून प्रसवू लागले होते. पण हा मुद्दा अलगद बाजूला झाला आणि ‘आमची शाई’चे लेखन अर्धवटच राहिले. एका दर्जेदार आधुनिक साहित्यनिर्मितीला तेव्हा महाराष्ट्र मुकला होता. राजकारणी नेते आणि त्यातही राज्यकत्रे साहित्य-संस्कृतीबद्दल किती संवेदनशील असतात, ते जगजाहीर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या अधुरेपणाची बोचरी जाणीव सतत टोचणी देत असावी. म्हणूनच त्यांनी पुन्हा दुबार मतदानाचा मुद्दा ऐरणीवर आणला. कल्याण-डोंबिवलीतील वैदर्भीय लोक इकडे शिवसेनेला मतदान करतात आणि तिकडे विदर्भात जाऊन भाजपला मतदान करतात असे विधान करून दानवेंनी राजकारणाच्या मदानात षटकार ठोकला आणि देवेंद्राची चिंता वाढली. मागे शरदरावांनी हेच वाक्य वेगळ्या ढंगात म्हटले तेव्हा राजकीय आकांडतांडव करून कारवाईची मागणी तरी करता आली होती. आता आपल्याच पक्षातील दानवेंच्या नव्या चालीचा सामना कसा करावा या चिंतेने देवेंद्राची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. उद्या कुणी त्यांना हा प्रश्न विचारलाच, तर गोड हसून, हात हवेत उडवून देवेंद्र त्या प्रश्नाला अलगद बगल देतीलही. कारण या संकटातून बाहेर काढणारा कुणी ब्रह्मदेव आसपास तरी नाही. आता दानवेंच्या रक्षणासाठी धावण्याची वेळ देवेंद्रावर आली आहे, हेच खरे!

Story img Loader