‘कभी माफ नही कर सकूंगा’ असे म्हणणाऱ्या शीर्षस्थ नेत्यांची आठवण समाजमाध्यमांतून गुरुवारी दिवसभर काढली गेली. निमित्त होते साध्वी आणि खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कुठल्याशा संसदीय समितीचे सदस्यपद मिळाले, हे. संसदेचे कामकाज फक्त सभागृहापुरते चालत नसते तर दोन्ही सभागृहांमधील सदस्यांचा समावेश असलेल्या अनेक समित्याही प्रशासनावर लोकप्रतिनिधींची देखरेख ठेवण्याचे काम करीत असतात, ही नागरिकशास्त्रात मार्क कमी होऊ नयेत म्हणून घोकून पाठ केलेली माहिती बरेच जण दिवसभर विसरले, पण ‘कभी माफ नही कर सकूंगा’ची आठवण मात्र बरोब्बर निघाली. या माफ न करू पाहणाऱ्या नेत्यांनीच जणू काही ठाकूर यांना संसदीय समितीवर नेमले, अशा समजुतीने समाजमाध्यमांवरून टिप्पणी सुरू राहते. ‘माफ नही’ची आठवण वारंवार देणाऱ्यांचा जोर इतका की, खुद्द ठाकूर यांचे समर्थकही प्रतिकार न करता गप्प राहतात. काँग्रेसकाळातही असेच काही तरी झाले होते का, हे आठवून पाहातात.. पण काँग्रेसकाळातल्या गुंडांना संसदीय समितीची सदस्यपदे मिळाली असे प्रत्युत्तर ठोकून देणे गैरसोयीचेच.. साध्वी प्रज्ञांची तुलना गुंडांशी कशी करणार? ‘तुमच्या गुंडांपेक्षा आमच्या साध्वी बऱ्या’ असे म्हणावे, तर शीर्षस्थ नेत्यांनी ‘माफ नही कर सकूंगा’ म्हणण्याचे समर्थन कसे करणार? तेव्हा उगी राहावे आणि जे जे होईल ते ते पाहावे असा पवित्रा साऱ्याच समर्थकांनी घेतला असल्यास नवल नाही. समाजमाध्यमांवर रोजच्या रोज या ना त्या निमित्ताने सुरूच राहणारी टिप्पण्यांची लढाई गुरुवारी एकतर्फी ठरली आणि समर्थकांना गप्प बसावे लागले, हा झाला एक भाग.
दुसरा भाग मात्र, समाजमाध्यमांवरल्या लढाईत गुरुवारी गप्प बसलेल्या समर्थकांना आध्यात्मिक तसेच सामरिक उभारी देणारा आणि टिप्पण्यांची लढाई सुरूच ठेवण्याची ऊर्मी चेतवणारा असू शकेल.. यापैकी सामरिक भाग उरी,पठाणकोट किंवा बालाकोट हल्ल्यांनंतर भारतीय सैन्यदेखील काही काळ गप्प राहिले होते; पण त्यानंतर आपल्या सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले आणि ते ‘मास्टरस्ट्रोक’ ठरले. हे सारे आठवून, तात्काळ प्रतिकार न करणे हाही व्यूहनीतीचा भाग मानण्याचे समाधान साऱ्याच समर्थकांना तूर्तास मिळवता येईल. दुसरा आध्यात्मिक भाग हा साध्वी प्रज्ञा यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित आहे.. केवढे सामर्थ्यशील ते व्यक्तिमत्त्व, ज्यास निव्वळ आजारपणामुळेच न्यायालयाने तुरुंगाबाहेर राहण्याची मुभा दिली असताना दररोज संसदेत येते.. कधी चाकांच्या खुर्चीवरून स्वत:च्या दिव्यांगत्वाची प्रचीती देते, तर कधी दोन्ही पायांवर चालते. केवढे आध्यात्मिक ते व्यक्तिमत्त्व, जे ‘मेरे श्राप से..’ या वक्तव्यावरला गदारोळ आज सहा महिन्यांनंतरही अनेकांना आठवत असूनसुद्धा ‘शाप दिला नव्हता’ असे घूमजाव करीत नाही.. असे व्यक्तिमत्त्व संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी निवडले जाते, हा खरेतर तमाम समर्थकांचा विजयच आहे. या साध्वींनी ‘श्राप’ दिला तर सीमेपल्याड काय काय उत्पात होतील याची रसभरित वर्णने साध्वींच्या समर्थकांनी आतापासून करायला हवीत.. साध्वींचा तो ‘मास्टरस्ट्रोक’ काय असेल, याचा अंदाज समर्थकांनी आतापासूनच जनतेला द्यायला हवा!