काळ कधीच कुणासाठी थांबत नाही असे म्हणतात. काळ त्रयस्थ, तटस्थ असतो; पण ही समजूत सर्वकाळ खरी नसते. म्हणूनच, इथे काळ एकदा थांबला.. थबकला! इतका की, निसर्गनियमाचे पालन करून पुढे सरकण्याचे भानही त्याला राहिले नाही. रुपेरी दुनियेत आपल्या आगळ्या तेजाने तळपणाऱ्या त्या निर्मळ सौंदर्यावर तोदेखील इतका भाळला, की त्या बेभान अवस्थेत अक्षरश: गोठूनच गेला. ‘टाइमलेस ब्यूटी’ असे जिचे वर्णन केले जाते, जिच्या सौंदर्य आणि अभिनयावर कित्येक वर्षांपासून लाखो जीवांनी स्वत:ची ‘जान’ शब्दश: उधळली, जिच्या नजरेच्या बाणांनी लाखो रसिकांची हृदये अक्षरश: विदीर्ण झाली आणि जिच्या एका लाघवी हास्यात न्हाऊन सिनेरसिकांचे अवघे विश्व जणू उत्फुल्ल होऊन गेले, त्या रेखाचा- अभिनेत्री रेखाचा- ‘वाढदिवस’ गुरुवारी साजरा झाला. खरे म्हणजे, वाढदिवस ही तिच्यासाठी ही एक भ्रामक कल्पना आहे. जिच्यासाठी काळही रेंगाळला, थबकला, तिचा वाढदिवस साजरा होणे ही एक अंधश्रद्धाच आहे. सामान्यांच्या जगात, दिवसागणिक वय वाढते आणि असे दिवस सरकत वर्ष सरले, की वाढदिवस साजरे होतात. रेखाच्या आणि तिच्या चाहत्यांच्या जगात मात्र, रेखाच्या वयाचा आणि वाढदिवस या संकल्पनेचा खरे म्हणजे काहीच संबंध नाही. काळ कोणताही असो- भूतकाळ आणि वर्तमानकाळच नव्हे, तर अगदी भविष्यकाळही- त्यावर रेखा हे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. स्वतंत्र प्रतिभाशक्ती असलेली संपन्न अभिनेत्री, एक अनादी दंतकथा आणि एक अजब वास्तव, एवढेच शब्द रेखाचं जीवन अधोरेखित करण्यास पुरेसे असल्याचे मानले जात असले, तरी ती एक अनंत अशी वास्तव कहाणी आहे. या स्वप्नसुंदरीने रुपेरी पडद्यावर पाऊल टाकले आणि त्या काळात अनेकांमध्ये जणू ‘तरुण होण्याची’ चढाओढ सुरू झाली. जिंदगी ‘खूबसूरत’ आहेच, पण रेखाच्या जिंदादिल अस्तित्वामुळे, जिंदगी हा एक जल्लोष आहे, असेही अनेकांना वाटू लागले.. ‘स्टारडम’ या शब्दाचा चित्रमय अर्थ काय, असे कुणाला विचारले, तर रेखा हेच सार्वकालिक उत्तर ठरलेले असायचे, त्या काळात रेखाच्या नशिल्या डोळ्यांमधील डोहात आत्महत्या करून अमर व्हावे या असीम इच्छेच्या आहारी जाऊन अनेकांनी आयुष्यातील तरुणाईचे अनेक दिवसही स्वप्नांत रंगून संपविले.. साडी आणि सिंदूर या दोहोंनाही रेखाने पडद्यावर प्रतिष्ठा दिली आणि परंपरा म्हणून गणल्या गेलेल्या या दोन प्रतीकांना फॅशनच्या विश्वातही स्थान मिळाले. काळाचे एक गणित असते. दिवसागणिक तो पुढे जात असतो. पण रेखाची भुरळ पडलेला तो काळ तिच्यासाठी रेंगाळत राहिला. म्हणूनच, रूढ हिशेबाने ६५ वर्षांची झालेली रेखा, काळाने तिच्यासाठी तयार केलेल्या गणितानुसार जेमतेम बत्तिशीचीच आहे. याच हिशेबाने रेखाचे भविष्यात साजरे होणारे वाढदिवस अनेक चाहत्यांना तरुण होण्याची आणि तरुण राहण्याची उमेद देत राहतील.. ‘इन आँखो की मस्ती से’ हजारो हृदये विदीर्ण करणारी, पडद्यावरची आणि पडद्यामागची कहाणी होऊन वास्तव विश्वात वावरणारी, रूप आणि बुद्धिमत्ता यांचा संगम असलेली रेखा रसिकांच्या पुढच्या पिढय़ांवरही तेच, जुन्या दिवसांचे अप्रूप उधळत राहील!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा