ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सध्या गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी मालिकेतली दुसरी – पर्थ कसोटी फारच क्लेशकारक ठरली. हा क्लेश १४६धावांच्या पराभवाचा इतका नव्हता, जितका तो पाचव्या दिवसापर्यंत सामना लांबल्याचा होता. तसंही सध्या ऑस्ट्रेलियात पाचऐवजी चारच दिवसांच्या कसोटी सामन्यांसाठी जोरदार लॉबिइंग सुरू आहे. भारतीय संघ तर हद्दच करतोय. पहिली कसोटी पाच दिवस लांबली. आता दुसरी कसोटीही तितके दिवस रेंगाळावी. तेव्हा यजमानांची मर्जी राखण्यासाठी पाहुण्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरीही पाच विकेट्स शेवटच्या दिवशी पडायच्या राहिल्याच! शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये एक वेळ डाव घोषित करता येतो. पण इच्छा असूनही कसोटी घोषित करता येत नाही, कारण तसा नियमच नाही! काय होतं इतकं महत्त्वाचं पाचव्या दिवशी? ज्यामुळे ऑस्ट्रेलियात गेलेल्या आमच्या क्रिकेटपटूंचं लक्ष इतकं विचलित व्हावं? तर त्या दिवशी होता आयपीएलचा लिलाव! भारतातच नव्हे, तर अवघ्या क्रिकेट जगतातला सर्वात मोठ्ठा आणि सोनियाचा दिनू! तिकडं आमच्या देशात क्रिकेटपटूंवर कोटी-कोटींच्या बोली लागत असताना फुटकळ दोन-तीनशे धावांचं काय घेऊन बसलात राव? विक्रमशिरोमणी फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला नसली, तरी इतरांना पोटा-पाण्याची चिंता करावीच लागणार ना? शिवाय कसोटीतलं उत्पन्न ते काय? आता कुजबुज अशी आहे, की विराटचे कान आणि डोळेही भारताकडे लागले होतेच. त्यामुळेच पहिल्या डावात शतक झळकावून चमकलेला विराट दुसऱ्या डावात विशीही ओलांडू शकला नाही. रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा या भारताच्याच दोन खेळाडूंमध्ये भर मैदानात बाचाबाची झाल्याचे आम्ही पाहिले. यांतला इशांत संघात होता, तर रवींद्र बदली खेळाडू म्हणून मैदानावर राबत होता. त्याविषयी असं कळालं, की एकानं दुसऱ्याला विचारलं की संघात कोण आहे? मी की तू? त्यावर दुसरा इतकंच म्हणाला, ‘किती कोटी?’ तेवढय़ावरून पहिल्याचं माथं भडकलं! रात्री आणखी एक वाद झाला म्हणे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर चेंडू बॅटनं तटवण्याचं प्रशिक्षण घ्यायला गेलेला राहुल आणि पहिल्या कसोटीतील भारतीय विजयाचा शिल्पकार फलंदाज चेतेश्वर पुजारा यांच्यात. एकाने विचारलं, किती धावा? दुसऱ्यानं उत्तर द्यायचं सोडून विचारलं, ‘किती कोटी?’.. असो. जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्ती यांना यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येकी ८.४ कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला. उनाडकट हा अष्टपैलू खेळाडू, सध्या तरी भारतीय ‘क’ संघातूनही खेळू शकत नाही. वरुण चक्रवर्ती हा तमिळनाडूतला आर्किटेक्ट, वेगवेगळे सहा चेंडू टाकू शकतो म्हणे. यांच्यावर इतकी बोली कशी लागते याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. हे निदान भारतातले. आता ही नावं पाहा.. लॉकी फग्र्युसन, ओशेन थॉमस, हार्ड्स विल्योन, आनरिच नोर्ते, हॅरी गुर्नी.. ही नावं ओळखून दाखवणाऱ्यालाच स्वतंत्र बक्षीस दिलं पाहिजे. पण यांना बोली लागली. आता थोडंसं हे नाव परिचयाचं वाटतं का पाहा. डेल स्टेन? जगातला सवरेत्कृष्ट तेज गोलंदाज.. याला बोलीच लागली नाही! कदाचित बोली लावणाऱ्यांना हे नाव ठाऊक नसावं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा