अखेर तो मंगल दिवस उजाडला, मंगळवारच्या मंगल सकाळी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींसाठी नियोजित वेळी, ब्रह्मकुमारी शिवानी यांचे प्रवचन पार पडले, किंवा हल्लीच्या मराठीत – ‘संपन्न’ झाले. आमदारांचे मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक जीवन अधिक संपन्न व्हावे, एवढय़ाच हेतूने केलेला एक अट्टहास पूर्ण झाला, तडीस गेला. पण कसे झाले प्रवचन? त्याचा परिणाम काय झाला? ‘राजयोग शिका’ असे फलक काही वर्षांपूर्वी शहराशहरांत ठिकठिकाणी लावणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेसाठी गेले सुमारे दशकभर व्याख्याने देणाऱ्या आणि त्यासाठीच गाजलेल्या या व्याख्यातीने काय सांगितले आणि आपल्या लोकप्रतिनिधींच्या जीवनात त्यामुळे काय काय, कस कसा फरक पडणार आहे? हे मात्र काही केल्या कळले नाही. कसे कळणार? खरे तर सर्व चित्रवाणी वाहिन्यांनी कॅमेरे-माइकचे दंडुके घेऊन एकेकाला ‘कैसा लगा?’ विचारल्याशिवाय हल्ली एखादा ‘इव्हेंट’ कसा झाला हे समजतच नाही. अर्थात, विधिमंडळात एवढय़ा सकाळी, साडेनऊच्या सुमारास ठेवण्यात आलेले व्याख्यान अनेक चित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यतालिकेतून जसे निसटले, तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांनीही या व्याख्यानास न जाणेच पसंत केले. अर्थात, शिवानी यांचे प्रवचन कसे असते, याचे कुतूहल शमवण्यासाठी विधान भवन इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात जाण्याची गरज होतीच, असे नाही. शिवानी यांची व्याख्याने तर यूटय़ूबवर, आध्यात्मिक चित्रवाणी-वाहिन्यांवर घरबसल्या ऐकावयास मिळतात. सावकाश, हळू आवाजात, लाघवी शांत सुरातील त्यांचे बोलणे नुसते ऐकूनच बरे वाटू लागते, असा अनेकांना अनुभव असेल. मोठे प्रश्न त्या हाताळतच नाहीत. एकाही देवाचे नाव घेत नाहीत. परमात्म्याने तुम्हाला साधन म्हणून मानवी जीवन दिले आहे, अशी आठवण करून देतात. म्हणजे रूढार्थाने त्या हिंदू अथवा कोणत्याही एका धर्माचा प्रसार करीत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा