काल पुन्हा त्यांनी तेच सांगितले.. ‘पगारात भागवा!’ चार वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये, राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘पगारात भागवा’ अभियान सुरू केले, तेव्हा त्याचा केवढा गाजावाजा केला होता. गावोगावी शिबिरे घेतली होती.. सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतात ही जनतेच्या मनातील भावना या अभियानामुळे पुसली जाईल, ‘वरकमाई’चा हव्यास नष्ट होईल आणि नेटक्या संसाराचे आदर्श सरकारी कर्मचारी उभा करतील, असे तेव्हाच महासंघाने सांगितले होते. या अभियानात जे सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू, असे इशारेही त्यांनी दिले होते. सरकारी अधिकारी व कर्मचारी म्हणजे जनतेला सेवा प्रदान करणारे घटक आहेत. ‘पगारात भागवा’ अभियान ही ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिती’ची चळवळ आहे, असे महासंघाने सांगितले, तेव्हा काही अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हीही या अभियानात सहभागीही झालो होतो. कारण अशी अभियाने किती चालतात, हे आम्हाला माहीत होते. तसेच झाले. चार वर्षांनंतर आता पुन्हा ‘पगारात भागवा’ असे सांगण्याची पाळी महासंघावर आली. आता पुन्हा तेच अभियान सुरू केलेच आहे, तर महासंघाने अनुभवी सदस्यांची एक समिती नेमून ‘पगारात भागविण्या’चा एक कृती आराखडाही तयार करावा, आणि तो आचरणात कसा आणावयाचा ते सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण शिबिरेही घ्यावीत. म्हणजे अभियानाची प्रसिद्धी होईल व शिबिरास उपस्थित राहण्याच्या निमित्ताने एखादी सुट्टीदेखील पदरात पडेल. खरं म्हणजे, चार वर्षांपूर्वी आम्हालाही वाटत होते, पगारातच भागवावे.. सोडावा तो हव्यास! पगारात भागवा म्हणजे, हव्यास टाळा.. आणि हव्यास टाळा म्हणजे भ्रष्टाचाराला आळा.. आता तर, वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यास चांगले आयुष्य जगता येईल एवढे पगार मिळू लागले असल्याने त्या पगारात भागवता येईल, असे त्यांनी तेव्हाही सांगितले होते. सामान्य जनतेस चांगली सेवा देण्यासाठी सरकार पगार देते, मग जनतेची कामे करण्यासाठी जनतेकडून पैसे घेऊ  नका, असा सल्लाही त्यांनी तेव्हा दिला होता. आम्ही तो मानला. पण समजा, आम्ही पगारातच भागवायचे ठरवले, तर मुलाबाळांना खासगी मेडिकल कॉलेजात प्रवेश घेऊन देण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी पैसे कुठून आणायचे? सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करतात, हा जनतेचा समजच आहे. ‘पगारात भागवा’ अभियान असेच अखंडपणे सुरू राहणार असल्याने आता तर जनतेला खात्रीच पटली असेल. परंतु पगारात भागविण्याची सवय लावून घेणे सरकारी कर्मचाऱ्याच्या कल्पनेपलीकडचे काम आहे, ते सहजसाध्य नाही, हेही आता जनतेस कळून चुकेल. सरकारी कर्मचाऱ्याचा ‘वरकमाई’चा हव्यास संपलेला नाही, ही जनसामान्यांच्या मनातील समजूतही पक्की होईल. भ्रष्टाचाराच्या संशयामुळे सरकारी कर्मचाऱ्याविषयी जनतेच्या मनात जी प्रतिमा तयार झाली आहे, ती अधिक ठळक होईल.. ‘पगारात भागवा अभियान’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त शासन’ या हातात हात घालून सुरू ठेवण्याच्या अखंड मोहिमा ठरोत. अशा मोहिमांमुळे महासंघ काही सकारात्मक काम करतो, हे जनतेला उमगेल आणि महासंघाची तरी प्रतिमा उजळेल. अभियानातून काय साधले, अभियानात सहभागी न झालेल्यांवर काय कारवाई झाली, वगैरे प्रश्न कुणीच विचारणार नाही! आम्ही चार वर्षांपूर्वीच, हे अभियान सुरू झाले तेव्हाच त्याला- नैतिक का काय तो- पाठिंबा दिला आहे. हे अभियान असेच अखंड सुरू राहो, हीच यानिमित्ताने महासंघास सदिच्छा.. जय (भ्रष्टाचारमुक्त) महाराष्ट्र!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा