राजकीय नेत्यांना जनतेच्या ‘मनाची नाडी’ बरोबर सापडलेली असते असे म्हणतात; पण जनतेला मात्र राजकीय नेत्यांच्या मनाचा थांग लागत नाही हेच खरे. नाही तर, गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावली असा अपप्रचार जनतेने खपवून घेतलाच नसता. एकूणच, जनता भोळी असते. जो काही समज करून दिला जाईल, तो जनतेला पटतो. पण मुळात, शिवसेना कधीच विरोधकाच्या भूमिकेत नव्हती. आता, पाच वर्षांनंतर, विधानसभेच्या नव्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ते स्पष्ट व्हायला लागले आहे. शिवसेना नेहमीच जनतेच्या बाजूने, जनतेच्या प्रश्नांसाठी जागल्याच्या भूमिकेत होती. खरे तर हे सरकारचेच काम. ते केले म्हणून, शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत असल्याचा समज पसरला. जनतेची काळजी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना अधिक असते आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारशी संघर्ष करायचा असतो, हेच आजतागायत जनतेच्या मनावर बिंबविले गेले, म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर, ‘सरकारचा आपला विरोधी पक्ष’ असा शिक्का बसला. तसा शिक्का सोसूनही शिवसेनेने आपला हट्ट सोडलेला नाही. खांद्यावरच्या वेताळाला घेऊन निघालेल्या विक्रमादित्यासारखे, शिवसेना समाजाचे प्रश्न खांद्यावर वाहातच आहे. मध्यंतरी, निवडणुकीआधी काही दिवस युती झाली, म्हणून शिवसेनेस हा वेताळ तात्पुरता झाडावर टांगून ठेवावा लागला. हा काही काळापुरता अपवाद. आता पुन्हा, निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचा गुंता सुरू झाल्याने पुन्हा शिवसेनेने तो जनतेच्या प्रश्नांचा वेताळ खांद्यावर घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरसावलेली शिवसेना सध्या, ‘काळजीवाहू सरकार’च्या भूमिकेत आहे. तो गुंता सुटेपर्यंत पुन्हा एकदा ती विरोधकाच्या भूमिकेत गेल्याचा भास जनतेला होऊ शकतो. आपल्याला हे माहीतच आहे, की केंद्रात मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेस राज्यातील सत्तेत कोणता वाटा द्यायचा किंवा द्यायचा की नाही यावरून सध्या दोन भावांमध्ये जुंपली असताना, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मात्र, ट्विटर या समाजमाध्यमाचा वापर करून सार्वजनिकरीत्या पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांना हात घातला आहे. ‘जनता दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही,’ असे सांगत त्यांनी पाडव्याच्या दिवशी ‘पहिला फटाका’ वाजविला आणि भाऊबिजेस तर ते (फटाक्याची) माळ घेऊनच मैदानात उतरले. ऐन दिवाळीत बाजारात असलेल्या शुकशुकाटामुळे उद्धवजी उदास झाले आहेत. नोटाबंदीच्या अरिष्टातून जनता सावरली नसल्याची त्यांची खंतही जिवंत झाली आहे आणि बंद पडणारे उद्योगधंदे व वाढत्या बेरोजगारीचे सावट त्यांना अस्वस्थ करू लागले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेतून सरकारने काढलेल्या पावणेदोन लाख कोटींमुळे, सरकार डबघाईला आल्याची चिंता त्यांना सतावत आहे, तर दिवाळी असूनही, ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’, हा, भारतात जगप्रसिद्ध झालेला ए.के. हनगल यांचा ‘भेदक सवाल’ आज स्वत: ठाकरे करू लागले आहेत. हे सारे पाहता, ‘ठाकरे पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत गेले’ अशी अफवा उठण्याची दाट शक्यता संभवते. पण सुजाण जनतेला त्या अफवेची धुंदी चढण्याआधीच त्यातील वास्तव स्पष्ट करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर लोकहो, शिवसेना पुन्हा जनतेच्या प्रश्नांचा वेताळ खांद्यावर घेऊन निघालेला विक्रमादित्य झाली आहे.. शिवसेना ‘विरोधी पक्ष’ नव्हे, ‘काळजीवाहू सरकार’ झाली आहे. उद्धवजींच्या उद्विग्नतेत काळजीवाहू सरकारची ममता प्रतिबिंबित होत नाही काय?

तर लोकहो, शिवसेना पुन्हा जनतेच्या प्रश्नांचा वेताळ खांद्यावर घेऊन निघालेला विक्रमादित्य झाली आहे.. शिवसेना ‘विरोधी पक्ष’ नव्हे, ‘काळजीवाहू सरकार’ झाली आहे. उद्धवजींच्या उद्विग्नतेत काळजीवाहू सरकारची ममता प्रतिबिंबित होत नाही काय?