लोकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळेच असतात म्हणे. संस्थांचेही तसेच असणार… मग केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळही (सीबीएससी बोर्ड) त्याला अपवाद कसे असेल? या परीक्षा मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील आकलन उताऱ्यावर आक्षेप घेतल्यामुळे आता तो मागे घेतला गेला असला तरी खरी परिस्थिती वेगळीच आहे. जसे लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच असतात, तसेच या संस्थेचा पुस्तकात प्रसिद्ध करण्यासाठीचा आणि प्रसिद्ध न करण्यासाठीचा असे परिच्छेद वेगवेगळे होते, असे समजते आहे. प्रश्नपत्रिकेत समाविष्ट न करण्यासाठीचा खास उतारा आमच्या हाती लागला असून तो वाचकांच्या अवलोकनार्थ देत आहोत.

‘‘स्वत:ला विशालप्रज्ञ म्हणवणाऱ्या काही लोकांनी गेल्या शतकभराच्या काळात या भारतवर्षात स्त्री सुधारणांच्या नावाने फार उच्छाद माजवला आणि आमच्या संस्कृतीचा विनाश घडवला. त्याचे परिणाम फक्त भारतवर्षालाच नाही तर अवघ्या भूमंडलाला फक्त सद्य परिस्थितीतच नाही तर पुढचा अनंत काळ भोगावे लागणार आहेत. जिने घरी बसून चूल आणि मूल सांभाळायचे आणि संस्कृतीची पालखी वहावयाची, त्या भारतीय स्त्रीस या लोकांनी घराबाहेर काढून अक्षरे गिरवावयास लावली. त्याचा परिणाम होऊन ती अर्थार्जन करावयास लागली. तिने भारतीय संस्कृतीची मर्यादा ओलांडणे या पातकाचा परिणाम अवघ्या विश्वावर होऊन त्याचेही चलनवलन बिघडले आहे.

अति पाऊस, अति उन्हाळा, थंडीच्या दिवसांत पाऊस, चक्रीवादळे हा सगळा त्याचाच परिणाम असून या पद्धतीने निसर्गचक्र बिघडवण्यास स्त्रीच कारणीभूत आहे.

स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचे परिणाम एवढ्यावरच सीमित नाहीत असे निदर्शनास येते आहे. वर्षाकाळात देशभर सर्वत्र पाऊस पडतो आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठिकठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, अपघात होतात, अनेक जण जिवानिशी जातात, अनेक जण जायबंदी होतात. यालाही स्त्रीस्वातंत्र्यच कारणीभूत आहे. स्त्री शिक्षणासाठी तसेच अर्थार्जनासाठी घराबाहेरच पडली नसती तर रस्त्यांवर माणसे आणि वाहने यांची संख्या कमी झाली असती आणि हा प्रश्नच उद्भवला नसता.

अलीकडच्या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीलाही या पद्धतीने १००-१५० वर्षांपूर्वी आणलेले स्त्रीसुधारणांचे खूळच जबाबदार आहे यात काहीच शंका नाही. स्त्रिया कोणत्याही कामासाठी घराबाहेरच न पडत्या तर ही वाहतूक कोंडी ना होती.

सध्या जागतिक राजकारणात चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्या देशासाठी ती मोठी डोकेदुखी आहे. तथापि त्यासाठीदेखील हे स्त्रीस्वातंत्र्यच जबाबदार आहे. आपल्या देशातील शिक्षित स्त्रियांचा उद्दामपणा पाहूनच आपण कसे वागावयाचे आणि आपल्याला हवे ते साधून घ्यायचे हे चीन या देशास समजले आहे याविषयी दुमत असू शकत नाही.

एवढेच नाही तर दूरच्या भविष्यकाळात सूर्याचा तप्त गोळा थंड होत जाणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आमच्या शिक्षित स्त्रियांनी गेल्या १००-१५० वर्षांमध्ये बुडवलेला धर्मच त्यासाठी कारणीभूत आहे, याविषयी कोणतीही शंका नाही.’’

– हा उतारा वापरला गेला नाही. कसा जाणार? अधोगती गेल्या ७० वर्षांत झाली, यावर सर्वांचेच एकमत नव्हते का? त्यामुळे गेल्या ७० वर्षांतील स्त्रीसुधारणांचे ‘खापर’ १५० वर्षांपूर्वीच्या लोकांवर फुटणे टळले, हेही बरेच!

Story img Loader