‘बेटी बचाओ, बेटी बढाओ, बेटी पढाओ’ हा ‘नारा’ जन्माला आला त्याला आता काही दशके लोटली. तरीही स्त्रीभ्रूणाची हत्या करणाऱ्या वा मुलगाच हवा यासाठी कोणाही भोंदू बाबा-बुवांच्या चरणी लोळण घेण्यापर्यंत मजल मारणाऱ्या समाजात, स्त्रीजातीच्या जन्माचा सोहळा साजरा करण्याची मानसिकता रुजू लागली आहे.. मात्र याची सुरुवात घरात नव्हे, तर घराच्या परडय़ात असलेल्या गोठय़ातून सुरू झाली आहे! ज्या समाजात मुलीचा जन्म नाकारला जातो, त्याच समाजातील घरांच्या गोठय़ात मात्र, गाई-म्हशींनी नर जातीच्या पिल्लास जन्मच देऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची मानसिकता बळावत आहे. कारण, गाय किंवा म्हैस हा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा आधार असला, तरी त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या नरास मात्र त्या गोठय़ामध्ये स्थान राहिलेले नाही. दूध देणाऱ्या जनावराच्या पोटी नर जातीचे पिल्लू जन्मास आले तर शेतकऱ्यांचे नुकसान होते, म्हणून त्यास जन्मत:च किंवा जन्मानंतर उपासमारीने मारून टाकण्याची मानसिकता अलीकडे वाढली आहे. घरात मुलीचा जन्मच होऊ नये, अशा मानसिकता ज्या घरांमध्ये बळावल्याची चिंता व्यक्त होते, त्यातील अनेक कुटुंबांत आता जनावरांच्या बेटीच्या जन्माचा मात्र उत्सव साजरा होऊ लागला असून, गोवंशातील नराच्या जन्मास नाकारण्याची मानसिकता बळावत चालली आहे. या मानसिकतेचे लोण आता एवढे पसरू लागले आहे, की सरकारलादेखील याची दखल घेऊन या मानसिकतेस मान्यता देण्याचे विचार सुचू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात, संसदेच्या एका सभागृहात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जणू याची कबुलीही दिली. दुभत्या जनावरांच्या पोटी नर जातीच्या पिल्लाचा जन्मच होणार नाही, असे एक धोरणच सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या सरकारी व्यवस्थांना या धोरणाच्या घोषणेनंतर काय वाटले असेल ते सांगता येणार नाही. पण घरात मुलाचा जन्म व्हावा यासाठी आसुसलेल्या असंख्य घरांना मात्र, जनावरांच्या बेटीजन्माच्या सुवार्तेने आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील.. जनावरांच्या गर्भात विशिष्ट बीज रुजविल्याने, नरजातीचा वंशच जन्मास येणार नाही आणि केवळ स्त्रीजातीच्या वंशविस्तारामुळे दूधदुभत्याची दुसरी धवल क्रांती साधता येईल, असा या धोरणाचा गाभा असल्याने, शेतकऱ्यांच्या गोठय़ात यापुढे नरजातीच्या जनावरांना थारा असणार नाही, हे स्पष्ट दिसू लागले आहे. दुग्धक्रांतीच्या जमान्यात नराला स्थान नाही, हे वास्तव शेतकऱ्यांनी आनंदाने स्वीकारल्याने, स्त्रीजन्माचे महत्त्व अधोरेखित करणारी एक मानसिकता कुठे तरी मूळ धरू लागली आहे, ही या वास्तवाची एक वेडगळ, निर्थक आणि आशावादी, अशी दुसरी बाजू! त्यात तथ्य नाहीच, पण घरात नाही तर गोठय़ात तरी, स्त्रीजन्माचा सोहळा साजरा व्हावा हेही थोडके नव्हे! नराचा जन्माचा हक्कच नाकारण्याच्या अघोरी मानसिकतेकडेदेखील विधायक नजरेने पाहण्याचे हतबल वास्तव स्वीकारण्यावाचून आता पर्याय नाही. तरीही, कुठे तरी, ‘बेटी’च्या जन्मास सरकारी धोरणात काही तरी स्थान मिळाले या वास्तवावर समाधान मानावे आणि स्वस्थ बसावे.. तेच बरे!..