सकाळी शाळा असणाऱ्या मुलांची चंगळ असते, असे दुपारच्या शाळेतल्या मुलांना सतत वाटत असते आणि नेमके असेच वाटणे सकाळच्या मुलांच्याही मनांत असते. आता हे असे वाटणे पूर्णत: बंद होण्याची लक्षणे आहेत. कारण, शाळा एकदाच आणि तीही बारा तास चालण्याची शक्यता आहे. ‘विद्याभारती’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षणविषयक संघटनेनेच तशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. ही आदेशवजा सूचना शिरसावंद्य मानून अशी बारा तासांची शाळा सुरू झालीच, तर मात्र शहरातील विद्यार्थ्यांचे हाल विचारायलाच नकोत. ही अशी दीर्घ शाळा देशातील फक्त महानगरांमध्येच चालवावी, असे विद्याभारतीचे म्हणणे आहे. सकाळ, दुपार अशी शाळांची सत्रे तर फक्तशहरांमध्येच असतात. विद्यार्थी जास्त आणि इमारती कमी अशी ही अवस्था. त्यामुळे एकाच इमारतीत दुबार पिकांप्रमाणे दोन वेळा शाळा भरविण्याशिवाय संस्थाचालकांपुढे पर्यायच राहिला नाही. शिवाय त्यातून मिळणारे उत्पन्नही आपोआप दुप्पट होत असल्यामुळे त्यांची सगळ्याच बाजूने चंगळ. बारा तास शाळेमुळे मात्र शहरांमधील निम्मीच मुले शाळेत जाऊ शकणार. मग आणखी शाळा काढाव्या लागणार, त्यासाठी नव्या इमारती बांधाव्या लागणार. म्हणजेच शिक्षण खात्याचा भार वाढणार. भारतातील कोणत्याही शहरातील वाहतुकीचा वेग गेल्या काही दशकांत ताशी दहा किलोमीटर इतका कमी झाला आहे. त्यामुळे वेळेत शाळेत पोहोचण्याचे अग्निदिव्य रोजच्या रोज करण्याचे दुर्भाग्य तेथील विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहे. शाळेच्या आधी एक तास निघायचे आणि शाळा सुटल्यानंतर एक तासाने घरी परतायचे, असे त्यांचे वेळापत्रक झाल्याने त्यांचे क्लासेस, खेळ, छंद यासाठी वेळ कोठून आणि कसा काढणार, या विवंचनेत सगळे पालक सतत असतात. बारा तासांची शाळा झाली, तर या पालकांच्या कटकटींमध्ये किती प्रचंड वाढ होईल, याचा हिशेबच करायला नको. मूल घरापासून किमान चौदा तास बाहेर असण्याने निर्माण होणारी चिंता, त्याला एकापेक्षा अधिक डबे देण्याचा त्रास, त्यामुळे दफ्तराच्या वाढत्या वजनाचा ताण, शिवाय पाल्याला अन्य कोणतीच गोष्ट करता न येण्यामुळे होणारी चिडचिड. पालकांच्या त्रासाएवढाच मनस्ताप त्या बापडय़ा चिमुकल्यांनाही होणार ते वेगळेच. ‘इवलासा मेंदू, त्यात किती कोंबू,’, असा प्रश्न शाळेतल्या शिक्षकांना सतत पडलेला असतो. समजते किती आणि कळते काय, याचा विचार न करता ते आपले शिकवतच राहतात. अशा शाळांमध्ये मुलामुलींना वेगवेगळे शिकवावे, अशीही सूचना त्यामुळे करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देता देता आधीच दमछाक झालेल्या मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांना निदान या कारणासाठी मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्हावी, असे तर या ‘विद्याभारती’ला वाटत नसेल ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा