नितीश कुमार यांनी केलेला प्रतिप्रश्न सडेतोडच होता. आजकाल प्रत्येक बाबीला प्रतिप्रश्न विचारायचाच असतो. तेव्हा तुम्ही कुठे होता, त्याबद्दल तुम्ही गप्प का, असे प्रश्न विचारणे म्हणजे, भूतकाळ किंवा इतिहासाबद्दल जागरूक असणे!.. ज्या राज्यात भगवान बुद्धास आत्मज्ञानाचा बोध झाला, त्या बिहारसारख्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा इतिहासाची आठवण करून देतात, तेव्हा वर्तमानकाळातील समस्यांची धार कमी व्हावी हाच त्यामागचा उद्देश असला पाहिजे. महापूर ही स्वातंत्र्यानंतरची काही पहिलीच घटना नव्हे!.. कोसीने याआधी किती तरी वेळा गावेच्या गावे गिळंकृत केली आहेत. त्यामुळे, बिहारच्या जनतेस पुराचे तडाखे सहन करण्याची सवयही आहे. तसेही, पूर ही नैसर्गिक आपत्ती असल्याने अशा आपत्ती जगात कोठेही येऊ शकतात. अगदी अमेरिकेपासून सांगली-कोल्हापुरापर्यंत कोठेही महापुराचे तडाखे बसू शकतात, आणि त्यामध्ये प्राणहानीदेखील होऊ शकते, हे टीकाखोर माध्यमांना समजावून सांगणे हे राज्याचे प्रमुख म्हणून नितीश कुमार यांचे कर्तव्यदेखील ठरते. खरे तर, पुरासारख्या प्रसंगांना संकटाऐवजी संधीच मानण्याची सवय आता सर्वानीच अंगी बाणवून घ्यावयास हवी. म्हणजे असे की, पुराच्या पाण्यासोबत मासे आदी जलचर प्राणीदेखील हातातोंडाशी येणाऱ्या घासाप्रमाणे थेट घरपोच येतात, आणि घरबसल्या अन्नपाण्याची सोय होते. त्यामुळे ‘पूर आला तर मासे पकडा आणि खा’ असा सल्ला नितीश कुमार यांनी जनतेस का दिला नाही, हेच एक कोडे आहे. अमेरिकेत वगैरे पूर येतात तेव्हा तेथील जनता काय करते, हेदेखील त्यांनी सांगितले किंवा नाही हे कळावयास मार्ग नाही. अशा प्रसंगी सरकारला दोष न देता ओढवणाऱ्या आपत्तीस स्वत:च्या भरवशावर तोंड देण्याची समज जनतेस सभ्य शब्दांत नितीश कुमार यांनी दिली हे मात्र खरे.. या आपत्तीसाठी त्यांनी विरोधकांना जबाबदार न धरता निसर्गास जबाबदार धरले, हेदेखील त्यांच्या सभ्य राजकारणाचेच साक्षात उदाहरण! निसर्ग ही सत्ताधीशांहून प्रबळ शक्ती असल्याने, पूर, आपत्ती तर येतच असतात. त्या येतात, आणि जातात, काही दिवस त्याचे चटकेही सोसावे लागतात. कालांतराने सारे सुरळीत होत असते, हे जनतेने समजून घ्यावयास हवे. त्यासाठी बिहारच्या जनतेने महाराष्ट्राकडे पाहावे. कालपरवा या राज्यातही महापुराने थैमान घातले होते, या पावसाळ्यातील सर्वाधिक पूरबळी महाराष्ट्रात झाले, तरीही महाराष्ट्र आता निवडणुकीच्या सर्वात मोठय़ा राजकीय सोहळ्याच्या तयारीत गर्क झाला आहे. ‘अमेरिकेत पूर येत नाहीत का’ हा प्रतिप्रश्न विचारण्याऐवजी, महाराष्ट्राने काय केले, हा प्रश्न नितीश कुमार यांनी विचारला असता, तर त्यांनाच सवाल करणाऱ्या सर्वाचीच तोंडे बंद झाली असती. त्यामुळे, प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा, प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्यांस गप्प बसविणे अधिक महत्त्वाचे असते. ते ज्याला जमते, त्याला राजकारण जमले असे म्हणावयास हरकत नाही. नितीश कुमार तर, राजकारणात मुरलेले नेते.. बिहारच्या राजधानीत, पाटण्यात पाणी शिरले, असे जनता म्हणत असली, तरी सरकार जोपर्यंत त्याची कबुली देत नाही तोवर ते खरे मानावयाचे नसते. पाटण्यात पाणीबिणी काही नाही, असे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले तर त्यावर विश्वास ठेवणे हे जनतेचे कर्तव्य असते. जनतेने ते पार पाडावे ही आज लोकशाहीची अपेक्षा असते. म्हणून, बिहारकडून वेगळी अपेक्षा करणे गैर ठरेल..

Story img Loader