तर, राजकारणात वास्तव हेच वास्तव असते, हे मतदारास नेहमीच माहीत असते असे नाही याची राजकारण्यास पुरेपूर माहिती असते. पण वास्तवाचे भान ठेवून राजकारण केले नाही  तर भ्रमनिरास होतो याची पुरेपूर जाणीव ज्या समंजसांना असते त्यांचा कधी भ्रमनिरास होत नाही. तरीही, कधी कधी एखादा नेता भ्रमात तर नाही ना या विचाराने सामान्य मतदार कधी कधी संभ्रमात पडतो. अर्थात, राजकीय नेते सामान्यांच्या आकलनापलीकडे परिपक्व असल्याने भ्रम, संभ्रम आणि वास्तव या साऱ्यांचे त्यांना नेमके भान असते. त्यामुळे कोणत्या गोष्टी भ्रम म्हणून पुढे आणावयाच्या, कोणत्या गोष्टींतून संभ्रम माजवायचा, कोणत्या गोष्टीत वास्तव लपवायचे आणि कोणत्या वास्तवावर केव्हा प्रकाश टाकायचा या सर्वाचे भान एका नेत्याच्या ठायी एकाच वेळी असणे हे कौशल्याचे काम! वास्तवावर उजेड टाकताना हे कौशल्य एकटय़ा नेतृत्वातून वापरता येते; पण भ्रम किवा संभ्रम माजविताना सामूहिकपणे याचा वापर करावा लागतो. बऱ्याचदा मतदार किंवा सामान्य माणूस राजकीयदृष्टय़ा संभ्रमावस्थेत सापडण्यामागे अशीच कारणे असतात. एकाच दिवशी, एकाच वेळी असा एखादा सामूहिक प्रयोग केला जातो तेव्हा याचा अनुभव येतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती विचारावर आधारित असल्याने आगामी निवडणुकांमध्ये ती राहणारच असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शहा मतदारांना सांगतात; तर, युतीझाली नाहीच तर स्वबळाची तयारी ठेवा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना बजावतात. एकाच दिवशी एकाच वेळी समाजासमोर येणारी दोन विधाने हा संभ्रमनिर्मितीचा सामूहिक प्रयोग असल्याचे वरवर वाटत असले तरी तो प्रयोग केवळ योगायोगाने घडून गेलेला नसतो. त्यामुळे वास्तव काय असा  प्रश्न केवळ मतदार असलेल्या सामान्य माणसालाच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसही पडावा आणि त्याने भ्रम झटकून वास्तव खोदून काढण्याच्या फंदात न पडता कामाला लागावे या नीतीचा एक आखणीबद्ध प्रयोग असतो हे कुणाला माहीतही नसते. एखादी गोष्ट भ्रामक आहे असे वारंवार सांगत राहिले की त्यातील वास्तवाकडे डोळेझाक करणे हा सर्वसामान्य माणसाचा साधारण स्वभाव असतो, हेही राजकारणातील नेत्यांना पुरेपूर माहीत असलेले ज्ञान सामान्यांपर्यंत वास्तविकपणे पोहोचलेलेच नसते. याचा सामूहिक फायदा म्हणजे, अशा प्रयोगातून सामान्य माणूस अधिक संभ्रमात पडतो आणि वास्तवाच्या फंदात न पडता भ्रमाचे वास्तव मान्य करू  लागतो. भाजपच्या विरोधात उभी राहणारी महाआघाडी हा केवळ भ्रम आहे असे  पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणतात. मतदाराची वास्तवाच्या शोधाची सवय संपली की भ्रम हेच सत्य वाटावे अशी परिस्थिती येईल आणि कंटकाकीर्ण मार्ग सोपा होईल हे यामागचे सोपे गणित असू शकते,  हे वास्तव मतदारास माहीत असते का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा