जवळपास सात दशके देशाला छळणारे, घटनेतील ते ३७०वे कलम मोडीत काढून काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्यावरून काँग्रेसमध्ये जुने-बुजुर्ग काँग्रेसजन आणि युवा काँग्रेसजन यांमध्ये मतभेद उघड झाले, ही बातमी एव्हाना जुनीदेखील झाली आहे. या मुद्दय़ावरून दोन गट पडलेल्या काँग्रेसमध्ये आता बुजुर्ग कोणास म्हणावयाचे आणि युवा काँग्रेसजन कोणास म्हणावयाचे यावर चर्चेचा सारा रोख केंद्रित होणार अशीच चिन्हे अधिक संभवतात. कारण या घडीस ते पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम असले, तरीही त्यांच्या नेतृत्वावरच साऱ्या नजरा खिळत असल्याने, राहुल गांधींचा समावेश यापैकी कोणत्या वर्गात करावयाचा, त्यांना बुजुर्ग म्हणावे, की युवा नेते म्हणावे, याविषयीच्या चर्चानाच अलीकडे अधिक महत्त्व येऊ घातले आहे. घटनेचे ३७०वे कलम रद्द करून काश्मीरचे विशेषाधिकार संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यावर संसदेच्या उभय सभागृहांतील काँग्रेसजनांचे चेहरे उभ्या देशाने न्याहाळले, तेव्हाच या पक्षात जुन्या-नव्या काँग्रेसजनांमध्ये काही तरी शिजते आहे याची जाणीव जनतेस झाली होती. राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी तर पक्षादेश जारी करण्यासच नकार देत थेट पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. तोवर भुवनेश्वर यांना बुजुर्ग काँग्रेसजन मानले जात होते. दुसरीकडे, काँग्रेसचा युवा चेहरा असलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांनी उघडपणे भाजपच्या भूमिकेस पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या दोन पिढय़ांमधील द्विधा उघड झाली. युवा काँग्रेसजनांना बुजुर्गाची भूमिका मान्य नाही आणि समाजाच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असा आग्रह युवा काँग्रेसजनांच्या फळीत सुरू असताना, काँग्रेसचा युवा जोश मानल्या जाणाऱ्या राहुलजींनी मात्र, बुजुर्ग काँग्रेसजनांच्या पारडय़ात आपले वजन टाकले आणि सरकारच्या प्रस्तावास विरोध केला. सोनियाजींच्या शेजारच्याच बाकावरून अधीररंजन चौधरी यांनी नवा आणि वेगळाच सूर आळविण्यास सुरुवात केली, तर, या प्रश्नाच्या सगळ्याच बाजू काळ्या किंवा पांढऱ्या नाहीत, तर काही बाजू ‘करडय़ा’ही आहेत, अशी नवीच जाणीव मनीष तिवारींना झाली..
‘विरोधकां’च्या भूमिकेत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या धोरणास विरोध करावयाचा एवढीच भूमिका घेण्याच्या काँग्रेसच्या नीतीचे कदाचित तोवर कोणास आश्चर्य वाटले नसावे. म्हणूनच, ‘इतिहासाच्या योग्य बाजूने’ राहण्याची भूमिका एका बाजूस, तर जनमताचा कौल मानण्याची भूमिका दुसऱ्या बाजूस, अशा दुफळीमुळे, ‘बुजुर्ग काँग्रेसजन’ कोणास म्हणावे आणि ‘युवा काँग्रेसजन’ कोणास म्हणावे या संभ्रमाचीच चर्चा वाढली असावी. बुजुर्ग काँग्रेसजनांनी सरकारच्या प्रस्तावास विरोध केला, तर ज्योतिरादित्यांसारख्या युवा नेत्याने विरोधी पक्षात असूनही सत्ताधाऱ्यांस पाठिंबा दिला, तेव्हाच खरे तर, ‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ या फळ्या स्पष्ट व्हावयास हव्या होत्या. राहुलजींची भूमिका उघड होईपर्यंत त्या तशा झाल्याही होत्या. पण स्वत: राहुलजींनीच बुजुर्गाच्या बाजूने आपला कौल दिल्याने चर्चेचा सारा रोखच बदलून गेला आहे. राहुल गांधी यांना बुजुर्ग मानावे की युवा नेते मानावे यावरच आता वाद होत राहतील. कदाचित, गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसच्या दृष्टीने अशी चर्चाच उपकारक ठरण्याची शक्यता अधिक आहे.. म्हणजे असे की, पक्षातील ‘बुजुर्ग’ आणि ‘युवा’ या दोन्ही वर्गाना राहुलजी ‘आपले’ वाटावेत, यासाठी तर पक्षातील काही बुजुर्ग आणि काही युवाजनांकडून जाणीवपूर्वक ही धूर्त चाल खेळली गेली नसावी ना, या शंकेलादेखील वाव उरतोच!